"पण लक्षात कोण घेतो?":
सध्या "सेल्फी"चे म्हणजे आपल्या बाह्यरूपाचं प्रदर्शन करायचं वेड वार्यासारखं पसरलेलं आहे. त्यापेक्षा आपण अंतर्मुख होऊन, आपल्या अंतर रुपाची "सेल्फी" कधी मधी बघायची सवय लावून घेणे खरोखरच गरजेचे आहे.कारण, त्यामुळेच सुधारणा आणि प्रगतीच्या दशदिशा आपल्यासमोर खुल्या होतील.
पण लक्षात कोण घेतो?
---------
'पुराणांतील वांगी, पुराणांतच शोभतात.' आपला उज्ज्वल इतिहास किती उगाळणार आणि तो, तसा उगाळून काय साधणार? वर्तमान काय आहे कसा आहे, खरोखर किती भूषणावह आहे, ह्याचा आधी गांभीर्याने विचार केला, तरच भविष्यकाळाची काही आशा धरता येईल !
--------
#"आजचा दिवस, माझा !":
नेहमी, मी रोज सकाळी, काल काय केलं, त्याची कित्येक दिवस एका वहीत नोंद करत आलो आहे आणि आता तर अशा उपक्रमाची आवश्यकता आहे. कारण आपण वेळेचा उपयोग अधिक चांगल्या कामासाठी करू शकतो, याची जाणीव बहुदा व्हायला हवी.
ह्या संवयीमुळे, आजचा दिवस, कालच्या पेक्षा चांगला कसा करायचा, हे त्यामुळे उमजेल, रोजच रोज !
-------------------------
#"मुखवटे आणि चेहेरे"!:
विचार, उच्चार आणि आचार ह्यामध्ये, एकवाक्यता ठेवणे, सगळ्यांना जमतेच असं नाही. ते जमण्यासाठी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि निस्पृहता असे मूल्याधिष्ठित गुण अंगी असावे लागतात.
चंगळवाद आणि "अर्थ हाच सर्वार्थ" मानणाऱ्या आजच्या युगात, सहाजिकच हे सारे गुण दुर्मिळ होत चालले आहेत.
सहाजिकच आपल्याला सभोवताली दिसतात, वावरतात, ते मुखवटे आणि चेहेरे, चित्रविचित्र अन् विश्वास न ठेवण्या जोगे!
"कालाय तस्मै नमः" दुसरं काय?!
--------------------------
#"मतभिन्नता":
एखाद्या व्यक्तीबद्दल अथवा घटनेबद्दल आपले जे मत असेल, तसेच दुसर्या कुणाचे असेलच असे नाही. त्याचे मत अगदी आपल्या विरुद्ध असू शकते.
आपले मतच बरोबर आहे, हे दुसऱ्याला त्यामुळे पटवून देणे कर्म कठीण असते, कारण "पिंडे पिंडे मतीर्भिन:!" दुसऱ्याच्या नजरेतून बघण्याचा चश्मा सहसा कुणाकडे नसतो. बहुतेक वाद-विवादांचे, मतभिन्नतेचे मूळ हेच असते.
------------------------
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा