"टेलिरंजन-एक लेखाजोखा !":
छोट्या पडद्यावर सर्वसामान्य आणि सर्वमान्य अशा काही बाबी किंवा गोष्टी आढळतात त्या प्रथम सांगतो.
एकच कल्पना अनेकांना एकाच वेळी सुचू शकते किंवा कदाचित कोणीतरी दुसर्याची कॉपी करतो, असंच काही मालिकांमध्ये अधून-मधून आढळून येतं. झी वाहिनीवरील "मन उडू उडू झालं" मधील दीपू आणि सोनी वाहिनीवरील "वैदेही" या दोन्ही मुली सारख्याच प्रसंगांना सामोर्या जाताना दिसतात. मध्यमवर्गीय कुटुंबातील या दोघी कर्तबगार आणि आपल्या कुटुंबाचे नेहमी हित साधावे म्हणून कष्ट आणि त्याग करणाऱ्या आहेत. मोठ्या बहिणीचे लग्न नीट पार पडावे म्हणून त्या आर्थिक जबाबदारीही घेतात.
दोन्हीकडेही मध्यमवर्गीय वडील आणि त्यांना तीन मुली, फरक इतकाच की, "वैदेही" मालिकूत एक भाऊ जो फुकट गेलेला आहे आणि त्याच्या चोरीमुळे घरात वादळ व संकट निर्माण होते. तर "उडू उडू" मध्ये मास्तर असलेले वडील, त्यांच्या फसवणुकीने दागिने चोराने चोरले जातात इतकेच. पण संकट व वरपक्षाकडील नको इतकी चालबाज मंडळी तशीच दोन्ही मालिकांमध्ये ! अशा कितीतरी साम्य स्थळांनी ह्या दोन्ही मालिका भरलेल्या आहेत. सारखीच दिसणारी एका व्यक्ती सारखी दिसणारी, पाच सहा माणसे जगात असतात असं म्हणतात किंवा "कल्पना एक आविष्कार अनेक", त्याचीच प्रचिती 'उडू उडू' आणि 'वैदेही' मालिकांमधून येते. प्रेक्षकांना उल्लू बनवण्याचा हा प्रकार नव्हे कां?
सोयीप्रमाणे केव्हाही, कोणत्याही पात्राची भूमिका करणारा कलाकार अचानक मालिकांमधून बदलला जातो. पूर्वी निदान आधी पूर्व कल्पना देत असत किंवा नव्या कलाकाराच्या प्रवेशा आधी, तशी कल्पना देत असत. आता तसं राहिलं नाही. अचानक कोणीतरी दुसरा कलाकार भूमिकेमध्ये आपल्याला दिसतो. "स्वाभिमान" मधली मोठी आई अशीच अचानक बदलली गेली आणि दुसरी अभिनेत्री तिथे आपल्याला दिसली. तर "जीव माझा रंगला" या मालिकेमध्ये मोठी बहीण श्वेता अशीच अचानक बदलली गेली आणि जवळजवळ तिच्यासारखी दिसणारी अभिनेत्री श्वेता म्हणून पुढे आली.
"यह हमे मंजूर नही !":
मालिकांमध्ये कधी कधी आपल्याला न पटणाऱ्या अशा गोष्टी दाखवल्या जातात. सर्वसामान्यपणे व्यावहारिक जीवनामध्ये कोणीही व्यक्ती, कशी वागेल याचे काही निकष असतात. त्या निकषांना तडा देईल, अशा तऱ्हेचे काही पात्र वागतात आणि ते आपल्याला पटत नाही. झी वरील "माझी-तुझी रेशीमगाठ" या मालिकेमध्ये उद्योगपतीचा नातू असलेला यश, रस्त्यावरील सिग्नलमुळे गाडी थांबली असताना बाजूच्या स्कूटर वरील मुलीला, केवळ ओझरते बघून तिच्या अखेर प्रेमात काय पडतो आणि तिच्यासाठी वाट्टेल ते करायची त्याची तयारी कशी होत जाते, ते काही केल्या पटत नाही.
तीच गोष्ट, स्टार प्रवाहवरील "आई कुठे काय करते" मध्ये संजनासारखी जणू सवत असलेली स्त्रीने आपल्या नवऱ्याशी विवाह केल्यानंतर, अरुंधती तिच्याबद्दल नको इतकी सहानुभूती कां दाखवते, तिच्या संकटात कां स्वतःहून पुढाकार घेते, वेळोवेळी मदत करण्यासाठी कां झटत असते, तो काही कळत नाही. हा म्हणजे चांगुलपणाचा, आदर्शवादाचा अक्षरशः अतिरेक झाला. केवळ आईच्या भूमिकेतील नायिका, ही नैतिकदृष्ट्या अत्युच्च दाखवण्यासाठी, हा अट्टाहास मनाला काहीही पटत नाही. ही केवळ वानगीदाखल दोन उदाहरणे. अशाच तर्हेचे अनेक घटना, पात्रे व प्रसंग मालिकांमधून दाखवले जातात आणि प्रेक्षकांना गृहित धरले जाते.
सोनी वाहिनीवरील, मनू आणि मल्हारच्या अवखळ प्रेमाच्या गोष्टीत त्यांचे पुढे काय होणार, ही उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, मीरा व आदिराजच्या शिळ्या प्रेमाच्या कढीची उगाचच मध्ये लुडबुड नकोशी आणि अनाकलनीय, अविश्वसनीय वाटते. "आता बरसात नाही रे !
तसेच
"विनोदाची ऐसी तैसी":
😢😢 सोनी हास्यजत्रेचा अक्षरशः सततचा उबग आणणारा हास्यास्पद आविष्कार "अती तेथे माती" असाच आहे. 😢😢 "अति तेथे माती" वरून मला माझा एक जुना अनुभव आठवला. पुष्कळ वेळेला आपल्याला एखादे पदार्थ खायला खूप आवडतात, म्हणून ते नको इतके खाल्ले जातात आणि त्यामुळे पोट बिघडून चार-पाच दिवस बिछान्यावर पडायची वेळ येते. माझ्या बाबतीत हे असे अनेक वेळा झाले आहे. कारण नसताना जास्त खाऊन पोटावर ताण दिल्याने, ही वेळ आली. तीच गोष्ट 'हास्यजत्रे'च्या बाबतीत ठरते. करमणूक करणार्या मालिका अधून मधून दाखवायच्या ऐवजी हा जो बाष्कळ हास्याचा मारा, त्याच त्याच कलाकारांच्या आविष्कारातून दाखवण्याचा अट्टहास केला जातो, तो कां ते खरंच कळत नाही. प्रोग्रॅमिंग करणारे जे कोणी असतील ते याचा विचार करतील, तर चांगलं. कदाचित त्यांच्याकडे मालिकांचा तुटवडा असू शकतो.
झी वरील "चला हवा येऊ द्या" च्या बाबतीतसुद्धा अगदी हेच असेच चालू आहे. विनोदाचा अतिरेक किती करायचा, कां आणि कसा करायचा, याचे तारतम्य सुटले ही पूर्वी लोकप्रिय असलेला हा कार्यक्रम सहाजिकच, आता बहुसंख्य प्रेक्षकांच्या मनातून उतरत चालला असेल.
सरते शेवटी....
"जुने ते सोने, हेच खरे !":
दर रविवारी नेहमीप्रमाणे कार्यक्रम, छोट्या पडद्यावर नसतात, हे लक्षात न आल्यामुळे वेगवेगळ्या कमर्शिअल वाहिन्यांवर सर्फिंग करून झाले. तिथे आठवड्याच्या मालिकांचा रतीब मनपसंत नसल्यामुळे, सहज चुकून सह्याद्री वाहिनीवर रिमोट नेला गेला आणि अवचित आश्चर्यकारक नवल घडले ! तिथे माननीय विद्याधर गोखले आणि भालचंद्र पेंढारकर या मराठी संगीत रंगभूमीला पुनरूज्जीवन देणाऱ्या असामान्य जोडीच्या योगदानाचा, परिचय करून देणारा "एकमेवाद्वितीयौ" हा अप्रतिम कार्यक्रम पहायला मिळाला. जुन्या काळात आणि संगीतमय वातावरणात घेऊन जाणारा तो मंगलमय कार्यक्रम, ज्ञानेश पेंढारकर आणि शुभदा दादरकर यांनी समर्थपणे सादर केला होता. शिवाय त्याबरोबर नवीन तरुण गायक गायकांनी संगीत नाटकांमधील मधुर नाट्यसंगीते गाऊन, श्रोत्यांचे कान त्रुप्त केले. खूप दिवसांनी एक आनंदमयी संगीत कार्यक्रम पाहायला मिळाला हे आमचे भाग्य. दूधात साखर अशी की, त्यापाठोपाठ "मैत्र हे शब्दसुरांचे" हा कार्यक्रम देखील असाच नाट्यसंगीतावर बेतलेला होता.
शेवटी "जुने ते सोने" हेच लक्षात येते आणि कमर्शियल वाहिन्यांपेक्षा, मुंबई दूरदर्शन अर्थात सह्याद्री वरील कार्यक्रम बहुशः कां दुर्लक्षिले जातात हे कळत नाही.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
असेच वाचनीय लेख वाचण्यासाठी........
ही लिंक उघडा...........
https://moonsungrandson.blogspot.com
लेख आवडला.......
तर लिंक शेअरही करा.......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा