शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

"कावा, कामि!":


 "कावा, कामि":
या शीर्षकाचा पुढे खुलासा होईलच. मुद्दा असा की आज सहज दुपारी चांगले भोजन करून वामकुक्षी करण्याकरता बिछान्यावर मी आडवा पडलो असताना, नेहमीच्या सवयीने सोशल मीडिया मधील एका सोमि स्नेह्याचा संदेश- "विचारशलाका" वाचला.

पाहता पाहता चार वेगवेगळ्या अनुभवांवर त्यात मनातील घडामोडी सहजपणे येथे शब्दात मांडल्या होत्या. केवळ संवेदनशील आणि प्रतिभावान माणूसच जे जे अनुभवत जात असतो, त्याचे असे मागे वळून परीक्षण करत, निरीक्षण नोंदवू शकतो.

ह्या स्नेह्याने मांडलेल्या चार विचारशलाकांमुळे माझेही तसेच झाले. काय वाचले आणि त्यातून काय मिळाले, ते मी आजमावून पाहू लागलो. त्या प्रेरणेतून हा ह्रदयसंवाद घडवत आहे. सहाजिकच आता, त्याला "कावा कामी" हे नाव कां देत आहे ते उमजले असेलच.

"स्पंदन एक":
खोट्या प्रतिष्ठेचेमध्ये माणूस स्वतःचे खूप नुकसान करून घेत असतो हे खरेच आहे. अहंकार हा अंगारासारखा, त्याकरता कारणीभूत असतो. भूतकाळात रमणं आणि त्यात बढाया मारणं हेच त्याला भूषण वाटत जातं. त्यामुळे वर्तमान हातातून निसटत असतो हे बहुतेक माणूस विसरतो.

आपणही आपल्या देशाचा पूर्वेतिहास किती उज्वल किती रोमहर्षक होता, श्रेष्ठ होता, ह्यामध्ये असेच गुरफटून घेत आलो आहोत, नाही कां? भूतकाळ हा वर्तमान कधीच घडवू शकत नाही. जर अशा रीतीने त्यात आपण बुडून गेलो, तर शेवटी हीदेखील एक गुलामीच नाही कां? आपल्या दैदिप्यमान पुराणातील इतिहासाकडे सातत्याने बघत, आपण वर्तमान काळाकडे दुर्लक्ष, किती काळ व कां म्हणून करत रहाणार?

"स्पंदन दोन":
हसरी मुद्रा खरोखर आनंददायी हे खरेच, परंतु सध्याच्या धकाधकीच्या स्पर्धेच्या जीवनात, माणूस असा किती वेळा हसतो हे पाहण्यासारखे आहे. कदाचित दिवसातून आपण किती वेळा हासू शकतो अथवा हसण्याचे प्रसंग आले, हे ज्याचे त्याने अंतर्मुख होऊन पहावे. कदाचित उत्तर शून्य किंवा एक दोनच असेल. त्यामुळे "सुहास्यवदनाने मोही मना" हे केवळ सध्याच्या काळात कल्पनेतच राहू शकते, एखाद्या स्वप्नाप्रमाणे!

"स्पंदन तीन":
कां जगायचं? हा प्रश्न कुणालाही केवळ सामान्यपणे जेव्हा माणूस पराकोटीचा निराश होतो आणि कोणतेच मार्ग त्याच्यासमोर नसतात त्यावेळेलाच निर्माण होतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे कां जगायचं असा प्रश्न नेहमीच्या जीवनामध्ये उदभवतच नसतो. माणूस जसे जमेल, तसा आपला जगत असतो आणि अशा प्रश्नाचं उत्तर शोधण्याची वेळच त्याच्यावर येत नसते. त्याकरता जेव्हा त्याच्या यातनांचा कडेलोट होईल तेव्हाच हा प्रश्न योग्य. आणि अशा वेळी, एखाद्या स्वरसम्राज्ञीच्या मधूर गीताचे श्रवण केल्यास, माणूस त्या न परतीच्या वाटेवरुन तो परत येऊही शकतो, अन् कां कशासाठी जगायचं, त्याचे उत्तर त्याला मिळू शकते.

"स्पंदन चार":
संवय मग ती कोणतीही असो, चांगली किंवा वाईट, ती एकदा लागली की सहसा सुटत नाही. त्यांतून तिची जर चटक लागली तर माणूस पाहता-पाहता व्यसनाधीन कधी होतो ते त्याचे त्याला उमजतही नाही!

आतापर्यंत वाईट गोष्टींच्या सवयी ह्याच वाईट समजल्या जायच्या. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा महिमा असा की, मोबाइल व्हाट्सअप सोशल मीडिया हे त्रिकुट खरं म्हणजे सकारात्मक असे काही घडवण्याची जादू , परंतु तरीदेखील जेव्हां या त्रिमूर्तीचे जेव्हा व्यसन लागते, तेव्हा त्याच्याशिवाय आपण क्षणभरही दूर राहू शकत नाही. सहाजिकच त्यातून अनेक दुष्परिणाम, मानसिक रोग देखील होतात. ते व्यसन इतके दाहक की, चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखा माणूस ह्या तंत्रनशेतून क्षणभरही बाहेर येऊच शकत नाही.

काळाचा हा महिमा म्हणायचा किंवा तंत्रज्ञानाचा अतिरेक! कदाचित माणूस जितका भौगोलिकदृष्ट्या जवळ येतोय या तंत्रज्ञानामुळे, तितकाच सध्याच्या धकाधकीच्या आणि नातेसंबंध दुरावण्याच्या काळात तो एकटा पडत चालला आहे. अशा एकटेपणात हे तंत्रज्ञानच त्याची साथ करते. म्हणून तो कळत-नकळत या तंत्रज्ञानाचा कायमस्वरूपी सहप्रवासी होतो हेही खरे.

शेवटी माणसाने आपली बुद्धी वापरून कुठे थांबायचे ते ठरवून या तंत्रज्ञानवापराचा अतिरेक करू नये हे उत्तम!

सुधाकर नातू
माहीम, मुंबई१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा