रविवार, २८ एप्रिल, २०१९

"ह्रदयीची स्पंदनं!":


"ह्रदयीची स्पंदनं!"

"आपणच आपल्या भवितव्याचे शिल्पकार":

बदलत्या परिस्थितीची भेदक वास्तवता व आव्हाने, खुल्या मनाने न स्वीकारता, सारे काही आलबेल आहे, असे उसने अवसान कितीही आणले तरी, शेवटी जे होणार असते, ते कधीही कुणालाही चुकवता येत नाही.

कारण बदललेली कसोटी पहाणारी परिस्थिती, ही शेवटी आपल्याच कर्माची फलनिष्पत्ती असते!

--------------

"अति तेथे माती!"

आपण आपल्याच मस्तीत, आपलेच गुणगान ऐकायला मिळावे, ह्या लालसेपोटी एखाद्या प्रवाहपतितासारखे केव्हां कसे वाहवत जातो, ते आपले आपल्यालाच कळत नाही........

कुठे थांबायचे, कसे व कां, तेच आपल्याला कळत नाही, आणि त्यातून गर्व, अहंकार इतका काही फुलतो की, अखेर आत्मनाश होणे, किती जवळ आले, ते आपल्या खिजगणतीतही नसते.......

प्रत्येकाला मर्यादा असतात. आपण आपल्याज मर्यादा न ओळखता, असा अट्टाहास जर केला, तर तो सहन केला जात नाही आणि अखेरीस नकारघंटा सगळीकडून केव्हा वाजायला लागतात, ते समजतही नाही........

म्हणून जागे व्हा, जागे रहा.
लक्षात असूं द्या:
"अति तेथे माती"!

-----------------

"नळी फुंकली सोनारे....":

अनेक सुविचार, तसेच ओघवत्या भाषेतील, तर्काला पटेल अशा शब्दातील सोदाहरण विवेचने, आपल्या वाचनात येत असतात. ती वाचून आपल्याला तात्पुरती कां होईना, विलक्षण स्फूर्ति येते आणि ते मार्गदर्शन ताबडतोब अनुसरून, आपल्यात प्रगतीपर बदल करावासा वाटतो.

सर्वसाधारण अनुभव हा तेरड्याचा रंग तीन दिवस ठरतो! ह्यास्तव कालातीत खंत अशी की, ही मार्गदर्शक प्रवचने, सुविचार व्यवहारात प्रत्यक्ष आणणे जवळ जवळ अशक्य ठरत असतात. म्हणूनच बहुधा "आयकॉनस्" दुर्मिळातले दुर्मिळ निर्माण होतात. अखेरीस असे सारे मौल्यवान विचारधन हे,
"नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे" असेच होऊन जाते.

-------------

"फसत चाललेला खेळ":

वर्तमानांत पायाखाली काय जळतंय ते पहायचं सोडून आणि जमिनीवरील विस्कटत चाललेली घडी नीट करण्याचे सोडून, कधीही प्रत्यक्षांत न येणारी स्वप्नांची गायब झाल्यामुळे, मुलभूत प्रश्न वार्यावर सोडून, कसाही भरकटणार्या प्रचाराचा खेळ करणारे, हे विसरताहेत की:

'You can fool some people for all the time or all the people, for sometimes, but you just can't fool all the people for all the time.'

-- -------------

सामान्य वकुबाची माणसे, अधिकारपदांवर असली की, धोरणे व नियोजनांत हलगर्जी आणि अंमलबजावणींत सावळा गोंधळ तर होणारच! अशा वेळी, तहान लागली, की विहीर खणावयाची, दुसरे काय करणार?

--------------

"ह्याला जीवन ऐसे नांव!":

जीवनाच्या रँट रेसमध्ये, माणसाला हवी हवीशी असलेली गोष्ट मिळणे, जेवढे दुरापास्त असते त्याहीपेक्षा ती गोष्ट, जेव्हा हवी त्याच वेळी मिळणे, हे महाकर्म कठीण असते.
म्हणूनच समाधानी माणसांपेक्षा, असमाधानी माणसांचेच जास्त प्राबल्य जगामध्ये असते.

---------------

"एक अनुभव":
"केवळ छापील पुस्तकेच कां?:

"पुस्तक प्रेमी" हा समूह प्रामुख्याने वाचनाची ज्यांना आवड आहे आणि नवनवीन तर्हेचे वाचन करायला मिळावे हा हेतू असलेला समूह असावा असा माझा समज होता आणि आहे.

एकदा वाचन हा समुहाचा मूळ गाभा मानला की, केवळ छापील पुस्तक हेच वाचनाचे माध्यम असे मान्य करणे, बदलत्या तंत्रयुगाच्या काळात कितपत योग्य, असे मला वाटते. त्यामुळे डिजिटल असे काही जर निर्माण होत असेल, लेखन निर्माण होत असेल,तर त्याचीही दखल समुहाने घेतली जाणे आवश्यक ठरावे अशी माझी धारणा होती.

त्या हेतूने मी माझ्या विविध लेख प्रयत्नांचा संच ह्या दृष्टीने "रंगांची दुनिया" संदर्भात अधिक माहिती व्हावी आणि वाचक निर्माण व्हावे ह्या हेतूने संदेश लिहिला होता. तो आपण काढून टाकला.

हा तुमचा हक्कच आहे यात वाद नाही, परंतु नाण्याची दुसरी बाजू देखील समुहातर्फे विचारात घेतली जावी, या हेतूने मी हा संदेश लिहित आहे.

केवळ छापील पुस्तकांसाठी जर हा समूह असेल तर मला तसे कळवावे, मी हा समाज सोडून जाऊ शकेन.
धन्यवाद.

--------------

"सत्तेचे गुलाम":

सत्तेचं राजकारण पहाता पहाता, काँर्पोरेट कल्चर अनुसरताना दिसत आहे. जसे कोणत्याही कंपनीत आपले भवितव्य तितकेसे समाधानकारक नाही, म्हणून महत्वाकांक्षी माणसे, ह्या कंपनीतून त्या कंपनीत, अशा उड्या मारत अल्पावधींत अधिक सत्ता, अधिकार आणि संपत्ती प्राप्त करतात, तसेच धोरणी व मुरब्बी राजकारणी आयाराम, गयारामचा खेळ खेळताना दिसतात.

काँर्पोरेटमध्ये, निदान उघड, उघड वैयक्तिक विकास व प्रगती अन् भरभराट हा हेतू असतो; मात्र राजकारणांत तसे न दर्शविता, ह्या इथून तिथे अशा उड्या, आपण केवळ जनतेचे हित व अधिक गतिमान विकास व्हावा, म्हणून मारत आहोत, असा आव आणला जातो.

विशिष्ट ध्येये, तत्त्वे आणि प्रामाणिक निष्ठा, ह्या सत्तेसाठीच्या पक्षीय राजकारणांतून पार हद्दपार झालेल्या त्यामुळेच दिसतात. मात्र दुर्देव एवढेच नाही, तर ह्या सार्या विधीनिषेधशून्य व स्वार्थाने बरबटलेल्या खेळांचे कुणालाच-ना तो करणार्यांना काही वाटत नाही अथवा बहुदा, तो उघड्या डोळ्यांनी पहाणार्या सर्वसामान्य जनतेलाही त्याचे काहीच वाटत नाही, समजा चुकून खंत वाटली, तरी काहीही फरक पडत नाही हे!

उत्तरोत्तर हा आयाराम गयारामचा तमाशा अधिक वेगाने व बिनदिक्कतपणे वाढत जाणार आहे आणि सत्तेसाठीचे राजकारण हे राजकारण न रहाता, फक्त फायदे व तोटे बघणारा व्यावसायिक व्यापार-उद्द्योग बनणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि सर्वांसाठीचे हित व विकास हे शब्द इतिहासजमा होणेही, आता कदाचित् फार दूर नाही.

---------------

"व्यावसायिक आणि समांतर सिनेमा°:

जो पहात असताना, विचार करायला न लागता, कुणालाही समजू शकतो, तो व्यावसायिक सिनेमा; तर, जो पाहूनही फक्त विचार करूनच, काही मोजक्यांनाच समजू शकतो, तो समांतर सिनेमा, अशी म़ाझी तरी माझ्यापुरती समजूत आहे. समांतर रेषा जशा जगाच्या अंतापर्यंत एकमेकींना मिळत नाहीत, तद्वतच समांतर सिनेमा आणि सामान्य प्रेक्षक, ह्यांचे एकमेकांशी जुळत नाही.....

-------------

"जागते रहो":

काळाच्या ओघात गेल्या शेकडो वर्षात बदललेल्या वास्तवाकडे काणाडोळा करुन, इतिहासाचे चक्र उलटे फिरविण्याचा अट्टाहास अखेरीस सर्वनाशास कारणीभूत ठरेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

"जगा आणि जगू द्या" अशी आस धरू पहाणार्या भवतालासाठी, असे एकांगी एककल्ली विचार घातक आहेत ही जाणीव ठेवली तर तो शहाणपणा ठरेल.

"वारसा, खालसा!":

नामवंत घराण्याचा मूळ पुरुष जितका धोरणी, कर्तबगार व नेत्रुत्वगुण, दूरद्रुष्टि असणारा असतो, तेवढे व तसे कार्यक्षम त्याचे नंतरचे वारसदार अभावानेच निपजतात.

राणा भीमदेवी थाटाने अशा वारसदारांनी कितीही वल्गना केल्या, तरी केव्हा ना केव्हातरी त्यांचे पितळ उघडे पडतेच.

कुठल्याही क्षेत्रातील नावाजलेल्या घराण्यांची घसरगुंडी, जरी लगेच दुसर्याच पिढीत झाली नाही, तरी तिसर्या वा चौथ्या पिढीनंतर र्हास सुरु होतो, ह्याला इतिहास साक्ष आहे.

--------------

"हे" असे,
तर "ते",तसे,
सांगा,
"आम"चे व्हायचे कसे?
"असे, की, तसे?
की, असेतसेच!"

----------------

"आहे, कां काही वेगळा उपाय?":

मोबाईलचे अनंत उपयोग आहेत, ह्यांत वाद नाही.
पूर्वी बरं होतं आपण टेलिफोन डायरी ठेवायचो. त्यामुळे आपल्याला जर काही काम असेल, तर ते नंबर आपल्याला शोधून सहज सापडायचे. परंतु मोबाईलमध्ये संग्रहातील नंबर आपण कोणत्या नावाने तो संग्रही ठेवला, हे लक्षात ठेवले जातेच असे नाही.

विशेषत: ज्या वेळेला ग्रुहोपयोगी उपकरणांचा काही त्रास होतो आणि त्यासंबंधीची तक्रार आपल्याला करायची असते, किंवा त्या तक्रारीचा पाठपुरावा करायचा असतो, तेव्हा तो संग्रही असलेला नंबर आपल्याला जर अचूक कोणत्या नांवाने तो नंबर आपण संग्रहात ठेवला होता, हे जर आठवले नाही, तर आपली खूप पंचाईत होते. काही केल्या आपल्याला तो नंबर मिळत नाही आणि आपली समस्या जिथे असते तिथेच राहते. मला हे असे अनुभव अधूनमधून सोसायला लागलेले आहेत.

मोबाईलचा वापरताना ही जी त्रुटी आहे, तिच्यावर काय उपाय?:

ह्यावर मला सुचलेली कल्पना ही, की आपण कोणताही नंबर संग्रही ठेवल्यावर, लगेच त्यावर एक missed call करावा. त्यामुळे नंतर केव्हाही तो नंबर आपल्याला, शोधणे सोपे होईल.

--------------

सुधाकर नातू




गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

‘रंगांची दुनिया’:खास नववर्ष अंक !

‘रंगांची दुनिया’: 
"मनोगत": 
आज गुढीपाडवा ह्या नववर्षदिनी माझा "रंगांची दुनिया" हा खास नववर्ष अंक सादर करताना मला जो आनंद होत आहे, तो शब्दात सांगता येणार नाही. सुमारे अडीच वर्षापूर्वी मुलाने मला स्मार्टफोन बक्षिस म्हणून दिल्यानंतर, एखाद्या प्रौढत्वी निज शैशवास जपणाऱ्या माणसाप्रमाणे, मी सहजसुलभ कुतुहलाने अनेक गोष्टी त्यावर शिकत गेलो आणि पाहता पाहता मराठी मधून संदेश लिहिणे, ते अनेक लेख लिहिणे, तेथून स्वतःचा ब्लॉग तयार करणे आणि त्यावर दोन दिवाळी अंक आणि एक इंग्रजीमधला नववर्ष अंक प्रकाशित करणे, मी साध्य केले. म्हणूनच आता खास साहित्य नाटक सिनेमा आणि मालिका तसेच खमंग मसाला म्हणून ज्योतिष ह्या विषयांवर वाहिलेला "रंगांची दुनिया" हा माझा अंक मी सादर करत आहे. पूर्वीच्या सर्वच अंकांना जो भरभरून प्रतिसाद मला तुम्ही दिलात मिळाला, तसाच प्रतिसाद आताही मिळणार आहे, अशी मला खात्री आहे. जाता जाता एक सहज सुचलं म्हणून एक सुविचार देऊन जातो: 

"दिसतं तसं नसतं, आणि म्हणून जग फसतं! 
पहिली फसवणूक ही एक सुधारण्याची संधी, 
पुन्हा फसाल, तर ती मूर्खपणाची घोडचूक असते! 
म्हणून, 
जागे व्हा, जागे रहा; जाणते व्हा, आणि जाणतेच रहा!" 

नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 
 धन्यवाद 
सुधाकर नातू 6/4/2019 अ

नुक्रमणिका: 
१."जन्मगांठीचं रहस्य!" 
२. अबीर गुलाल" 
3. ऋतुरंग' दिवाळी अंक"१८:रसास्वाद: 
४. “मौज" दिवाळी अंक'१८: रसास्वाद: 
५. "दाद, प्रतिसाद व संवाद!": 
६. "नाद, हा खुळा!": 
७. "प्रेरणादायी दिशादर्शक 'आनंदी गोपाळ'": 
८. "तिला काही सांगायचयं":एक गंभीर संशयकल्लोळ!: 
9."वाहता वाहे, 'मालिका'माई"!: 
10."राहू व केतूच्या राश्यंतराचे परिणाम": 
11. "सहज सुचले ते ते"!:
 ====================================================== 
 1."जन्मगांठीचं रहस्य!": 
जीवनात कधी कधी असे अनुभव येतात की, काही विवाह एखादा धक्का देऊन जमलेले दिसतात व तेव्हा आपल्याला जन्मगांठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात, यावर विश्वास बसतो. बहुधा, प्रत्येकाचा विवाह हा कादंबरीपेक्षा चमत्कृतीपूर्ण घटनांनी, तुम्हाला कल्पनाही येणार नाही अशा रितीने जमतो. बहुतांश विवाह जमण्यात, कोणता तरी एकमेकांशी संबधीत व्यक्ती किंवा घटना अथवा जागा ह्यांचा अतर्क्य असा गूढ संबध असतो किंवा त्यामागे काहीतरी पूर्वाश्रमीची इच्छा असू शकते. असा निष्कर्ष मी कसा व कां काढला असावा? तर त्याचे असे झाले की ह्या विषयावर एका ज्योतिषी मित्राबरोबर गप्पा मारत असताना, तो मला म्हणाला की, त्याच्या मुलाचा विवाह कुणालाही नवल वाटेल अशा तर्हेने जुळून आला. होता. आमच्या गप्पांत, माझ्या मित्राने त्या चमत्क्रुतीपूर्ण जन्मगांठीची सांगितलेली गोष्ट उदाहरण म्हणून, मी त्याच्याच शब्दात थोडक्यात येथे सांगतो : 
"जन्मगांठीचं रहस्य!": "
तेव्हा माझा मुलगा उत्तम शिक्षण पार करून चांगल्या नोकरीत सेटल झाला होता. सहाजिकच त्याचा विवाह जुळविण्याच्या प्रयत्नात आम्ही होतो. आमच्या घरी अशाच एका संध्याकाळी, एक ग्रहस्थ अचानकच आले. आमच्याकडे येण्याची काहीही पूर्वसूचना त्यांनी दिली नव्हती व एखाद्या आंगतूकासारखे ते आले होते. तेव्हा आम्ही कुठेतरी बाहेर जाणार होतो. तो शनीवारचा दिवस होता आणि माझ्या मुलीचा विवाह नुकताच झालेला असल्यामुळे आणि ती दोघं, महाबळेश्वरला जाणार असल्यामुळे आम्ही गडबडीत होतो. येता येताच, मी नको नको म्हणत असताना, त्या ग्रहस्थांनी माझ्या हातात त्यांच्या मुलीच्या पत्रिकेचा कागद टेकवला. नंतर मी आतल्या खोलीत बसलेल्या माझ्या मुलाला तो दाखवला. पण त्यावरील माहीती पाहून तो मला म्हणाला "त्यांना आत्ता नको असे कळवा व काही करून जायला सांगा". आम्ही गडबडीत असूनही हा माणूस आमचे काही ऐकत नाही आणि आमच्या हातात मुलीची पत्रिका बळेबळेच टेकवितो, याचा मलाही तसा रागच आला होता. त्यामुळे बाहेर येऊन मी कशीबशी त्या माणसाची बोळवण केली. नंतर मुलाशी गप्पा मारताना लक्षात आले की, तो जिथे कामाला होता, तेथे एक मित्र होता त्याच्या बरोबर काम करणारा, त्याचीच ही मुलगी चुलत मेहुणी होती. त्यामुळे उद्या आपण जर ह्या मुलीला कदाचित नकार दिला, तर मित्राबरोबरचे आपले संबंध बिघडू शकतील असे वाटल्याने, तो त्या गृहस्थांना नको सांगून, बाहेर पाठवा असे म्हणाला होता. दुसरा दिवस रविवार होता. सकाळी मी सहज म्हणून त्या मुलीची पत्रिका हातात घेतली अन् नजर टाकताच मला स्वग्रहीचा गुरु लग्नस्थानी असलेला दिसला. हा एक अत्यंत शुभयोग असल्याने मी प्रभावित झालो व लगेच वेळ न दवडता, ती पत्रिका माझ्या मुलाच्या पत्रिकेशी जुळते कां ते अभ्यासिले. आता आश्चर्य करण्याची पाळी माझी होती! त्या दोन्ही पत्रिका उत्तम जुळत होत्या. अचानक मला वाटू लागले की, काही झालं तरी ह्या मुलीला पहाण्यासाठी आम्ही जायलाच हवे. अनायसे तो रविवार होता, आणि त्या दिवशी दुसरी कोणतीच एंगेजमेंट आमची नव्हती. मी वेळेचा आपण नेहमी अचूक उपयोग करावा असे व्यवस्थापन मॅनेजमेंटची आवड असल्यामुळे वाटणारा माणूस, त्यामुळे मी ठरविले की why waste this Sunday, आपण आजच सायंकाळी त्या मुलीला पहायला सगळ्यांनी जाऊ या! मी लगेच फोन उचलला आणि त्या गृहस्थांना सांगितले:"काल तुम्ही आम्हाला, जी पत्रिका दिली ती तुमच्या मुलीची पत्रिका, माझ्या मुलाच्या पत्रिके बरोबर जुळते. त्यामुळे आज संध्याकाळी आम्ही तुमच्याकडे मुलगी बघायला येऊ कां?" आता, गंमत बघा, काल नको नको म्हणत नकार दिला आणि ज्यांची बोळवण केली, त्यांनाच आज मी सांगत होतो की आम्ही तुमच्याकडे येतो! कोणता मुलीचा बाप असा प्रश्न विचारल्यावर, तुम्ही येऊ नका म्हणून सांगेल? सहाजिकच त्यांनी आम्हाला जरूर या असे सांगितले. आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्याकडे मुलगी बघायला गेलो. मुलाने मुलगी पाहणे वगैरे प्रोग्राम झाला आणि गंमत अशी की मुलाला मुलगी पसंत पडली! यथावकाश त्या दोघांचा विवाहही झाला. जन्मगांठीचं रहस्य खरोखर गुढ असतं हे जे मी म्हणतो ते यामुळेच! जी पत्रिका नको म्हणून नाकारत होतो आणि जे गृहस्थ कधी एकदा बाहेर जातात असे आम्हाला वाटत होतं, त्यांच्याच मुलीशी माझ्या मुलाचं लग्न ठरलं गेलं! होत्याच नव्हतं होतं, तसंच नव्हत्याचं होतं, सुद्धा अशा योगायोगाने होऊ शकतं, हा अनुभव ह्या विवाहजुळणीच्या कहाणी वरून मला ध्यानांत आला. ह्या घटनेपायी, सहाजिकच मला नवल वाटलं की, असं का व्हावं? मी विचार करू लागलो. नंतर काही दिवसांनी मला ध्यानात आलं की, माझे वडील आणि आम्ही सगळे कुटुंबीय ज्या बरॅक्स मध्ये रहात होतो, त्या तोडून तिथे एखादी सहकारी सोसायटी बनवून इमारत बांधायचा यशस्वी प्रयत्न केला गेला होता. आपल्या आयुष्याची सारी पुंजी, आपल्या स्वतःच्या सदनिकेत माझ्या वडिलांनी घातली होती. त्या इमारतीसाठी जो प्लॉट या सोसायटीला मिळाला तो ह्या मुलीच्या आजोबांचा होता! गंमत बघा ज्या आजोबांच्या प्लॉटवरील इमारतीत ज्यांची सदनिका होती, त्यांच्याच नातवाशी त्यांच्या नातीचा पुढे विवाह जुळला. विवाहानंतर माझ्या मुलाची उत्तरोत्तर खूप भरभराट झाली आणि आता त्याचे चौकोनी कुटुंब युरोपमध्ये चांगले स्थायिक झाले आहे!" ह्या रंजक कहाणीवरुन आपली खात्री होऊ शकते की, "जन्मगांठी स्वर्गात जुळतात"हे काही उगाच म्हंटले जात नसावे. आपल्या संस्कृतीमध्ये सात जन्म हाच नवरा मिळू दे अशी जी प्रार्थना केली जाते आणि तसंच होतं अशी समजूत आहे, ती सुद्धा कदाचित खरी असावी. मुलाकडचे किंवा मुलीकडचे कुठल्या ना कुठल्या प्रकारे जागेमुळे म्हणा किंवा माणसांमधल्या संबंधांमुळे म्हणा, काहीना काहीतरी पूर्वी ऋणानुबंध जुळलेले असतात अन् पुन्हा पुन्हा जन्मोजन्मी अशाच प्रकारे जन्मगांठी जुळून येतात, असंच म्हणायचं कां या कथेवरून? तुम्ही स्वत: विचार करा आणि बघा, वेगवेगळे विवाह कसे जमले ते. त्यामध्ये एकमेकांशी अशा तऱ्हेचे ऋणानुबंध पूर्वी होते कां याचा अभ्यास करा. मला खात्री आहे की, त्यांत काहीतरी तथ्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर असे आहे जन्म गाठीचे रहस्य! ह्या लेख मालिकेमध्ये, मी म्हणूनच अशा तर्हेच्या रंजक आणि चमत्कृतीपूर्ण विविध विवाहजुळणीच्या कहाण्या तुम्हाला सांगणार आहे. धन्यवाद. सुधाकर नातू. 

2."अबीर गुलाल" 
कुठल्याशा एका दिवाळी अंकात श्री. मधु मंगेश कर्णिक यांच्यावरील विविध लेख माझ्या वाचनात आले. आता त्या दिवाळी अंकाचं नाव आठवत नाही, पण मधु मंगेश कर्णिक यांनी जे साहित्य निर्माण केले त्याची नोंद मात्र मी तेव्हां घेतली होती. मला व्यक्तिचित्रात्मक पुस्तक वाचायला खूप आवडतात आणि त्यामुळे मधु मंगेश कर्णिक यांच्या कादंबऱ्यांपेक्षा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रात्मक पुस्तकांबद्दल मला कुतूहल आणि आकर्षण निर्माण होते. त्यातील "लागेबांधे" आणि "अबीर गुलाल" गुलाल ह्या दोन पुस्तकांची नांवे मी लक्षात ठेवली होती. योगायोगाने लायब्ररीत गेलो असताना, तिथे "अबीर गुलाल" हे पुस्तक मिळाले. ताबडतोब घरी येऊन ते वाचायला सुरुवात केली आणि अक्षरशः दोन दिवसात ते वाचून संपवले पण! हे पुस्तक म्हणजे विविध प्रकारच्या आणि प्रवृत्तीच्या माणसांचा एक शोभादर्शक आहे. येथे, त्यांच्या सान्निध्यात आलेल्या निवडक व्यक्तींची श्री. मधु मंगेश कर्णिक ह्यांनी त्यांच्या मनावर उमटलेली भावचित्रे रेखाटली आहेत. त्यात त्यांचे शाळेतील साळवी मास्तर, मॅजेस्टिक प्रकाशन आपल्या कर्त्रुत्वाने नावारूपाला आणणारे केशवराव कोठावळे, आपल्या रंगतदार गोष्टींनी त्या काळात सर्व समाजाला मोहवून टाकणारे कशेळीसारख्या आडगांवात चार दशके रहाणारे एकमार्गी वि. सी. गुर्जर, तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि कर्णिकांचे जवळचे आप्त क्रांतिकारक भास्कर कर्णिक ह्यांची ह्या पुस्तकात मर्मस्पर्शी ओळख होते. त्याचबरोबर एकला चालो रे असे जीवन जगणारे गांधीवादी अप्पा पटवर्धन, मराठी कवितेला, साहित्याला नक्षत्रांचे देणे अर्पिणारा, चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभु ह्यांचेही नाट्यमय जीवनविशेष आपल्याला ह्या पुस्तकात अनुभवता येतात. गोव्याच्या भूमीत लहानाचे मोठे झालेले व गोव्यावर मन:पूत प्रेम करणारे दोन सुपुत्र, कवीराज बा. भ. बोरकर आणि व्यक्तीत्वाला चपखल असे नांव असलेले दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर ह्यांची अगदी जवळून पुस्तकात ओळख होते. एक वेगळी अशी बाब म्हणून, माझ्या आठवणींप्रमाणे, कोणे एके काळी सायनच्या शाळेमध्ये शिक्षिका असलेल्या सुमतीबाई देवस्थळे ह्यांचे अत्यंत हृदयस्पर्शी असे दर्शन एका छोटेखानी लेखात होते. ही व इतर व्यक्तीचित्रे म्हणजे स्वतंत्र कादंबर्या शोभतील अशी जीवनचित्रे आहेत. तो तो काळ, ती ती माणसे व तेव्हांचा समाज आपल्यापुढे पुनश्च जीवंत होतो आणि आपले भावविश्व अधिकच सम्रुद्ध होते. ही किमया मधुभाईंच्या सिद्धहस्त लेखणीची आहे. खरोखर कर्णिकांचे सूक्ष्म निरीक्षण, मनाचा निखळ ठाव घेणारी, माणसे जोडणारी आपुलकी त्यांच्या मायाळू भाषेतील जिव्हाळ्यातून प्रकट होते. त्यामुळे हे पुस्तक वाचणे हा एक खरोखर आनंददायी अनुभव भासला. ज्यांनी कोणी हे पुस्तक अजून वाचले नसेल त्यांनी जरूर वाचावे. माझ्या वाचनात तसं म्हटलं तर हे पुस्तक खूपच उशिराने आले हेही खरे! मला भावलेल्या पुस्तकांची अशीच ओळख आपणास नियमितपणे करून देण्याच्या नववर्षाच्या माझ्या संकल्पाची ही सुरुवात आहे. सुधाकर नातू, माहीम मुंबई १६ 3.“ऋतुरंग' दिवाळी अंक"१८: "आशावादी बहुढंगी, बहुआयामी इंद्रधनुष्य!:: "काय काय सांगू, कसं बरं सांगू"! तुम्हाला काय सांगू आणि काय नाही असं मला होऊन गेलेले आहे. काही दिवस असे उगवतात की, एखाद्या मिडास राजाला जसं हात लावीन तिथं सोनं व्हायचं, तसं मला नाटक सिनेमा आणि वाचन ह्यात जे काही समोर येईल ते अत्यंत उत्कृष्ट अविस्मरणीय असते. ह्या आनंदयात्रेची रूजूवात "परफेक्ट मर्डर" या नाटकाने झाली. त्यानंतर "तिला काही सांगायचंय!", ह्या नाटकाने तिच्यावर कडी केली. पुन्हा हे पूर्ण नाही म्हणून की काय त्यानंतर पाहिलेला "भाई" हा चित्रपट आम्हाला दोघांना खूप खूप आवडला. हे त्यासाठी मी म्हणतो की माझी पत्नी नेहमी नाटक किंवा सिनेमा ला गेली की पुष्कळदा बराच वेळ झोपून जाते. मात्र हा असा पहिला चित्रपट कदाचित खूप दिवसांनी असेल की, ज्यात ती क्षणभरही झोपी गेली नाही व खरोखर तिला इतका आवडला की त्याचा पुढचा भाग कधी येतो याकडे आम्हा दोघांचे लक्ष लागले. बरं एवढं झाल्यावर नंतर, वाचनाच्या बाबतीत सुद्धा दोन अशा काही गोष्टी समोर आल्या की त्यामुळे माझ्या आनंदाला, समाधानाला पारावार उरला नाही. Just out of the World, अशा अदभूत अवस्थेचा मला अनुभव आला. पहिलं वाचनासाठीचं पंचपक्वान्न "The Week Anniversary Double isdue" च्या रूपात आले! तर त्याच्यावर कळस "ऋतुरंग" दिवाळी अंक'१८ ने चढविला. हा खरोखर कमालीचा असा दुग्ध शर्करा योग होता म्हणूनच मी म्हणतो की मला काय सांगायचं आणि काय काय तुमच्यापुढे मांडायचं असं होऊन गेलं आहे. इतक्या लांबलेल्या नमनानंतर, मी ऋतुरंग ह्या अंकाविषयी माझ्या मनात जे काही तरंग उमटले ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आपणही न विसरता वरील दोन्ही अंक मिळवावे आणि जरूर वाचावे असे मला प्रारंभीच सांगावेसे वाटते. "ऋतुरंग हा दिवाळी अंक"१८: "आशावादी प्रेरणादायी जीवनरंगांचे बहुढंगी, बहुआयामी इंद्रधनुष्य!: मुळातच "ऋतुरंग" हा दिवाळी अंक नेहमीच इतरांपेक्षा वेगळा असतो. त्याचे संपादक श्री.अरुण शेवते हे खरोखर अत्यंत कल्पक ग्रहस्थ आहेत. दर वर्षी एखादी नवीन संकल्पना मांडून त्यावर अनेक संबंधित दिग्गजांचे लेखन ते आपल्या दिवाळी अंकातून गेली पंचवीस वर्षे प्रसिद्ध करत आहेत. त्यानंतर त्याचे पुस्तकरूपाने जतन करण्याचाही त्यांचा शिरस्ता अनुकरणीय आहे. "नापासांची शाळा" अशासारखे नामवंतांचे नापास होण्याचे अनुभव हे अशाच एका दिवाळी अंकाचे पुस्तकांतले रुप हे वानगीदाखल दिलेले उदाहरण. ह्या वेळेस अंकासाठी त्यांनी जी संकल्पना घेतली आहे ती खरोखर लोकविलक्षण आणि चित्तथरारक अशीच आहे. "बीज अंकुरे अंकुरे" ही ती संकल्पना आहे, तिचा मतितार्थ, नवनिर्मिती कशी केव्हां निर्माण होते, तिच्याकरीता बीज निर्माण होणं आणि त्याचं फळ लाभणं ह्या मध्ये पुष्कळ काळही जाऊ शकतो हे आपल्या सगळ्यांनाच आपआपल्या जन्मावरून अनुभवाचे आहे. साधे विचार आणि कल्पना ह्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आपल्या मनात अनेक प्रकारची स्पंदने निर्माण होत असतात, आपण अनेक प्रकारचे अनुभव घेत असतो, त्यातून आपल्या मनात विचार निर्माण होतात, परंतु त्या विचारांना नीट आकार देऊन काहीतरी मूर्त स्वरूपात जगापुढे आणणं, मांडणं म्हणजे कल्पना होय. थोडे विषयांतर म्हणून सांगतो-नाट्यदर्पणच्या कल्पना एक आविष्कार अनेक ह्या गाजलेल्या एकांकिका स्पर्धेची आठवण होते. टबमध्ये स्नान करणार्या आर्कीमिडीजला, अचानक सुचलेल्या तरंगणार्या वस्तुंविषयीचा जगप्रसिद्ध सिद्धांताची गोष्ट आठवा, म्हणजे नवनिर्मिती व तिचे बीज कसे काय अद्भुतरम्य रीतीने अवतरते, ते समजू शकेल। ह्या वाचनीय अंकामध्ये अनेक मंडळींनी त्यांचे कल्पना ते प्रत्यक्ष आविष्कार ह्या चित्तथरारक प्रवासाचे अनुभव दिलेले आहेत. ते इतके विविध आहेत, की आपल्या भावविश्वापुढे जणू काही भगवंत श्रीकृष्णाच्या विश्वरूपदर्शनासारखे काहीतरी निर्माण होते. प्रत्येकाचा बीजनिर्मितीचा आणि त्यातून उत्कर्ष होणाऱ्या कलाकृतीचा अविष्कार वाचत असताना आपल्याला जो आनंद समाधान आणि तृप्ती लाभते ती शब्दातीत आहे, असे मला तरी अनुभवास आले. मी अक्षरशः भारावून गेलो. अधिक पाल्हाळ न लावता, आता थोडक्यात दिवाळी अंक ऋतुरंग नावाला अगदी चपखल असे निसर्गाचे सहाही ऋतूंचे जणू व्यावहारिक जीवनातील अद्भुत भावतरंग आपल्याला कसे मांडलेले दिसतात ते संक्षिप्त रूपात सांगतो. आपल्याला जे जमतं,जे करायला आवडतं, ज्यातून आपल्याला खरोखर आंतरिक समाधान मिळतं, असं जेव्हा माणसाकडून सातत्याने घडत जातं तेव्हा अतिशय सुंदर निर्मिती होऊन जाते. पण आपल्याला खरोखर हे असं काय आवडतं ते शोधण्याच्या धडपडीतूनच त्या निर्मिती साठीचे बीज उत्पन होते, हेच मुलभूत तत्व येथे ज्याने त्याने उभे केले आहे. त्यायोगे विविध क्षेत्रांतील बारकावे तपशील अडचणी व आव्हाने आपल्यासमोर उलगडत जातात. "रेषामैत्री": डॉक्टर आनंद नाडकर्णी हे विख्यात मानसरोगतज्ञ डॉक्टर, पण त्यांची रेषामैत्री अर्थात रेखाचित्रे काढण्याची आवड कशी केव्हा जोपासली गेली आणि त्यातून त्यांना कसकसा आनंद मिळत गेला ते वाचणे, त्यांची रेखाचित्रे पहाणे, खरोखर मोलाचे आहे आणि नवलाचे आहे. "पूर्णब्रह्म": एका विमान प्रवासात ह्या लेकुरवाळीला शाकाहारी भोजन न मिळाल्यामुळे जवळजवळच २४ तास उपाशीपोटी राहायला लागते आणि त्या अपमानास्पद अनुभवातून तिच्या मनात, अस्सल महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थांचे "पूर्णब्रह्म" असे अनुरूप नांव असलेले हॉटेल निर्माण करण्याची उर्मी आकाराला येते. त्याकरता किती कष्ट, कुणाकुणाची साथ आणि काय काय करायला लागते, ते "आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना" ह्या लेखात जयश्री कंठाळे ह्यांचे मनोगत मानसी होळेहुन्नुर ह्यांनी सहजसुंदर शैलीत मांडले आहे. "पिस्तुल्या": आज "सैराट" चित्रपटा द्वारे घरोघरी पोहोचलेला आणि सर्वाधिक उत्पन्न निर्माण करणाऱ्या चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक म्हणून नांवारूपाला आलेल्या नागराज मंजुळेचे, चित्रपट क्षेत्रातील बीजरोपण "पिस्तुल्या" ह्या त्यांच्या लघुपटाने कसे झाले ते शब्दांकित केले आहे, सविता दामले ह्यांनी. त्याकरता शब्दांकन केलेले, नागराज यांना किती उपद्व्याप व आटापिटा करायला लागला आणि अत्यंत अपुऱ्या साधनांद्वारे त्यांनी पहिल्याच पदार्पणात "पिस्तुल्या" सारखा तळागाळात शिक्षणप्रसार करणारा सर्वोत्तम ठरलेला राष्ट्रीय पारितोषक पुरस्कर विजेता लघुपट कसा निर्माण केला, ते अनुभवणे प्रेरणादायी आहे. असामान्य कलाकार किंवा कलावंत कसा घडत जातो, हे आपल्याला ह्या जिद्दीच्या अनुभवावरून समजते. "झिपर्या": आज दूरदर्शन वर उत्तम टीआरपी मिळवून लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या "माझ्या नवऱ्याची बायको" ह्या मालिकेचा दिग्दर्शक केदार वैद्य याची "२४" वर्षानंतर ही कहाणी खरोखर विचार करायला लावणारी आहे अरुण साधूंच्या कादंबरीवर झिपऱ्या हा चित्रपट केदारला २४ वर्षापूर्वी सुचला होता, पण तो प्रत्यक्षात यायला मधला धडपडीचा आणि स्वतःला मनोरंजन क्षेत्रात प्रस्थापित करण्याचा काळ कसा जावा लागला आणि नंतर हा चित्रपट त्याने कसा निर्माण केला ही कहाणी या सविता दामलेंनी शब्दांकीत केलेल्या लेखात आहे. "इदं न मम": सगळीकडे ताणतणाव महाराष्ट्र आणि त्यापोटी प्रसंगी आत्महत्या असे चित्र असताना एक माणूस त्याच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी प्रत काय ठरवतो आणि ते प्रत्यक्षात कसे आणतो ते डॉक्टर अविनाश सावजी यांच्या माणसे घडविणाऱ्या उभे करणाऱ्या शेताच्या मशागती वरून श्री दिनेश गुणे यांनी मांडले आहे. अडचणींना संकटांना प्रसंगी रंगांना सोंग मध्ये जगण्याची उर्मी निर्माण करणाऱ्या या अवलियाचे प्रेरणादायी कर्तृत्व खरोखर कुठेही न सापडणारे आहे. प्रत्येक दिवस काहीना काहीतरी समाजासाठी उत्तम योगदान घडवणारा घालवायचा असे पन्नासाव्या वर्षी ठरवणार्या अविनाश सावजींच्या "सेवांकुर" "प्रयास" आणि "लिटल चँम्पस्" ह्या तीन संस्थांना सलाम! "आदर्श कायापालट": "माझे दत्तक गाव मोरया चिंचोरे" ह्या लेखातून "यशवंत सामाजिक प्रतिष्ठान" नेवासा येथील प्रशांत गडाख-श्री. यशवंतराव गडाख ह्यांचे सुपुत्र- त्यांनी एका छोट्याशा खेड्यात परिपूर्ण असे तंटामुक्त, स्वयंपूर्ण आणि नितीमत्तेला प्राधान्य देणारे प्रमाण मानणारे आदर्श गाव कसे उभे केले हे या लेखातून आपल्या समोर येते. ही अशीच आमुलाग्र बदलाची लाट जर देशात खेडोपाडी आली तर आपला देश खरोखर सुजलाम सुफलाम आणि जगामध्ये सगळ्यांचे नेतृत्व करणारा होईल यात वाद नाही. "काळोखातून प्रकाशाकडे": रॉबर्ट फ्रॉस्ट या जगविख्यात अमेरिकन कवीचे तितकेच जगन माननीय काव्य आणि त्या काव्यनिर्मिती ची कहाणी आपल्यापुढे विजय पाडळकर पाडळकर यांनी "काळोखातून प्रकाशाकडे" या लेखातून मांडली आहे: त्या जगप्रसिद्ध काव्याचा शेवट: "-But I have Promises to keep, -And miles to go before I sleep, -And miles to go before I sleep. प्रत्यक्ष जीवनातील एका विचित्र अनुभवातून जी वेदना निर्माण होते, तिचे चक्क १७ वर्षानंतर अशा प्रेरणादायी काव्यात रूपांतर कसे होते ते ह्या लेखातून अनुभवणे खरोखर अविस्मरणीय. त्या काव्यात दुर्दम्य आशावाद निर्माण करण्याची ताकद आहे. "वाचाल, तरच वाचाल": शुभम साहित्य-( राजेंद्र ओंबासे), अक्षरधारा-(रमेश राठिवडेकर), आणि उत्कर्ष प्रकाशन( सु.वा.जोशी) ह्यांच्यासारख्या विचारांची जीवनानुभवांची ज्ञानगंगा महाराष्ट्रातील घरोघरी पुस्तक प्रदर्शनातून पोचविणाऱ्या प्रकाशन संस्थांचे हे तीनही मालक कोणे एके काळी अतिसामान्य असे जीवन कसे जगत होते, वेळप्रसंगी हमाली वा पडेल ते काम करून ह्या माणसांनी, प्रतिकूल परिस्थितीत संकटांमधून मार्ग काढत शून्यातून विश्व उभे करत, आज नांवारूपाला आलेल्या आपआपल्या प्रकाशन संस्था कशा निर्माण केल्या, त्याचे वर्णन प्रत्येकाने, आपल्या स्वानुभवावरून पारदर्शक रीतीने आणि प्रांजळपणे मांडले आहे. ही अशी माणसे जर "नाही रे" मधून असे सोन्यासारखे यश मिळवतात तर आपल्यासारख्या सर्व गोष्टी अनुकूल असताना आपण खरंच काय करतो, काय साधतो, असा यक्षप्रश्न आपल्या मनात घर करून जातो. त्यामुळे खरोखर आपलीच आपल्याला लाज वाटू शकते. "मुळ्येकाकांचे संमेलन": कायम पांढऱ्याशुभ्र विषयात असलेले नाट्यवर्तुळात चोख व्यवस्थापक म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. अशोक मुळे कसे जगावेगळे अवलीया आहेत ते आणि त्यांना जे वाटते जसे वाटते ते स्वतःच्या एकट्याच्या हिमतीवर वेगवेगळ्या संकल्पना प्रत्यक्षात आणून त्या आगळ्या वेगळ्या संमेलनांद्वारे कसे सिद्ध करतात त्याचे प्रत्यक्ष दर्शन एका लेखात आपल्याला इथे घडते. "माझा पुरस्कार", "कलाकारांच गुढीपाडवा" "एकत्र कुटूंब-सुखी कुटुंब", ज्येष्ठ कलाकारांचे "भेटीलागी जीवा", "असेही एक साहित्य संमेलन"-ज्यामध्ये मुळ्येकाकांनी "ऋतुरंग"चे संपादक श्री.अरुण शेवते ह्यांना समेलनाध्यक्ष म्हणून बोलविण्याचे औचित्य दाखवले होते. असे निर्लेप मनाचे गुणवंतांना शोधून त्यांना यथोचित दाद देण्याचे औदार्य व सौहार्द दाखविणारे आणि तितक्याच पारदर्शी परखड वाणीचे श्री. अशोक मुळ्ये आणि त्यांची ही संमेलने होत असतात, म्हणून तर आपल्या जीवनांत क्रुतक्रत्यतेचे रंग भरले जातात. माझा वैयक्तिक बालपणीचा असा अनुभव ह्या अवलिया माणसाचा आहे. तेव्हा माझ्या जवळच्या नातेवाईकांकडे पाच-सहा दशकापूर्वी मी गोरेगावकर बिल्डींग गिरगाव येथे नातेवाईकांकडे जात असे. तिथेच शेजारी रहाणारा, हा किडकिडीत असा अशोक त्यावेळेला मी पाहिला आहे. तेव्हांपासून माझ्या मनातून तो कधीही गेला नाही आणि आज त्यालाच हे असे अद्वितीय यश आणि त्याच्या कार्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून मला थक्क व्हायला होते. "नाथा घरची उलटी खुण": जुई कुलकर्णी यांनी "नाथा घरची उलटी खुण" ह्या लेखाद्वारे वेगवेगळ्या नामवंतांच्या विविध प्रकारच्या निर्मिती क्षणांचा आणि त्यासाठी अंकुरलेल्या बीजांचा वेध आपल्या लेखात घेतला आहे. "पत्रकारीतेचा श्रीगणेशा": दहावीनंतर एका उद्योजकाकडे पायपीट करायला लागणारी कुरियर बाँयसारखी अत्यल्प पगाराच्या नोकरीला मालकाशी मतभेद झाल्यामुळे लाथ मारणारा नितीन चव्हाण हा तरूण पुढे यशस्वी पत्रकार कसा झाला ते सांगणारी कहाणी इथे आहे. "त्याने पंख दिले": पाचव्या वेतन आयोगामुळे मिळणारी पगारवाढ स्वखुशीने नाकारणारे जगावेगळे शिक्षक श्री.हेरंब कुलकर्णी नाही रे वाल्या वर्गाच्या चळवळीत कसे पडले त्याची ही ह्रदयस्पर्शी कथा कोणाही सह्रदय माणसाला हलवून स़ोडेल. ही सारी उदाहरणे केवळ वानगीदाखल दिली. ह्या अंकातील इतर लेखांमध्ये गुलजार आणि त्यांची कन्या मेघना गुलजार यांच्या निर्मिती अनुभवाबरोबरच, श्री. गिरीश कुबेरांचे "तेल त्रिवेणीचा उगम" ही त्यांच्या अभ्यासू व्रुत्तीची प्रेरक कथा इथे आपल्याला वेगळ्यच जगात नेते. दीपिका पडुकोण ह्यांच्या "लिव्ह लव अँड लाफ" प्रतिष्ठानच्या निर्मितीमागचे रहस्यही ह्या भरगच्च संग्राह्य अंकात आहे. त्याशिवाय असलेले, इतर अनेक विषयांवरचे बीजनिर्मिती ते प्रत्यक्ष फळ ह्यांचे चित्र खरोखर वाचनीय असेच आहे. प्रत्येकाने वाचावा आणि त्यातील वेगवेगळ्या अनुभवातून काहीतरी धडा घ्यावा असाच हा सारा खजिन्यांतला ऐवज आहे. माणूस आणि पशु यांच्यामध्ये जो फरक आहे तो हा की, विचार करणे, कल्पना रंगवणे आणि ती प्रत्यक्षात आणणे याबरोबरच भावना आणि भावनांचा अविष्कार करता येणे हा आहे. त्याचे आपण प्रत्येकाने भान ठेवून, आपल्याला काय आवडते, आपण काय उत्तम करू शकतो आणि आपल्याबरोबर इतरांना आनंद देणारे उपयोगी असणारे काय योगदान देऊ शकतो, याचा विचार करावा असे बोधाम्रुत पाजणारी ही साहित्यिक मेजवानीच जणु आहे. तर असे आहे, "ऋतुरंग" दिवाळी अंक'१८चे, आशावादी प्रेरणादायी जीवनरंगांचे बहुढंगी, बहुआयामी इंद्रधनुष्य! एकमेवाद्वितीय अशा "ऋतुरंग" दिवाळी अंकाद्वारे श्री अरुण शेवते ह्यांनी आपल्यापुढे चितारले आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व त्यांना शुभेच्छा. आपण प्रत्येकाने त्याचा आस्वाद घ्यावा असेच माझे सांगणे आहे. सुधाकर नातू, माहीम मुंबई१६ 4. “मौज" दिवाळी अंक'१८: रसास्वाद: मराठी साहित्यात दिवाळी अंकांची खूपच कौतुकास्पद अशी परंपरा वर्षानुवर्षे चोखंदळ रसिक वाचकांची बौद्धिक भूक भागवत आलेली आहे. त्यामध्ये जे काही मोजकेच अंक विचारांना चालना देणारे आणि इतरांपेक्षा संपूर्ण वेगळी वाट चोखाळणारा आहेत, त्यांत "मौज" दिवाळी अंकाची अग्रक्रमाने नोंद केली पाहिजे. ते सहाजिकच आहे, कारण ज्या प्रकाशन संस्थेने "सत्यकथा" सारखे अभिजात नियतकालिक साहित्य रसिकांना दिले आणि त्याद्वारे एकाहून एक असे सरस सरस्वतीपूजक मराठी साहित्यविश्वात आणले, त्यांचे हे मासिक असल्यामुळे ते अपरिहार्य असणे स्वाभाविकच नव्हे कां? ह्या वेळचा "मौज" दिवाळी अंक खरोखर विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक वेगळे काहीतरी देणारा आहे. त्यातील विविध लेख, कविता, कथा पाहिल्या, तर आपल्याला लक्षात येईल एखाद्या शोभादर्शकासारखे अनेकांगी चित्र आपल्या समोर उभी राहते. इथे खास प्राधान्याने नमूद करायला हवे, ते दोन प्रमुख गोष्टींना: पहिलं म्हणजे श्री.मधु लिमये माननीय श्री. अटल बिहारी वाजपेयी आणि श्रीनिवास कुलकर्णी यांची व्यक्तिचित्रे, दुसरं म्हणजे "विज्ञानाचे वारकरी" हा एरवी दुर्लक्षित असलेला संशोधक विश्वाचा ऊहापोह करणारा दिग्गजांचा परिसंवाद! व्यक्तिचित्रे,: “संसदीय बंडखोर" या शीर्षका द्वारे श्री. मधु लिमये यांचे जीवन चित्र सन्माननीय निवृत्त न्यायाधीश श्री. नरेंद्र चपळगावकर यांनी त्यांच्या सहजसुंदर भाषेत उभे केले आहे. मधुजींसारखा हुशार आणि तडफदार माणूस जर विरोधी पक्षात नसता व सत्ताधाऱ्यांच्या बाजूला असता, तर काय झाले असते असे वाटून जाते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या अनेक माणसांची अशीच शब्दचित्रे "हरवलेले स्नेहबंध" ह्या श्री. चपळगांवकर लिखीत पुस्तकात मी नुकतीच वाचली होती, ती आठवण मला झाली. भारत रत्न श्री. अटल बिहारी वाजपेयी ह्यांचे बरेचसे अज्ञात असे अनेक पदर उलगडून दाखवणारे हे व्यक्तिचित्र,श्री. विनय सहस्रबुद्धे यांनी फारच सहजसुंदर भाषेत मांडले आहे. एका महान नेत्याची ही साधी भोळी सुंदर कहाणी खरोखर मनाला भावून जाते. अनेक न माहित असलेल्या गोष्टींमधून त्यांचे व्यक्तिमत्व आपल्यासमोर उलगडते. "आण्णा आणि मी" हे आपल्या वडिलांचे-श्रीनिवास कुलकर्णी ह्यांचे सहजसुंदर व्यक्तिचित्र आलोक यांनी लिहिले आहे. ते एका मुलाच्या नजरेतून सरस्वतीपूजक अशा वडिलांचं खरोखर ह्रद्य चित्र आहे. ह्या माणसाने किती माणसे भोवताली गोळा केली आणि मौज प्रकाशनातर्फे साहित्याची किती सेवा केली याचे एक स्पष्ट चित्र त्यातून उभे राहते. विज्ञानाचे वारकरी" "विज्ञानाचे वारकरी" हा एक दुर्लक्षिलेल्या अन मोडवर बंद बुद्धिवंतांना हवाहवासा असा वाटणाऱ्या विषयाचा मागोवा त्या क्षेत्रातील दिग्गजांच्या आत्मकथनातून प्रभावीपणे मांडण्याचा डॉ. बाळ फोंडके यांनी प्रयत्न केला आहे डॉ. जयंत नारळीकर यांनी त्यांना आवडणाऱ्या त्यांना आवडणाऱ्या गणित पदार्थविज्ञान व संस्कृत अशा विषयातून अखेरीस गणिताची निवड कशी झाली ते एखादे प्रमेय लीलया सोडत जावे तसे पायरीपायरीने आपल्या लेखात मांडले आहे. सगळ्या गोष्टी जणू आपल्यासमोर घडत जातात असे वाचण्याजोगे, हे त्यांचे आत्मकथन आहे. योगायोगाने वडिलांनाही गणित विषय आवडत होता, म्हणजे सोने पे सुहागा! त्याशिवाय ऑक्सफर्ड केंब्रिज विद्यापीठाच्या रोमहर्षक इतिहासाने आपण अचंबित होतो. थाँप्मस़न व पार्कीन्सन ह्यांचा परिक्षेतील अव्वल नंबराचा योगायोग तर चित्तथरारक आहे. इस्रो आणि अंतराळ विज्ञानातील भारताची ललामभूत कहाणी आणि त्याचा एक शिल्पकार व त्याचे योगदान असे श्री. सुरेश नाईक ह्यांच्या लेखाचे स्वरूप आहे "मी विज्ञानाचा वाटसरु" हे सोलापूर मध्ये लहानाचे मोठे झालेल्या आणि पुढे अणूशक्ती मंडळात यशस्वी कार्यकर्तृत्व करणाऱ्या संशोधक डॉक्टर बाळ फोंडके यांचे हे आत्मनिवेदन आहे. संशोधनातील सर्वसामान्यांना अनभिज्ञ असणाऱ्या विषयांमधील कौतुकास्पद वाटचाल करणाऱ्या ह्या माणसाचे सहाजिकच कौतुक वाटते. डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे नाव सर्वश्रुत आहे त्यांचं विज्ञानाकडे आणि संशोधनाकडे वळण्याचे जे काही मर्म त्याचा येथे खुलासा करण्यात आला आहे नुसतेच संशोधन करून भागणार नाही आणि त्यामधल्या नेतृत्वाचा प्रवास हा देखील कसा महत्त्वाचा असतो हे त्यांच्या आत्मनिवेदनातून समजते गरिबीतून अंगभूत हुशारीच्या जोरावर पर्मिष कष्ट देवा यांच्या मुळे गगनभरारी मांडणाऱ्या या शास्त्रज्ञांचे योगदान खरोखर अद्भुत असेच आहे हळदी संबंधी पेटंट मिळविण्याची त्यांची धडपड तर सर्वश्रुतच आहे सारख्या अग्रगण्य संस्थेचे प्रमुख या नात्याने त्यांनी केलेले काम खरोखर अत्यंत लाभदायी व उपयुक्त असेच आहे. खरोखर अनुसरण करता येईल, प्रयत्नांना नवी दिशा देणारे, असे काम करणाऱ्या डॉक्टर अनिल काकोडकर ह्यांचे कर्तृत्व खरोखर आश्चर्यकारक आणि स्फूर्तीदायी आहे. अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की, मध्य प्रदेशातील खरगोण सारख्या एका खेड्यातून आलेल्या बुद्धिमान माणसाचे अंगभूत गुण व कामगिरी ह्या जोरावर चक्क अणुशक्ती मंडळाचे अध्यक्ष होण्या इतकी गरुडभरारी पाहून खरोखर कौतुक वाटतं. त्यांनी अणुभट्टींसंबंधी केलेल्या कामगिरीचे मोल, निश्चित अमोल आहे. "विज्ञानाची कास" डी.बालसुब्रमण्यम ह्यांचा आपण वैज्ञानिक कसे झालो हे सांगणारा लेख आहे. मदुराई जवळच्या शोलावंदन सारख्या छोट्याशा गावात लहानाचा मोठा झालेल्या आणि पुढे कीर्तिमान संशोधक बनलेल्या बुद्धिमान माणसाचे एकंदर कार्यकर्तृत्व डोळे विस्फारीत करणारे आहे. "रसास्वाद-"मलेना" चित्रपटाचा": "शापित सौंदर्याची समरसंगिनी, मलेना" हा नंदू मुलमुले यांनी "मलेना" या चित्रपटाचा एक हृदयस्पर्शी असा आढावा घेतला आहे. ही दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील विदारक वास्तव रंगविणारे व अव्यक्त प्रेमाची चित्तथरारक कहाणी आहे. सुस्वरूप स्त्रीकडे पुरुषांच्या वासनांध नजरा तिचा कसा र्हास करतात, ह्याची चिरफाड या लेखात अक्षरश: हृदय पिळवटून टाकेल, अशा पद्धतीने मांडली आहे. "मुंबई नगरी बडी बांका": "मुंबई नगरी बडी बांका" हा अश्विन पुंडलिक यांचा लेख मुद्दामून याकरता वाचावासा वाटला, कारण मी एक नखशिखांत मुंबईकर आहे. त्यामुळे मुंबईची काय काय माहिती मिळेल ह्या उत्सुकतेने हा लेख वाचला. ह्या भारताची आर्थिक राजधानी असलेल्या महानगराची खरोखर उभी-आडवी सद्यस्थिती तसेच पुरातन इतिहास उलगणारी संशोवनात्मक कहाणी अभ्यासपूर्ण रीतीने मांडली आहे. ह्या शहराला हजारो वर्षांचा इतिहास आहे याचे वास्तव या लेखातून उभे केले आहे. त्याकरता लेखकाने खूप अभ्यास व कष्ट केल्याचे स्पष्ट जाणवते. "करीसा ना कित्साव": "करीसा ना कित्साव" असे काहीसे धेडगुजरी नांव असलेली श्री.श्रीरंग भागवत यांची कथा, त्या नांवामुळे वाचवी कां, असा प्रश्न मनात येतो. एका अभागी स्त्रीच्या दुर्दैवाची ही कहाणी इतक्या विस्ताराने मांडायची काय गरज होती, हा प्रश्न निर्माण होतो. कारण जे काही सांगायच आहे, त्याचा आवाका बघता, ही कथा खूपच लांबण लावलेली आहे. स्रीकडे एक भोग्य वस्तू म्हणून फक्त बघितले जाते व तिचा जीवन प्रवास त्यामुळे कसा क्लेशकारक होऊ शकतो, त्याचे भेसूर वास्तव येथे आहे. "फ्लेमिंगो" "फ्लेमिंगो" ही मोनिका गजेंद्रगडकर ह्यांची कथा आहे. "ब्रेन ड्रेन"ची शिकार झालेले एक वृद्ध दांपत्य आणि त्यांची अपरिहार्य एकटेपणांतील अगतिकता ह्या कथेतून समोर येते. एकुलता एक परदेशस्थ मुलगा अकाली दगावलेला व नातू असूनही तो दूर आणि जेव्हा केव्हा तो इकडे भेटायला येतो, तेव्हा जे काही भावनांचे वादळ उठते, मनामध्ये जे काही भावनांचे कल्लोळ निर्माण होतात व कुमारवयीन नातवाचे भावविश्व उलगडत, डोळ्यात पाणी आणणारी अशी ही कहाणी आहे. अशा तऱ्हेचे वास्तव खरोखर घरोघरी किंवा दारोदारी आता पाहायला मिळते आहे, हे चांगले की वाईट असा प्रश्न मनात येऊन जातो. "सदेह वैकुंठाला ": सदेह वैकुंठाला विलास केळकर या शीर्षकावरून गैरसमज होतो आणि आपल्याला वाटतं ते तसं नसतं गोष्टीमध्ये आणि गोष्टी पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे त्याचे मर्म कथेद्वारे सांगण्यात आलेले आहे आणि तो जो काही अनुभव मार्मिकपणे मांडला आहे तो मन विषण्ण करणारा आहे प्रगती विकास हा कसा होतो आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय होते आहे याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे. "एक दीर्घकथा": "एक अनाथ एक डिटेक्टिव आणि काही प्रेमभंग": ही दीर्घकथा ऋषिकेश गुप्ते यांची आहे. पौगंडावस्थेतील नर-मादीच्या परस्पर आकर्षणाचे वास्तववादी उत्तेजित करणारे वर्णन वाचून, आपण गोष्ट वाचायला घेतो, परंतु ती कथा कशीही वहावत जाते आणि अखेरीस उत्कंठावर्धक रहस्य निर्माण करत संपूनही जाते. मात्र एवढे सगळे भारुड लिहिण्यापेक्षा संक्षिप्त अशा रूपात हे सगळं जर सांगितलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतं. “माणसांनी हरवलेली माया": श्री. मिलिंद बोकील ह्यांच्या "माणसांनी हरवलेली माया" ह्या लेखाच्या शीर्षकावरून आपला वेगळाच समज होतो, तो दूर करणार्या मायावी संस्कृतीचे ह्या लेखामध्ये अंतर्बाह्य चित्र व तर्कनिष्ठ विश्लेषण केलेले आहे कदाचित सिंधुसंस्कृती पेक्षा खूप जुन्या असणाऱ्या या संस्कृतीची वैशिष्ट्ये खरोखर विचार करायला लावणारी आहेत एक अभ्यासपूर्ण लेख असे या सामुग्रीचे वर्णन करता येईल. “श्री. प्रभाकर बरवे यांचे चित्रमय व्यक्तिचित्र श्री. प्रभाकर कोलते यांनी मांडले आहे. हा कर्तृत्ववान चित्रकार अनेक कलावंतांचे स्फूर्तिस्थान कसा होता आणि त्यांची चित्रे देखील माणसांना वेगळी अनुभूती कशी देतात, त्याचे मर्म ह्या. लेखातून चांगल्या प्रकारे प्रकटते. मनीषा टिकेकर ह्यांनी तर आपल्याला संपूर्ण अज्ञात असलेला, कधीही न ऐकलेल्या वा न पाहिलेल्या, अशा एका देशाची-'लुआंग प्रवांग'ची चित्तरकथा मांडली आहे. खरोखर पृथ्वी गोल आहे आणि तिथे कुठेतर आपल्याला परिचित असणारे, असे आपल्यासारखेच आपली परंपरा बाळगणारे असे जनप्रवाह दडलेले असतात, हे जाणून खरोखर मन स्तंभित होते. कुणाच्या मनांतही कधी येणार नाही, असं आगळं वेगळच "हातगाडीचं आख्यान", वीणा मगदूम ह्यांनी आपल्यापुढे मांडले आहे. तळागाळातल्या आणि हातापायावर पोट असणाऱ्या वर्गाची आणि त्यांचे खरोखर अत्यंत महत्त्वाचे साधन असलेल्या हात गाडीची ही 'नाही रे' वाल्यांची ही कहाणी अंतर्मुख करणारी आणि वास्तवाचे भान आणणारी आहे. गोरिलामधले माणूसपण शोधण्याचा ध्यास घेतलेल्या एका अमेरिकन स्त्रीच्या झपाटलेपणाचे शब्दचित्र विनया जंगले ह्यांनी उभे केले आहे. “झाबुआ” या प्राचीन भारताचा विभाग असणाऱ्या प्रांताचे वर्तमान आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जाते आणि येथील आदिमानवाचे जीवनचित्र गिरीश प्रभुणे यांनी येथे रेखाटले आहे. ह्या व्यतिरिक्त अभ्यासपूर्ण चिकीत्सक तसेच परखड भाष्य आपल्या कलाक्रुतींमधून सादर करणार्या "वाडा चिरेबंदी" "युगान्त" आदिंमधून "मौनराग" आळविणार्या श्री. महेश एलकुंचवार ह्यांच्या ललित लेखनाचा त्रिमिती परामर्श एखाद्या डॉक्टरेटसाठी शोभावा असा परामर्श येथे श्री. संजय आर्विकरांनी मांडलेला आहे. ह्या अंकातील, अगदी आपआपल्या मनोविश्वात दंग असणार्या कवींच्या अनेकानेक कविता आमच्यासारखे पामरांना समजण्यास जशा कठीण आहेत, तसाच हा परामर्श दुर्बोध आहे, हे मात्र जाता जाता नमूद करणे भाग आहे. सारांश, विचारवंतांना किंवा बुद्धिवंतांना आपलासा वाटावा असाच हा सारा ऐवज आहे त्यामुळे "चिमुटभरांसाठी" "मूठभरां"नी जमवलेला खजिना, असे ह्या अंकाचे स्वरूप आहे. सर्वसामान्य वाचकाला हा संपूर्ण अंक, त्यातील मान्ववरांची व्यक्ती चित्रे व संशोधकांची आत्मनिवेदने वगळता, तसा डोक्यावरून जाणाराच भासू शकेल आणि तसे असणे हे सत्यकथेच्या परंपरेची बूज राखणारेच असायला हवे नाही कां? सुधाकर नातू माहीम, मुंबई १६ 5. 

"दाद, प्रतिसाद व संवाद!": "पत्रांतरे": १. "कवडसे सोनेरी अंतरीचे" पुस्तक: श्री. विश्वास देशपांडे, सादर वंदन. मी जे जे काय वाचतो, बघतो, वा ऐकतो, त्यातून जर मला काही मनापासून भावले, तर त्याची पोचपावती, जमेल तशी देण्याची माझी पद्धत आहे, नव्हे तो माझा छंद आहे, असेच म्हणा ना! हा माझा अनाहूत संदेश त्याचाच एक भाग आहे. " आपले"सुखी माणसाचा सदरा जणू घालणारे ग़जाननराव कुलकर्णी काय, किंवा घराच्या गच्चीत चक्क आपल्या कल्पनेतले विमान प्रत्यक्ष बनवणारा हा जिद्दी अमोल यादव काय, अथवा अपंग असूनही, स्वकष्टाने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर अनेक कुटुंबांची पोशिंदी होत विस्मयकारी योगदान देणारी, आधारवड मीनाक्षी निकम काय, अथवा मोबाईल शाप की वरदान? या प्रश्नाचे उत्तर आपल्या आपणच शोधायला हवे, हे वाचकांच्या गळी उतरवण्याची तुमची सहजसुंदर सोप्या भाषेतील शैली काय, किंवा आत्मविश्वास असेल तर काय काय होऊ शकते आणि सुरवंटाचे पहाता पहाता फुलपाखरू होऊन माणूस, असामान्य कर्तृत्व गाजवत आकाशभरारी कसा घेऊ शकतो, ते सांगणं काय, हे सारं तुमचे "कवडसे सोनेरी अंतरीचे" हे पुस्तक हातात आल्यावर, त्यातील सहज म्हणून ५/६ धडे, होय धडेच म्हणतो, कारण प्रत्येक लेख हा आपल्याला काही ना काही तरी शिकवून जातो. आपल्याला नवी दृष्टी देऊन जातो. म्हणून तर मी म्हणतो, शितावरून भाताची परीक्षा करावी, त्याप्रमाणे जर हे चार-पाच लेखच मला जाणिवेचे असे मोठे अद्भुत विश्व समोर निर्माण करून गेले, तर संपूर्ण पुस्तक वाचल्यावर तर अर्जुनाला, श्री भगवंताचे जसे विश्वरूप दर्शन झाले, त्याचप्रमाणे माझे काहीसे होईल, असे मला मनापासून वाटते. ज्या वाचनालयाचा मी सभासद आहे तिथे गेल्यावर पुस्तके शोधता-शोधता सहज हे पुस्तक हातात आले आणि तेच घेऊन मी घरी आलो. त्यामध्ये एवढे काही अनुभव भांडार असेल, असे काही वाटले नव्हते. पण सारं काही वेगळंच झालं. धडे वाचायला फार तर अर्धा-पाऊण तास लागला असेल, पण त्या वाचनातून मला खूप खूप भरून पावलं. And my day was made! आपल्या पुस्तकाने मला जो आनंद दिला आणि नव्या विचारांची दिशा, द्रुष्टी दिली, त्याबद्दल आपले आभार अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. सुधाकर नातू माहीम मुंबई १६ ------------------------------------------------------------------------------------------------ २. म.टा. मधील लेख: "पत्रिका जुळलेली व न जुळलेली" श्री. अशोक कोठावळे, मँजेस्टिक प्रकाशन, सादर वंदन. आजच्या 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये तुमचा "पत्रिका जुळलेली व न जुळलेली" हा स्वानुभव सांगणारा लेख, मी वाचला. तो आवडला. विवाह ही एक अत्यंत महत्त्वाची घटना, जीवनामध्ये घडत असते. प्रत्येकाचा विवाह जुळतो, तो नाट्यमय रीतीने. तुमच्याही विवाहाची कथा, आपण अतिशय प्रांजळपणे सहजसुंदर भाषेमध्ये, वाचकांशी संवाद साधत ,सांगितली आहे. तुमचे अभिनंदन व शुभेच्छा. ह्याच संदर्भातील "जन्म गाठीचे रहस्य" या माझ्या चॅनेल वरील व्हिडीओची लिंक सोबत पाठवत आहे. ती उघडून जरुर पहावी. त्यावरून तुम्हाला विवाह कसे गमतीशीर रीतीने जुळतात, त्याची कल्पना यावी. 
धन्यवाद 
सुधाकर नातू माहीम मुंबई १६

३. "कालनिर्णय मोठे पंचांग": श्री. जयराज साळगांवकर, सादर वंदन. एक हौशी ज्योतिषी म्हणून मी नेहमी आतापर्यंत दाते पंचांग वापरत आलो आहे. मात्र आज दादरला आयडियल बुक डेपोमध्ये गेलो असताना, ते पंचांग संपल्याचे समजले आणि त्यामुळे मी आपले "कालनिर्णय मोठे पंचांग" विकत घेतले. घरी आल्यावर, ते नीट चाळून बघितले आणि मला लक्षात आले की अतिशय आकर्षक पद्धतीने आपण अत्यंत उपयुक्त माहिती मांडली आहे. अशा तर्हेची इतकी विस्तृत व नित्योपयोगी माहिती मला वाटते, खचितच कुठल्या पंचांगामध्ये असेल. माझ्यासारख्याने सखोल अभ्यास करावा असेच हे पंचांग आहे. मला आता यापुढे आपल्याच पंचांगाचा नेहमी उपयोग करावा असे वाटत आहे. पुढील पाच वर्षाचे ग्रहबदल, हा माझ्यासारख्या वार्षिक राशीभविष्य अनुकूल गुण पद्धतीने लिहीणार्या लेखकासाठी जणू वरदान आहे. ह्या उत्तम पंचांगनिर्मीतीसाठी तुमचे मनापासून आपले आभार आणि अभिनंदन, तसेच शुभेच्छा. सुधाकर नातू माहीम मुंबई१६ --------------------------------------------- ३. "भाग्यनिर्णय" दिवाळी अंक१८": श्री. शशिकांत पात्रुडकर, सादर वंदन. "भाग्यवान कोण?" या शीर्षकातील आपल्या खास दिवाळी अंकाच्या प्रश्नांचे उत्तर, मला तुमच्या अतिशय सहज सुंदर शैलीत, सोप्या भाषेत लिहिलेल्या "सहवास भाग्यवंतांचा" ह्या लेखामुळे मिळाले. आपल्याला फोटो ग्राफी चा छंद आहे आणि त्या छंदात तुम्ही अनेक नामवंतांचे फोटो काढू शकलात, हे त्यामुळे समजले. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व "पुल", प्रा.वसंत बापट आणि शांताबाई शेळके अशा दिग्गजांच्या भेटीचे अतिशय हृद्य वर्णन आपण आपल्या लेखात केले आहे. त्यामुळे तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच हे उत्तर मिळाले. कर्तृत्ववान माणसांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी हेही सहाजिक आहे. परंतु अशा कीर्तिमान व्यक्तींच्या सहवासात येणे, यासारखे भाग्य दुसरे नाही आणि ते तुम्हाला लाभले, ह्याचा मनापासून आनंद झाला आपले अभिनंदन व शुभेच्छा. सुधाकर नातू, माहीम मुंबई१६ ---------------------------------------------------- "लोकसत्ता-चतुरंग पुरवणी": हेमलता अंतरकर सादर वंदन. आजच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणींत "वसा स्वायत्ततेचा" हा कै. अनंतराव अंतरकरांच्या व्यक्तीगत व साहित्यिक संपादकीय कारकीर्दीची, वैशिष्ट्ये उलगडून दाखविणारा, आपला लेख मी वाचला. मोहिनी, हंस व नवल अशी प्रत्येकी स्वतंत्र विविधा जोपासणारी मासिके त्यांनीत निर्माण करून, मराठी वाचकांची वर्षानुवर्षे जी बौद्धिक व भावनिक भूक भागवली, त्याला तोड नाही. ह्या त्रिमूर्तींच्या साठ वर्षांच्या वाटचालीपैकी, निदान तीन दशकांचा मी वाचक म्हणून एक साक्षीदार आहे. हे असे एकसंध, आपआपली गुणवैशिष्ट्ये संभाळणार्या मासिकांमागे, संपादकाचाच सिंहाचा वाटा कसा असतो ते तुमच्या लेखामुळे समजले. अभिंनंदन व शुभेच्छा. जवळ जवळ अशाच तर्हेचे योगदान मेनका, माहेर व जत्राचे संपादक कै. पु.वि.बेहेरे ह्यांनीही दिले होते, त्याचे त्यांतील एक सदर लेखक म्हणून मला स्मरण झाले. ' तो'जादूभरा आणि आज स्वप्नवत वाटणारा काळ अन् कल्पनाविश्वात वाचकांना गुंतवून टाकणारा तो माहोल आणि त्याचे चोखंदळ आस्वादक आज इतिहासजमा झाले आहेत. कालाय तस्मै नम:, दुसरं काय! सुधाकर नातू, माहीम मुंबई-१६ ह्याला आलेले उत्तर: "तुमचा अभिप्राय वाचून लेखाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. तुम्ही जुने, जाणते वाचक आणि लेखक. त्या काळाबद्दल नव्या पिढीसाठी काहीतरी लिहून ठेवलं पाहिजे तुम्ही. धन्यवाद. कधीतरी भेटू." 
-हेमलता 
५. "श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१८" संपादक, श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१८ सादर वंदन. मराठीतील दिवाळी अंक ही चोखंदळ वाचकांसाठी एक पर्वणीच असते. वर्षातून एकदाच येणारा हा साहित्यशारदेचा सोहळा, आज अनेक दशके टिकून आहे, ही गोष्ट कौतुकास्पद आहे. आत्ताच आपला दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१८ वाचला. त्यातील रंगसम्राट श्री रघुवीर मुळगावकर ह्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खास सादर केलेला विभाग तर एका बैठकीत वाचून काढला. खरोखरच इतका तो सुरस रंजक आणि माहितीपूर्ण आहे की, त्यामुळेच मला आपणास हे अनाहूत खुशीपत्र पाठविण्याची प्रेरणा मिळाली. बाकीचा अंक चाळला आणि लक्षात आले की नेहमीच्या परंपरेप्रमाणे दीपलक्ष्मी दर्जेदार साहित्य देण्यात यशस्वी झाली आहे. पुल, गदिमा, गुलाम मोहमद, शैलेंद्र, मुमताज, कलकत्ता इ.इ. वैविध्यपूर्ण विषय इतक्या अभ्यासपूर्ण रीतीने सादर करणारा हा अंक खरोखर दुर्मिळच गणला जावा. चक्क तीनशे पृष्ठांचा रंगबिरंगी व खुसखुशीत साहित्याची मेजवानी देणारा हा अंक निर्माण केल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. ह्या निमित्ताने माझ्या मनांत अचानक दोन आठवणी जाग्या झाल्या. पहिली म्हणजे, माझे छापील असे नाव, कोणत्या तरी स्पर्धेच्या निमित्ताने, प्रथम आपल्याच दीपलक्ष्मीच्या मासिक अंकात कित्येक दशकांपूर्वी आले होते ही आठवण. त्यामुळे नंतर पुढे चार दशके मी जी काही लेखन सेवा केली, त्याची मुहूर्तमेढ दीपलक्ष्मींतून झाली, ह्या योगायोगाचे मला खरोखर नवल वाटले. दुसरी आठवण म्हणजे, तुम्ही आणि श्री.अनिल कोठावळे ही जोडगोळी एकोणिसशे ऐशींच्या दशकांत दिवाळी अंकांच्या मोसमात मला भेटायला, गप्पा मारायला आमच्या ऑफिसमध्ये यायची ती. काही अंशी मिश्कील बटूमूर्ती वाटावी अशी आपली प्रतिमा, माझ्या मनावर तेव्हा जी पडली, ती अजूनही कायम आहे. अर्थात् आपण आता श्री.दीपलक्ष्मी सारख्या अनेक दशकांची परंपरा असलेल्या दर्जेदार नियतकालिकाचे संपादक जसे आहात, तसेच जयहिंद प्रकाशनसारख्या यशस्वी संस्थेचे चालकही आहात. त्यामुळे तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असो. यानिमित्ताने मी आपल्या दिवाळी अंकाचा सखोल रसास्वाद यथावकाश घेईनच. धन्यवाद आपला सुधाकर नातू 6."नाद, हा खुळा!": एखादी गोष्ट जेव्हा आवडते आणि तीच तीच करावीशी वाटते त्याला कुणी नाद असे म्हणतात. ह्याला नाद लागला, तर कोणी खूळ लागलं असं म्हणतात! नाद न म्हणता, मी तर ह्याला खूळ असंच म्हणतो आणि मलाही असंच एक खुळ, तरुणपणापासूनच लागलेलं आहे. ते म्हणजे चांगलं वाचायचं, नाटक सिनेमा बघायचं! हे माझं खुळ, चांगलं का वाईट ते ज्याचे त्याने ठरवावे, पण त्याचा एक फायदा मात्र मला आता निवृत्तीनंतर खूप खूप होतो आहे. वेळ जायला तर ते खूळ हे साधन होतं, परंतु त्याचबरोबर विचारांना चालना देत, मेंदू ताजातवाना राहतो. काय घडतयं, कुठे काय होतंय, त्याचीही जाणीव त्यामुळे होते व कुणाचं आयुष्य कसं काय काय भोगत गेलं तेही उमजतं. त्यामुळे माझं हे खूळ असंच चालू राहणार आहे. पण गोष्ट इथेच थांबत नाही, याच्यापुढे अजून एक खूळ लागले आहे. ते म्हणजे कधी काही चांगलं वाचलं, तसं पुस्तक मिळालं, विचार करावा असं नाटक किंवा सिनेमा बघायला संधी मिळाली तर, त्यानंतर जे काही मनात उपजेल, ते एखाद्या टीपकागदासारखे शब्दात पकडून (कागदावर पूर्वी), पण आता मोबाईलवर उतरवायचं खूळ मला लागले आहे. तशी माझी लिखाणाची सवय होतीच. पूर्वी कागदावरचं होतं आणि अनेक मासिकांमध्ये माझे लेखही छापून यायचे. पण आता जे समाधान मिळते, ते तसं पूर्वी मिळत होतं असं नाही, कारण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मला व्हाट्सअप वर किंवा फेसबुकवर हे खूळ हजारो लोकांबरोबरही शेअर करता येतं! तेही एका क्लिकने, क्षणार्धात! आणि हे असंच चालू राहणार आहे. ह्या पूर्वी, "ऋतुरंग" दिवाळी अंक"१८: ची रसास्वादवजा ओळख मी तुम्हाला करून दिली होती. आता एक नाटक नुकतच बघितलं व त्या अनुभवांचं, माझ्या मनावर उमटलेले चित्र पुढे पाठवत आहे. ते गोड मानून घ्या: ====================================================== "आरण्यक"-अंतर्मुख करणारे तत्वज्ञान": दादरच्या यशवंत नाट्यमंदिरात काल "आरण्यक" नाटक बघितले. खूप दिवस ह्या नाटकाच्या मुंबईतील प्रयोगाची प्रतीक्षा करत होतो. महाभारतातील शेवटच्या पर्वाची ही एक ह्रदयस्पर्शी कहाणी आहे. हे नाटक सुमारे तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर होऊन चांगले नाव मिळवून गेले होते याचीही कल्पना होती. त्यामुळे मुद्दामून ज्या दिवशी तिकीट विक्री सुरू होत होती, तेव्हाच जाऊन तिकीट काढले त्यामुळे जागाही हॉलमध्ये अतिशय चांगली मिळाली. ह्या नाटकामध्ये रंगभूमीची आयुष्यभर ज्यांनी अहर्निश तपस्या केली आहे, अशा आदरणीय व्यक्तींचा सक्रिय सहभाग आहे. स्वतः लेखक दिग्दर्शक श्री. रत्नाकर मतकरी, चिमणराव म्हणून उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले चतुरस्त्र आणि अष्टपैलू कलावंत श्री. दिलीप प्रभावळकर( विदूर) आणि ज्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे आणि भरदार आवाजामुळे तसेच विलक्षण आत्मविश्वासामुळे येईल ते काम चोख करणारे रवी पटवर्धन( ध्रुतराष्ट्र), ह्यांच्याच बरोबर श्रीमती प्रतिभा मतकरी (गांधारी) आणि श्रीमती मीनल परांजपे (कुंती) असे रंगभूमीवरचे जानेमाने कलाकार पुनश्च ह्या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. हा एक मोठा दुग्ध शर्करा योगच म्हणायला हवा. जोडीला नव्या पिढीतले श्नी. नकुल घाणेकर (धर्मराज) आणि श्री. विक्रम गायकवाड(सुत्रधाराप्रमाणे असलेला प्रतिहारी) आदी कलावंत. अशा समूहाचे महाभारतासारख्या पुराणातल्या कथेवर नाटक बसवायचे, म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. अनुरुप असा रंगमंच आणि त्यावरचे देखणे अनुरूप नेपथ्यदृश्य, दोन प्रकारचे आणि दोन खंडात आपल्या डोळ्यांचे पारणे फेडते. पहिल्या खंडात राजाचा महाल, तर दुसऱ्या खंडात वटवृक्षाच्या छायेत असलेला अरण्याचा माहोल ह्या पार्श्वभूमीवर, सव्वा दोन तास जे अद्भुतरम्य नाट्य रंगमंचावर उलगडत गेले, ते रसिक प्रेक्षकांनी अगदी श्वास रोखून पाहिले. समानमानसी रसिकजनांच्या समूहामध्ये बसून अशा तऱ्हेचे जीवननाट्य, ज्यामध्ये महाभारताची ओझरती अशी शोभादर्शकासारखी कहाणी नजरेसमोर आपोआप उलगडत जाणे हे अनुभवणे खरोखर जगावेगळे आणि आनंददायी असते. हा संस्मरणीय अनुभव या नाटकाने आम्हाला दिला आणि पाचशे रुपये असा तिकिटाचा चढा दर असूनही तो जास्त आहे असे म्हणूनच बिलकुल वाटले नाही. आणि आपल्याला पुरेपूर मिळाले, असे समाधान वाटण्याइतके हे नाटक उच्च दर्जाचे होते. प्रत्येक पात्राचा सहभाग, चपखल हालचाली आणि कठीण असलेले पद्यमय संवाद स्मरणात ठेवून म्हणणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. तसेच ह्या सगळ्या समूहाकडून योग्य प्रकारे समन्वय साधून नाटकाचे हे सबंध प्रारूप सिद्ध करणे हे तर महाकर्म कठीण. महाभारतातला अती भेसूर नरसंहार झाल्यावर महाभारतातलं महायुद्ध संपले आहे. सारे शंभर कौरव धारातीर्थी पडलेले आहेत एकटा एकशे एकावा कौरव युयुत्सु भ्रमिष्ट होउन जखमांनी विव्हळत आहे आणि धर्मराजाचे राज्य सुरू झाले आहे, अशा कालखंडात हे नाटक सुरू होते. जे धारातीर्थी आपले बंधू गतप्राण झाले त्यांच्या आत्म्याला शांती म्हणून धर्मराजा करवी योग्य ते संस्कार विधी, दानधर्म पार पडल्यानंतर विदुर धृतराष्ट्र गांधारी व कुंती ह्यांनी सर्वसंग परित्याग करून अरण्याची वाट धरली आहे आणि अरण्यातच त्यांचा अंत होतो असे चित्र रंगवणारे हे नाटक आहे. इथे माणसाच्या जीवनातील कडू गोड रंग, नात्यांमधले गुंते आणि जीवनातील विविध प्रकारची परस्परविरोधी मुल्ये ह्यांचे द्वंद्व अशांचा ऊहापोह होत असलेला आपल्याला बघायला मिळतो. प्रत्येकाचे आयुष्य हे खरोखर चमत्कृतीपूर्ण अशी कादंबरीच असते. कुणी पहाता पहाता रावाचा रंक होतो तर कधी रंकांचा रावही होऊन जातो असे वास्तववादी अशाश्वतेचे जीवन चित्र आपल्यासमोर उभे राहते. महाभारतातील लोकविलक्षण अशा परिस्थितीचा आणि सद्यस्थितीचा एकमेकांमधील संबंध आणि मतितार्थ आपोआपच मनात वादळ निर्माण करत राहतो. त्या दृष्टीने एक संपूर्ण वेगळे रंगतदार आणि जीवनाकडे पाहण्याची निर्लेप बुद्धी देणारे हे नाटक जे ह्या समूहातर्फे मोठ्या दिमाखात सादर झाले आहे. जाता जाता अगोदर ज्ञात नसलेल्या अशा काही गोष्टी मला या नाटकात आढळल्या. पहिली म्हणजे, आपण आत्तापर्यंत शंभरच कौरव आहेत असेच समजत होतो, पण एकशे कावा युयुत्सु होता ही गोष्ट. ज्या गांधारीने विवाह होताक्षणी आपला पती आंधळा आहे हे समजताच, पतिव्रता ह्या न्यायाने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून घेतली, ती पट्टी, अरण्यवासात काढून टाकते, ही दुसरी गोष्ट आणि तिसरी सर्वात महत्त्वाची म्हणजे दूर पश्चिमेला समुद्रकाठी द्वारका स्थापन करून यादवांचे राज्य निर्माण करणारा भगवंत श्रीकृष्ण तिकडे हस्तिनापूरच्या जवळपासच्या जंगलात येऊन एका व्याधा तर्फे मारला जातो ही तिसरी गोष्ट. ह्या तीन घटना अथवा गोष्टींची सत्य स्थिती जाणणे हे काम आपण इतिहास संशोधकांवर सोडून देऊ शकतो. अथवा कदाचित ज्याला आपण क्रिएटिव्ह लिबर्टी म्हणतो ती येथे घेतली गेली, असे समजून तिच्याकडे दुर्लक्षही करू शकतो. ह्या कलाक्रुतीचे आज गावोगावी रसिकांसमोर धुमधडाक्यात प्रयोग होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. ह्या नाटकातील बरेचसे प्रमुख कलाकार वयोवृद्ध तपोवृद्ध असूनही ज्या जिद्दीने आणि तन्मयतेने आपल्या भूमिकेशी एकरूप होऊन नाटक सादर करतात, हे पाहून त्यांच्या रंगभूमीवरील निष्ठेची आपल्याला कल्पना येते आणि आपण खरोखर त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. संपूर्ण टीमला मन:पूर्वक शुभेच्छा. अनेक दिवसांनतर एक अंतर्मुख करणारा जातीवंत नाट्यप्रयोग बघायला मिळाला याचे समाधान लाभले, हे आमचे अहोभाग्य! सुधाकर नातू, माहीम मुंबई १६

7. "प्रेरणादायी दिशादर्शक 'आनंदी गोपाळ'": काल "आनंदी गोपाळ" हा चित्रपट बघितला. पाल्हाळ न लावता, पहिलाच मुद्दा सांगतो की, हा चित्रपट इतका सर्वांगसुंदर आहे की, तो भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात यावा. "त्या" वेळची माणसं, आणि "त्या" वेळचे वातावरण, तसेच कर्मठ समाजाची परंपरागत मनोधारणा, अशा माहोलात गोपाळराव जोशींसारख्या एका विक्षिप्त म्हणवल्या जाणाऱ्या माणसाने, स्त्रियांच्या परावलंबित्वातून निर्माण झालेल्या अगतिकतेवर उपाय म्हणून, आपल्या बायकोला काहीही करून सुशिक्षित करावयाचे हा घेतलेला अट्टाहास, पाहिलेले ते स्वप्न, हा खरोखर जगावेगळा वेडेपणा होता. कारणपरत्वे आपले मूल योग्य तर्हेची लक्षणांची जाणीव, व सत्वर उपाय न मिळाल्यामुळे व डॉक्टर वेळेवर न मिळाल्यामुळे मरण पावले, या विषण्ण करणार्या जाणिवांतून आनंदीबाईंच्या मनात तर, भावी समाजाच्या भल्यासाठी, डॉक्टर होण्याचे स्फुल्लिंग निर्माण होते हीच बाब अतुलनीय! त्या आदर्शवत् ध्येयाचा पाठपुरावा, हे अद्वितीय जोडपे, अनेक अडचणी संकटे येऊनही कसे पूर्ण करते, त्याचे ह्रदयंगम चित्रण हा बोलपट प्रभावीपणे करतो. अशा जीवघेण्या कसोटी पहाणार्या धडपडीमुळेच, आनंदीबाई जोशी, ह्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आणि तेही केवळ २२ वर्षांच्या अल्पायुष्यात, एखादी ग्रीक ट्रँजेडी शोभावी अशा दुर्देवी तर्हेने. चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारा असला, तरी आजपर्यंत, ज्या ज्या स्रीयांनी विविध क्षेत्रांत, असे चाकोरीबाहेरचे 'पहिल्यात पहिले', असे योगदान दिले, त्या सार्यांची मांदियाळी रूपेरी पडद्यावर झळकते व ती पहात पहात सारे प्रेक्षक ताठ मानेने व भारावून जावून चित्रपटग्रहाबाहेर पडतात. हा चित्रपट खरोखर उत्तम अभिनय योग्य असे संवाद आणि कार्यकारणभाव पटेल, परिणाम आणि कृती यांचा मेळ घालता येईल असे प्रसंग, त्याचबरोबर योग्य त्या पार्श्वभूमीचे चित्रण, त्या जोडीला अनुरूप असे संगीत ह्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. प्रमुख योगदान अर्थातच नायक ललित प्रभाकर आणि नायिकेच्या रूपात भाग्यश्री मिनिंग यांनी दिले आहे. प्रथम पत्नीच्या सासुबाई झालेल्या श्रीमती कुलकर्णींचेही खरोखर वैशिष्ट्यपूर्ण असे काम झाले आहे. एकूणच सर्वच पात्रे आपाआपली व्यक्तिरेखा चपखलपणे सादर करत असल्यामुळे, हा चित्रपट एक चविष्ट असा हवाहवासा मसाला बनलेला आहे. हे सारे घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून, श्री. समीर विद्वांस ह्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. उत्क्रांती हा सर्व सजीवांचा मूलभूत असा आविष्कार आहे, नव्हे त्यांची ती गरज आहे. सहाजिकच हजारो वर्षे स्त्रियांना जाणीवपूर्वक शिक्षणापासून दूर ठेवल्यामुळे, त्यांच्यावर जी परावलंबित्वाची, एक प्रकारच्या गुलामीची वेळ आली होती, ती द्रष्ट्या अशा अनेक समाजसेवकांच्या कामगिरीमुळे दूर झाली. त्यामध्ये गोपाळराव जोशी या माणसाचा सिंहाचा वाटा होता हे आपल्याला मान्य करावेच लागेल. आज आपल्या भोवती स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर काम करताना दिसतात. त्याचे मूळ गेल्या शतका दीडशतकातील क्रांतिकारक अशा समाजसुधारणांत आहे. हा चित्रपट बघितल्यामुळे प्रत्येकच व्यक्तीला, विशेषतः स्त्रियांना वाटेल की आज माझी जी परिस्थिती आहे, ती मी काही करून अधिक उत्तम बनविण्यासाठी कष्ट घेईन; तसेच पुरुषही स्वतःची प्रगती करता करता, आपल्या कुटुंबातील समस्त स्त्रीवर्गालाही, योग्य ते प्रोत्साहन देऊन त्यांच्या गुणांना योग्य तो मार्ग दाखवत प्रगतीसाठी साधू शकतील. अशा तऱ्हेची प्रेरणा देणारा चित्रपट खरोखर दुर्मिळच! म्हणूनच सुमार चरित्रपटांच्या भाऊगर्दीत "आनंदी गोपाळ" हा चित्रपट एखाद्या कोहिनूर हीर्यासारखा मुकूटमणी म्हणून शोभतो. धंदा कला आणि विचार अशा त्रिवेणी संगमातून निर्माण केली जाणारी करमणुकीची कलाकृती ही नेहमीच असामान्य मानली जाते. त्या तुलनेत "आनंदी गोपाळ" चित्रपटाने ह्या गुणत्रिवेणीचा यथोचित समतोल साधून, वेगळी दिशा दाखवण्याचे महत्कार्य केले आहे. म्हणूनच पुन्हा सांगतो की, हा चित्रपट ऑस्कर मिळविण्याच्या लायकीचा आहे. प्रत्येकाने तो बघावाच अशी माझी कळकळीची सुचना आहे. सुधाकर नातू. 8. "तिला काही सांगायचयं":एक गंभीर संशयकल्लोळ!: एका तसबिरी वरून सुखवस्तू अशा एका दांपत्यामध्ये संशयाचे बीज कसे रोवले गेले आणि त्यातून हलकेफुलके संगीतमय असे नाट्य "संशय कल्लोळ" ह्या गाजलेल्या नाटकामुळे आपल्या परिचयाचे झाले आहे. परंतु तिथे केवळ दोन पात्रेच नव्हती तर इतरही अनेक पात्रांचा त्या नाटकात समावेश होता. परंतु हे नवे कोरे श्री. हेमंत एदलाबादकर लिखीत व दिग्दर्शित"तिला काही सांगायचय्" नाटक केवळ दोन तरुण व्यक्तींचे आहे. सहाजिकच केवळ नावावरूनच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करण्याचे सामर्थ्य असलेले हे नाट्य उत्तरोत्तर रंगत जाते. "तिला काही सांगायचंय" हे नाटक "झी मराठी" तर्फे सादर केलेले आहे. तर निर्मिती श्री. चिंतामणी थिएटर्सची आहे. "चारचौघी" सारखी चाकोरीबाहेरची नाट्ये सादर करणार्या ह्या नामवंत नाट्यसंस्थेची, नेहमीच विचार प्रवर्तक आणि सामाजिक कौटुंबिक समस्या ऐरणीवर आणणाऱ्या नाटकांची परंपरा आहे. रसिक त्यांचे उत्तम स्वागतही करतात. त्यातून "झी मराठी" सारख्या मीडियातील अग्रगण्य संस्थेचे पाठबळ मिळाल्यामुळे या नाटकाची जाहिरात अतिशय उत्कंठापूर्ण व अनोखे रहस्य प्रकट करणारी होती. सहाजिकच हे नाटक पहाणे क्रमप्राप्त होते. लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच जाणार्या ह्या कलाक्रुतीमध्ये केवळ नायक व नायिका अशी दोनच पात्रे दिसतात. अर्थात् फक्त दोन पात्रे असलेली नाटके मराठी रंगभूमीला नवीन नाहीत. "आरोप" हे त्यातले एक प्रमुख रहस्यप्रधान नाटक. तर दुसरे "संकेत मिलनाचा" असे कुतूहल जाग्रुत करणारे. दरवर्षी एका ठराविक दिवशी विभिन्न जोडीदार असलेल्या विवाहित स्री व पुरुषाने पंचवीस वर्षे, एकत्र एकाच ठिकाणी भेटून हितगूज करायचे, अशा त्यावेळच्या काळाच्या पुढच्या, अद्भुत संकल्पनेवर बेतलेले हे नाटक पूर्वी विलक्षण गाजले होते. तर त्याच धर्तीवर त्या नाटकाची जागा एका वेगळ्या पद्धतीने घेणार्या नवविवाहित जोडप्याचे असलेले "तिला काही सांगायचय" हे नाटक रसिकांनी पाहण्यासारखे आहे. "ती" आणि "तो" ह्यांच्या विवाहाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच्या रात्री, त्यांचा एकमेकांमधला रंगत जाणारा व रहस्य निर्माण करत रहाणारा संवाद, असे या नाटकाचे थोडक्यात स्वरूप आहे. पण प्रसंग आणि संवाद अशा खुबीने रंगवत नेले आहेत की, त्यामधून दोघांच्या वैयक्तिक पार्श्वभूमीची प्रेक्षकांना हळूहळू कल्पना येत जाते आणि तिथेच नाटकाचे यश आहे. कोणत्याही नवपरिणीत जोडप्यांचे एकमेकांतील भावबंध हे परस्परांना नीट समजून उमजून घेऊन त्यांच्या गुणदोषांसकट जेव्हा स्वीकार होतो तेव्हाच ते अधिक चांगले बनतात. पण संशयाचे भूत आणि त्यातून आपला जोडीदार दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नादी लागून आपल्याला फसवतो आहे असे काही ढग जर निर्माण झाले तर त्यातून प्रक्षोभ भांडण वितंडवाद, प्रसंगी फारकत हा वास्तव परिणाम असतो. एकमेकांतील खेळकर संवादातून हे जोडपे रंगमंचावर, संशयाच्या पुलावरून पहाता पहाता प्रेमाकडून विद्वेषाकडे, सुसंवादाकडून विसंवादाकडू कसे वहावत जाते ते पहाणे, हा एक ह्रदयाची धडधड वाढविणारा जीवंत अनुभव आहे. एकमेकांच्या वागणुकीबद्दल संशय घेत ते अशा बिंदूला येऊन पोहोचते की वर्षाचा विवाह चा वाढदिवस साजरा होतो की नाही अशीच शंका निर्माण व्हावी. "ती"ची भूमिका समर्थपणे पेलली आहे तेजश्री प्रधान (अर्थात "होणार सून मी ह्या घरची" मधली जान्हवी) आणि" "तो" झाला आहे, तिला सडेतोड उत्तरे देणारा आणि प्रसंगी अभिनयाच्या क्षेत्रात उजवा वाटणारा आस्ताद काळे (अर्थात सरस्वती मालिकेतील मोठे मालक!) एकमेकांच्या चारित्र्यावरून घेतलेल्या संशयाचे भूत परमोच्च बिंदूला, ती जेव्हा बोलू लागते आणि रहस्यामागून रहस्ये उलगडतात तेव्हा धक्क्यावर धक्के बसत जातात. पुढे काय होते, सत्य काय असते अन् शेवट काय कसा होतो हे पहाण्यासाठी नाटकच प्रत्यक्ष पहायला हवे. सुधाकर नातू 9."वाहता वाहे, 'मालिका'माई"!: "माझ्या नवर्याची बायको": सगळ्यात गंमत कोणाची असेल आणि उरफाटे वागण्याची कमाल असेल आणि ते चालवून घेत घेत मालिका सर्वोत्तम मालिकेची बिरुदं कोण मिरवत असेल, ती म्हणजे "माझ्या नवऱ्याची बायको" मधील राधिका! ज्या बाईच्या नवऱ्याने तिला एकदा नव्हे दोनदा नावे फसवले आहे. एवढेच नव्हे तर आपल्या प्रेयसी शनायाशी चक्क दुसरे लग्न केले आहे, त्याच्या विरुद्ध फौजदारी न करता शनाया ला राधिकाने घरात आणून ठेवणे हे म्हणजे कल्पनेपलीकडचे, कधीच कुणालाही न पटणारे तर्कविसंगत आणि अक्षरशः मूर्खपणाचे वेडेपणाचे आहे. तेच पुन्हा पुन्हा मिरवले जावे आणि जी मालिका कितीतरी अगोदर संपायलाच हवी होती, ती मालिका अजून चालूच रहाण्यासारखे दुर्दैव नाही! "घाडगे अँड सून": "घाडगे अँड सून" मध्ये तर जो काय हलकल्लोळ पहिल्यापासून तियारा आणि अमृता मध्ये चालला आहे तो म्हणजे प्रेक्षकांना ग्रुहीत धरण्याची परीसीमा आहे. तसेच घाडगे कुटुंबामध्ये एकत्र राहणे व वेगळे रहात वाठण्या मागणे, असे प्रकार घडवत, ही मालिका आपली घसरगुंडी सारखी पुढे पुढे जात चालली आहे! "राधा प्रेम रंगी रंगली": "राधा प्रेम रंगी रंगली" ही खरं म्हणजे एकेकाळी अतिशय उत्कंठापूर्ण मालिका होती. पण तिने जो काही धेड गुजरी रंग घेतला तो काही केल्या आता बदलायचे नाव नाही. कोण कसा वागतो त्याला आता कुठलाच धरबंध नाही. कोट्याधीश असलेली खलनायिका दीपिका, चक्क बंगाली बाईच्या वेषात आणि एखादा हमाल शोभेल अशा माणसाशी विवाह करून निंबाळकरांच्या चाळीत शेजारी रहायला येऊन, जी काही कळलावी कारस्थाने केली, तो तमाशा कधीच संपला. श्रीक्रुष्णक्रुपेने, आता तर प्रेमचा मुका राहण्याचा अट्टाहास, मालिकेचा खरोखर खेळखंडोबा चुथडा करत आहे. शिवाय घरातील मुलगी-राधा आणि सून-अन्वीता किती दिवस गर्भवती ठेवल्या जाणार ते श्रीक्रुष्णच जाणे! या मालिकेमध्ये सुसंगत वागणारी पात्रं, किती ते शोधण्याची स्पर्धाच लावायला हवी! "सुर राहू दे": "सुर राहू दे" मध्ये तर कहरच झाला आहे. इथे 'डर' चित्रपटातील शाहरुखची आठवण व्हावी, अशा तऱ्हेचे वागणे त्यातील खलनायिका नंदिनीचे दिसत आहे. नायिका आरोही ह्या वेडेपणाचे सोंग घेतलेल्या माजखोर बाईला, बरे करण्याच्या अट्टाहासापायी आपल्याच घरी सगळ्यांचा विरोध असताना कां ठेवून घेते, हे खरोखर समजण्यापलीकडचे आहे. नवर्याचे प्रेम आपल्यावर असताना, त्याच्यावर वेड्यासारखे प्रेम करणाऱ्या दुसऱ्या स्त्रीला कोण समंजस स्री, आपल्या घरात ठेवून घेईल? पण तर्कविसंगतच वागायचे आणि त्यापायी प्रेक्षकांच्या मनात संताप निर्माण करायचा, हाच वसा मालिकांतील नायिकांनी घेतलेला असल्यावर दुसरे काय होणार? "अशा ह्या दोघी": "अशा ह्या दोघी" मध्ये मीरा ज्याचे आपल्यावर प्रेम आहे आणि ज्याच्यावर आपलेही प्रेम आहे अशा आदित्यशी लग्न न करता, एक मुलगी असलेल्या विधुर देवाशिष कामत बरोबर कां विवाह करते हे समजण्यापलीकडचे! हा विवाह झाल्यानंतर सारं छान चालणार असे वाटत असताना, नणंदेने प्रवेश करून मीराला त्रास देणे नंतर नवीन वळण देण्यासाठी, धक्कादायक रितीने अचानक देवाशिष गायब होतो. ह्या कारस्थानामागे कोण आहे हे शोधण्यात मालिकेने पुढे पुढे नेली जात आहे. एक पात्र अंतर्धान पावले म्हणून इन्स्पेक्टर रागिणीच्या रूपात नवीन पात्र आणले जाऊन मालिका चालू ठेवली जात आहे. थोडक्यात जशी गरज असेल तसे एखादे पात्र गायब करायचे आणि नवीन पात्र आणून मालिकेच्या कथानकाला कशी कलाटणी द्यायची हे तंत्र वापरले जाते. बहुदा बुद्धिबळातील खेळाप्रमाणे कुठली चाल पुढे खेळायची हे खेळणारे ठरवतात, तसं टीआरपी वाढवण्यासाठी आता काय नवीन युक्ती करायची याचा खल बहुदा क्रीएटीव टीम करत असावी आणि कुणी कसंही वागलं तरी चालेल पण मालिका पुढे गेली पाहिजे, केवळ ह्याच ध्येयाने हे सारे चालवले जाते. बिचारे प्रेक्षकही त्यांच्याबरोबर फरफटली जातात हे दुर्दैव! "नकळत सारे घडले": "नकळत सारे घडले" मध्ये देखील प्रताप व नेहामधला उलट सुलट प्रेम व राग ह्यांचा लपंडाव, एक नवरा अन् दोन बायका असे सगळे प्रकार करून झाले. नशिबाने बहुदा आता ती एकमेव मालिका लवकरच अंतर्धान पावणार आहे हे प्रेक्षकांचे नशीब! "वाहता वाहे, 'मालिका'माई"!: "संथ वाहते कृष्णामाई" असं म्हणतो खरे तर त्याच धर्तीवर हे सगळे गौडबंगाल खेळखंडोबा पाहून आपल्या मनात हाच विचार येतो की वाहता वाहे "मालिका"माई! अशा तर्हेने बहुतेक मालिका रेंगाळत जात असल्याने त्या ताबडतोब, प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत न पहाता बंद कराव्यात. सुधाकर नातू ------------------------------------------------------------------------------------------------ 10."राहू व केतूच्या राश्यंतराचे परिणाम": येत्या २३ मार्च २०१९ रोजी राहू-केतू चे राश्यंतर होत आहे. राहू कर्केतून वक्री मिथुन राशीत आणि केतू मकरेतून धनु राशीत, जिथे शनी आहे, तिथे प्रवेश करणार आहे. ही राहू केतूची स्थिती २२ सप्टेंबर २०२० पर्यंत राहणार आहे. ह्या कालखंडातमध्ये राहू केतूच्या राश्यंतराचा एकंदर काय परिणाम होईल यावर ज्योतिषींनी प्रकाश टाकणे गरजेचे आहे. ह्या लेखात आम्ही तसा राशीनिहाय प्रयत्न केलेला आहे. अभ्यासूंनी त्यावर अधिक सखोल विचार करून आपले मत बनवावे. सर्वसाधारण वाचकांनी ह्या निरीक्षणांकडे, एक दिशादर्शक अशा दृष्टीने बघून आपले प्रयत्न आणि अपेक्षा ह्यांची समन्वयता साधावी. हे राश्यंतर, कोणाला चांगलं, कोणत्या राशीला वाईट आणि कोणत्या विशिष्ट अशा विषयांवर वाईट, ह्याचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे आणि तो असा करायला लागेल की जणू काही चंद्र कुंडली धरून त्या राशीच्या कोणत्या स्थानी हे ग्रह होते आणि आता कोणत्या स्थानी ते येणार आहेत याचा अभ्यास केला पाहिजे. अशा विचारधारेवर प्रत्येक राशीचा अभ्यास केला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे निष्कर्ष काढता येतील: १.मेष: मेष राशीच्या पराक्रमात आता राहू येणार आहे. त्यामुळे उत्साह वाढता राहील आणि इतके दिवस करावयाची महत्वाची कामे पूर्ण होऊ शकतील. आपल्या जबाबदाऱ्या हिंमतीने पार पाडाल मात्र केतू भाग्यस्थानात असल्यामुळे एकंदर अधिक अपेक्षा आपल्या भाग्योदयाच्या करू नका. जी काही फळे मिळतील नोकरी-व्यवसायात, त्यात समाधान माना. आतापर्यंत चौथा राहू असल्यामुळे मानसिक असमाधान होते, ते मात्र आता नियंत्रणात राहील, भावंडांकडून मात्र थोडाफार त्रास होऊ शकतो किंवा त्यांच्याबरोबर मतभेद होऊ शकतात. इतरांच्या तुलनेत, मेष राशीला हा कालखंड अधिक चांगला जाऊ शकेल. २. व्रुषभ: वृषभ राशीला आता काय होणार तर, त्यांच्या धनस्थानात आणि अष्टम स्थानात राहु आणि केतु येणार. धनस्थानात म्हणजे आर्थिक चणचण भासू शकेल खर्च जास्त होतील. हेच कुटुंबाचे स्थान आहे म्हणजे कौटुंबिक कलह वा काहीतरी नव्या जबाबदाऱ्या वाढू शकतील. केतू अष्टम स्थानी म्हणजे त्यामुळे विविध प्रकारचे काही त्रास वा मोठे अचानक नुकसान अशा तऱ्हेचे अनुभव येतील. ३. मिथून: मिथुन राशीचा जर विचार केला, चंद्राबरोबर म्हणजे तुमच्या डोक्यावर राहू आणि सप्तम स्थानात म्हणजे जोडीदार भागीदारीच्या स्थानात केतू त्यामुळे महत्वाचे विचार करताना संभ्रम निर्माण होऊ शकतील. चुकीचे निर्णय परस्परसंबंधात काहीना काहीतरी वितुष्ट अशा तऱ्हेचे फळे मिळू शकतात. तुमच्या वागण्याच्या पद्धतीला सुधारावे लागेल. तसेच जोडीदाराशी मतभेद टाळावे लागतील. व्यवसाय नोकरी स्थानापासून राहू चौथा असल्यामुळे तेथूनही तुम्हाला जास्त अपेक्षा करता येणार नाहीत आणि जैसे थे परिस्थिती राहील. थोडक्यात मिथुन राशीला हे संक्रमण तेवढे फलदायी नाही. ४. कर्क: कर्क राशीच्या व्ययांत राहु तर शत्रुक्षेत्री केतू, शनीबरोबर अशी स्थिती या कालखंडात राहणार आहे. विवाह जुळणी संबंधी काही अडचणी अथवा चौकशी अधिक करावी नाहीतर फसगतीची शक्यता अशा तऱ्हेचे योग आहेत. तसेच जुनी येणी परत मिळणे कठीण होऊ शकते. आरोग्यासंबंधीची काळजी वेळीच घ्यावी. पोटाचे विकार अथवा डोकेदुखी संबंधी काही समस्यांचे निरसन करणे गरजेचे ठरेल. भावडांबरोबरचे संबंध बिघडू शकतात आणि प्रवासामध्ये किरकोळ अपघात अडचणी हे ग्रहयोग सुचवतात. थोडक्यात तारेवरची कसरत करण्याचा काळ आहे. ५. सिंह: सिंह राशीला राहू लाभात येत असल्यामुळे शुभ फले देऊ शकतो. मात्र त्याच वेळेस केतु पंचम स्थानात असल्यामुळे काही निर्णय चंचलतेमुळे चुकू शकतात. त्यामुळे नोकरी व्यवसायात नुकसान होऊ शकते याचे भान ठेवायला हवे. केतू पंचमात असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात चलबिचल अथवा अपेक्षित यश विद्यार्थ्यांना न मिळणे आणि संतती विषयक काही समस्या वडीलधाऱ्यांना येऊ शकतात. एकंदर हा काळ संमिश्र आहे असेच म्हणावे लागेल. ६. कन्या: कन्या राशीला दशमात राहू आणि चतुर्थात चंद्र केतू यामुळे हा काळ कसोटीचा जाऊ शकतो. माता-पित्यांना काळजी घ्यावी लागेल- त्यांच्याकाही अनारोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबात महत्त्वाच्या प्रश्नावर मतभेद होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात ताणतणाव वाढेल आणि जबाबदाऱ्या योग्य वेळेला न पूर्ण झाल्यामुळे वरिष्ठांची बोलणी खावी लागतील. धंद्यात आर्थिक नुकसानीचा फटका बसू शकतो. इतरांच्या तुलनेत तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू नका आणि प्रयत्न मात्र वाढवा असेच या कालखंडाचे सांगणे आहे. ७. तुळा: तुला राशीच्या बाबतीत केतू पराक्रमात तर राहू भाग्यस्थानात अशी स्थिती आहे. त्यामुळे संमिश्र फळे मिळतील. भाग्यस्थानातील राहुमुळे तुमच्यापुढे आलेल्या संधी, काही अडचणी आल्यामुळे त्यांचा फायदा होणार नाही. प्रवासात वाद विवाद किंवा इतर काही अडचणी विलंब ह्यांची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भावंडांच्या आरोग्य विषयी काही चिंता निर्माण होऊ शकतात. एकंदर हा काळ प्रतिकूल आहे त्यामुळे सावधानता बाळगणे आवश्यक आहे. ८. व्रुश्चिक: वृश्चिक राशीचा विचार करता या राशीला राहू आठवा आणि केतू शनी बरोबर दुसरा असल्यामुळे सर्व राशींमध्ये जास्त कसोटीचा काळ जाऊ शकतो. अचानक आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेला बाधा येईल अशा घटना घडू शकतील. कौटुंबिक जीवनामध्ये अडी अडचणींचा हा काळ असू शकतो. पंचमाच्या चतुर्थात राहू असल्यामुळे निर्णयशक्ती योग्य तऱ्हेने काम करेल असं नाही. त्याचप्रमाणे संतती विषयक काही समस्या निर्माण होऊ शकतात. अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेऊन संयमाने या कालखंडात आपल्याला येणाऱ्या परिस्थितीशी धैर्याने मुकाबला करावयाचा आहे. ९. धनु: धनु राशींत चंद्राबरोबर केतू शनी असल्यामुळे मानसिक चांचल्य वाढण्याची या कालखंडात शक्यता जास्त आहे. त्याचप्रमाणे जोडीदाराच्या स्थानात राहु असल्यामुळे मतभेद अथवा सांसारिक जीवनात जबाबदाऱ्या वाढल्यामुळे होणारे एकंदर ताणतणाव अशा तऱ्हेचा अनुभव या कालखंडात येईल. चतुर्थ स्थान त्याच्या केंद्रात राहू असल्यामुळे मातुल घराण्यातील वडीलधार्या मंडळींची काळजी, त्याच प्रमाणे स्थावरासंबंधी योग्य निर्णय न होणे, मानसिक चिंता अशी फळे मिळू शकतात. १०. मकर: मकर राशीच्या व्ययांत केतू शनी आणि षष्ठ अर्थात शत्रू स्थानात राहू असा संमिश्र कालखंड आहे. षष्ठातील राहू उत्साह वाढवू शकतो तसेच समोर येणाऱ्या कठीण प्रसंगांना विरोधाला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता निर्माण करू शकतो. मात्र य व्ययातील शनी केतू तुमच्या उत्सवावर पाणी टाकू शकतात. त्याचप्रमाणे बंधू-भगिनींशी मतभेद किंवा इतर अनुचित अनुभव येऊ शकतात. प्रवासातही विलंब आणि अडचणींना तोंड द्यावे लागेल. ११. कुंभ: कुंभ राशीला राशीस्वामी शनी केतू बरोबर लाभस्थानी आणि पंचमात राहु अशी संमिश्र स्थिती आहे. एकीकडे नोकरी-व्यवसायात चांगले लाभ आणि संधी तर दुसरीकडे आपल्या निर्णयामधील चांचल्य असा विरोधाभास अनुभवाला येईल. तसेच संततीविषयक काही महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्यावी लागेल. कारण त्यांत चूक होण्याची शक्यता अधिक आहे. धनस्थानाच्या चतुर्थात राहू असल्यामुळे आर्थिक बाजू सांभाळून मगच पुढे जावे लागेल, कौटुंबिक वादविवाद टाळावे लागतील. एकंदर कुछ खट्टा कुछ मीठा असा ह्या राशीला अनुभव यावा. १२. मीन: मीन राशीच्या दोन केंद्र स्थानात राहू-केतू अशी योजना या कालखंडात येत असल्यामुळे एकीकडे मानसिक विचीत्र अवस्था व स्थावरासंबधी कटकट, तर दुसरीकडे नोकरी-व्यवसाय त्याचबरोबर माता पिता अशा प्रकारच्या गोष्टींवर राहू, केतू बरोबर असलेला शनी ह्यांचा अनिष्ट प्रभाव पडणार आहे. सहाजिकच ह्या सार्या गोष्टींच्या संबंधी तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीशी तोंड द्यावे लागणार आहे. प्रसंगी नुकसानही संभवते. मानसिक असमाधान वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. संयम ठेवा. ह्याप्रमाणे आम्ही राहू-केतू यांच्या राश्यंतराची फळे मांडायचा प्रयत्न केला आहे. तो करताना हे पाप ग्रह, कोणत्या राशीला कोणत्या प्रकारची फळे देणाऱ्या स्थानात त्यांचा प्रभाव आहे, ह्याचा प्रामुख्याने विचार केला आहे. ज्योतिषाकडे अभ्यासपूर्ण दृष्टीने बघण्याचा हा एक प्रयत्न आहे. आम्ही मांडलेली निरीक्षणे ही ज्याची त्याने तपासून घ्यावी आणि एकंदर आपल्या अपेक्षा आणि प्रयत्न यांच्यात समतोल साधून समाधान मिळवायचा प्रयत्न करावा. सुधाकर नातू. 11. "सहज सुचले ते ते"!: "काळ अन् वेळेचा जमाखर्च!": कुणालाही न सांगता काळ हा जातच असतो पुढे पुढे. त्याला मागे वळणे माहीत नाही, तो अव्याहत पुढेच जात रहाणार असतो. मागे गेलेला काळ आणि वेळ फुकट गेली की, चांगल्या समाधानकारक अशा गोष्टींसाठी वापरली गेली, ह्याची आपल्याला कायमच रुखरुख लागली पाहिजे. कारण उपलब्ध वेळ तुम्ही कसा वापरता, कशा करता वापरता, ह्यावर आणि फक्त ह्यावरच तुमचे समाधान, यश अवलंबून असते. ध्यानात ठेवा, आयुष्य हा लिमिटेड ओव्हर्सचा सामना असतो आणि ज्याचा "रन रेट" अधिक तोच जिंकणार! थांबला, तो संपला! पण दुर्दैवाने, आपल्याला वेळेचे भान राहत नाही, आपण नको त्या गोष्टीत वेळ घालवत राहतो, आणि नंतर फक्त पश्चाताप करायची पाळी येऊ शकते. कायम सजग राहून आपण वेळ कसा घालवला, वा कसा अधिक चांगल्या प्रकारे घालवता येईल किंवा घालवण्यापेक्षा वापरता येईल, ह्याचाच सातत्याने विचार केला पाहिजे. त्यासाठी दररोज सकाळी, कालचा दिवस समाधानकारक आणि कोणत्या उपयुक्त योगदानांमध्ये गेला, ह्याची नोंद ठेवणे उपयुक्त ठरू शकते. हे अंतिम सत्य आहे की, काळ, वेळ ही सगळ्यांना सारखी असते. कदाचित मृत्यु आणि वेळ ह्या, दोनच गोष्टी अशा आहेत की, जिथे कुठलीही भेदभावाची सुतराम शक्यता नाही. ते लक्षात ठेवून, समोर आलेला प्रत्येक क्षण अधिकाधिक उपयुक्त गोष्टींसाठी, स्वतःला किंवा इतरांना समाधान देण्यासाठी वापरता आला तर आपला दिवस चांगला गेला असे म्हणता येईल. -------------------------------------------------------------------================= कालचक्र सातत्याने बदलतं, हे जरी खरं असलं तरी "आमच्या वेळेला 'हे' असं नव्हतं" आणि दुसरे म्हणजे "कोण ही महागाई! आमच्या वेळेला एवढी महागाई नव्हती बुवा!" हे बोल मात्र, पिढ्यान् पिढ्या नेहमी आपल्याला कायमच ऐकू येत असतात! ------------------------------------------------------------------------------------------------ "करा दिवस, अर्थपूर्ण!": रोजनिशी लिहीणे खरोखरच चांगले व कौतूकास्पद, परंतु सर्वांनाच ते सर्वकाळ साधता येतेच असे नाही. संकल्प करणेही असेच उत्तम व जरूरीचे, परंतु सर्वच संकल्प सिद्धीस नेणे, सर्वांनाच जमते असे नाही. पण निराश होण्याचे कारण नाही, एक साधा, सोपा आणि सगळ्यांनाही सहज जमू शकेल असा मार्ग आहे. तो म्हणजे, दररोज सकाळी, दिवसाच्या प्रारंभीच, आपण काल कोणती, कोणती कामे पूर्ण केली, त्याची एक एक ओळीमध्ये नोंद करणे. गेलेला दिवस अर्थपूर्ण आणि समाधानकारक होता, किंवा कसे हे जसे त्यामुळे समजेल, तसेच त्या अनुषंगाने आजच्या दिवसाच्या प्रयत्नांना योग्य दिशाही उमजेल, वेळेचा दुरूपयोग टाळण्याचा मार्गही गवसेल. मी ही अशी सोपी सवय जेव्हापासून सुरू केली आहे, तेव्हापासून, मला आजचा दिवस, कालच्यापेक्षा चांगला गेला, हे प्रत्येक उद्द्याला समजण्याची गुरूकिल्ली सापडली आहे! विचार करा आणि तुम्हीही ही सुलभ संवय अंगिकारा. ------------------------------------------------------------------------------------------------ "मागले पान, ज्ञानाची खाण": दिनदर्शिकेची पुढची पाने बघायची वेळ ही, केव्हां सुट्टी वा सण आहे, ते जाणून घेण्यापुरतीच मर्यादित असते. सहाजिकच मागील पानांचे दर्शन, केवळ महिना संपल्यावर पान उलटताना होते एवढेच. पण नुकतेच वर्ष संपल्यावर, जुनी दिनदर्शिका गुंडाळी करून बाजूला ठेवताना, तिच्या मागील पानांकडे लक्ष गेले अन् कळत न कळत ठिय्या मांडून, एका बैठकीत बाराही पानांवरील विविध विषयांवरील, उपयुक्त माहितीपूर्ण असे सर्व लेख वाचून काढले.
 ------------------------------------------------------------------------------------------------ 
"मूल्यशिक्षण सांस्कृतिक रिनायसन्स!": आपण इतके दिवस जाणीवा विस्तारणार्या कोणत्या मौल्यवान खजिन्याला मुकलो होतो, ते मला उमजले. आपणही दिनदर्शिकांची मागील पाने अशीच जरूर नजरेखालून घालावी. बँकांचे खाजगीकरण वा सरकारीकरण ह्या दोघांच्याही यशस्वितेमागे, प्रामुख्याने जबाबदार असते, ती माणसांची आणि समाजाची मानसिकता. गेल्या काही दशकांत, ढासळत गेलेली मूलभूत मूल्यव्यवस्था आणि खालावलेली सांस्कृतिक सजगता, सध्याच्या भीषण र्हासाला कारणीभूत आहे, हे खेदाने म्हणावे लागते. शक्य आहे, त्यामागे सार्यांनी अंगिकारलेली मुक्त अर्थव्यवस्था आणि जवळ जवळ सगळ्याच गरजांचे अपरिहार्य होत चाललेले बाजारीकरण. माणसांपेक्षा जेव्हां समाज पैसा आणि फक्त पैशाचाच विचार करतो अन् ध्यास धरतो, तेव्हा वरील दोन्हीही मार्ग अंतिमतः सपशेल अपयशी ठरणार हे कटू सत्य आहे. आज गरज आहे ती तळागाळापासून वरपर्यंतच्या मूल्यशिक्षणाची आणि सांस्कृतिक रिनायसन्सची! 
------------------------------------------------------------------------------------------------ 
सुधाकर नातू


मंगळवार, २ एप्रिल, २०१९

"वाचाल, तर टिकाल!":

"वाचाल, तर टिकाल!": "रुचि" मासिकाचा फेब्रुवारी'१८ हा अंक वाचकविशेषांक आहे. त्यामधील श्री. किरण येले ह्यांचा "गोचीः वाचन आणि वाचकांची" हा लेख, मी मनापासून शब्दन् शब्द वाचला. त्यामध्ये एकंदरच वाचन संस्कृतीचा सध्या जो ऱ्हास झाला आहे, त्याची "बर्डस् आय व्ह्यू" घ्यावा अशा पद्धतीने सर्वंकष तपासणी करून, आपली निरीक्षणे मांडली आहेत. त्या लेखामधील एक अत्यंत महत्त्वाचे असे वाक्य मला मनाला भावून गेले आणि ते खरोखरच वाचन कां अत्यावश्यक आहे आणि "वाचाल तर वाचाल" हे किती सत्य आहे, ते सांगून जाते. ते वाक्य असे आहे: "कपडे आणि दागिने यामुळे शरीर उजळून निघतो आणि पुस्तकांमुळे विचार उजळून निघतात. कपडे, दागिने शरीरावरून उतरवले की, आपण पुन्हा होतो तसे दिसू लागतो. परंतु पुस्तक वाचून संपल्यावर आपण अधिक सुंदर दिसू लागतो." वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दुसरं कोणतही उदाहरण दाखवता येणार नाही, असे हे सारे शब्द आहेत. त्यापुढे जाऊन मला वाटतं की, जेव्हा कोणी लेखन करतो तेव्हा काय होतं तर, ते एखाद्या टीपकागदासारखे घडत असतं! प्रत्येकाच्या जीवन अनुभवाच्या भवसागरातून योग्य असे टिपकागदाप्रमाणे टिपलेले सारे सार, तो लेखक आपल्या समोर त्याच्या शब्दात मांडत असतो. त्यामुळे जणू काही नवनवीन अनुभवांचा अनुभूतींचा अर्कच आपल्यासमोर उलगडत जात असतो. आणि वाचनामुळे हे फक्त आपण आपल्यापुरते अनुभवत असतो. जितकं जास्त वाचन होईल, तेवढं सहाजिकच आपलं जाणीवांचे आणि अनुभवांचे भावविश्व अधिकाधिक प्रगल्भ आणि आनंददायी होईल यात वाद नाही. परंतु सध्याची परिस्थिती अगदी उलट आहे वाचायला कुणाला वेळ नाही. एखाद्याला जर प्रश्न विचारला की, तुला काय आवडतं किंवा तू कसा टाईमपास करतोस? तर असं सांगितलं जातं की मी सिनेमा वा नाटक पहातो किंवा पत्ते वा इतर काही खेळ खेळतो, अथवा एखाद्या कार्यक्रमाला जातो किंवा मित्रमंडळींत जाऊन गप्पा टप्पा करतो किंवा एखादा दुसरा कुठला तरी छंद आहे असे सांगतो. स्वतःहून वरील प्रश्नाला मी नेहमी वाचनात वेळ घालवतो असे उत्तर मिळणे, खरोखर दुर्मिळच होत चालले आहे. हेच मोठे दुर्देव नव्हे कां? अभ्यासपूर्ण व दिशादर्शक असा हा लेख आवर्जून वाचावा, असाच आहे. ---------------------------- शब्दकळा: १. "निखळ वास्तवाची जाणीव करून देणारं, अचूक उत्तर मिळविण्यासाठी, अचूक प्रश्न विचारता येण्याची कला आवश्यक असते." २. "वाचा आणि विचार करा": दररोज सकाळी किंवा रात्री न चुकता, सातत्याने "गुड मॉर्निंग" वा "गुड नाईट"अशा तऱ्हेचे संदेश, सचित्र पाठवण्याची खरोखर काही गरज असते कां, ह्याचा विचार करणे गरजेचे आहे. हा वेळेचा डेटाचा आणि इतरांच्या खाजगी "स्पेस"चा नाहक अपव्ययच नाही कां? ३. "तुम्हीच, तुम्हाच्या जीवनाचे शिल्पकार, हेच खरे आहे कां?": विशिष्ट काळात विशिष्ट निर्णय व क्रुती होते आणि त्यातून तुमचे भवितव्य घडते. ह्या सगळ्यामागे तुमच्या मनाची त्या त्या वेळी असलेली स्थिती जबाबदार असते. सातत्याने गतीमान असलेल्या सूर्यमालेतील ग्रहस्थितीनुसार ती तशी मनस्थिती प्रभावित होते कां, ह्यावर सुरवातीच्या प्रश्नाच्या उत्तराची सत्यासत्यता अवलंबून आहे. ४. जीवन अन् म्रुत्यू, फक्त एका क्षणाचं अंतर, म्हणून पदरी पडणारे, क्षण अन् क्षण जपावे, सत्कारणी लावावेत. ५. "मतभिन्नता": एखाद्या व्यक्तीबद्दल अथवा घटनेबद्दल आपले जे मत असेल, तसेच दुसर्‍या कुणाचे असेलच असे नाही. त्याचे मत अगदी आपल्या विरुद्ध असू शकते. आपले मतच बरोबर आहे, हे दुसऱ्याला त्यामुळे पटवून देणे कर्म कठीण असते, कारण "पिंडे पिंडे मतीर्भिन:!" दुसऱ्याच्या नजरेतून बघण्याचा चश्मा सहसा कुणाकडे नसतो. बहुतेक वाद-विवादांचे, मतभिन्नतेचे मूळ हेच असते. ६. "मुखवटे आणि चेहेरे"!: विचार, उच्चार आणि आचार ह्यामध्ये, एकवाक्यता ठेवणे, सगळ्यांना जमतेच असं नाही. ते जमण्यासाठी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि निस्पृहता असे मूल्याधिष्ठित गुण अंगी असावे लागतात. चंगळवाद आणि "अर्थ हाच सर्वार्थ" मानणाऱ्या आजच्या युगात, सहाजिकच हे सारे गुण दुर्मिळ होत चालले आहेत. सहाजिकच आपल्याला सभोवताली दिसतात, वावरतात, ते मुखवटे आणि चेहेरे, चित्रविचित्र अन् विश्वास न ठेवण्या जोगे! "कालाय तस्मै नमः" दुसरं काय?! ७. "वेळेवर नाही, नांदी": मराठी नाटक कधीही वेळेवर सुरू होत नाही. त्या पायी किती समुह-वेळ व उत्पादकता विनाकारण वाया जात असते, त्याची कुणाला काय पर्वा! एकप्रकारे राष्ट्रीय संपत्तीचा र्हासच नव्हे कां? एकट्या ललितकलादर्शचा आदर्श किती दिवस मिरवणार आणि विसरून जाणार? ८. भवतालातील घडामोडी आणि नित्य बदल यांचे निरीक्षण, संचितातील अनुभवांचा मतितार्थ, माणसामाणसांतील संवाद विसंवादाचे विश्लेषण ह्या सगळ्यांचे चिंतन आणि मनन करून, मी विचार करतो आणि काही शाश्वत तत्वे-'कन्सेप्टस्' मांडण्याचा माझ्या संदेशातून प्रयत्न करत असतो. उत्तरोत्तर त्यामधून आवडल्याचे प्रतिसाद मिळत आले आहेत आणि आता लवकरच सुमारे ११ हजार पसंतीचे मोहरे माझ्या पदरात पडणार आहेत पण त्यामुळे संतुष्ट होणे हे योग्य ठरणार नाही असे मला वाटते कारण जोपर्यंत माझे संदेश कधी येतात आपल्याला कधी वाचायला मिळतात याची उत्सुकता जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत मला माझे प्रयत्न अविरत चालूच ठेवावे लागतील ती स्थिती जेव्हा निर्माण होईल त्यावेळेला कदाचित माझी निर्मिती क्षमता सिद्ध होईल तोपर्यंत हा शब्दांचा खेळ असाच चालू राहायलाच राहील. ९. पुराणांतील वांगी, पुराणांतच शोभतात.' आपला उज्ज्वल इतिहास किती उगाळणार आणि तो, तसा उगाळून काय साधणार? वर्तमान काय आहे कसा आहे, खरोखर किती भूषणावह आहे, ह्याचा आधी गांभीर्याने विचार केला, तरच भविष्यकाळाची काही आशा धरता येईल! उत्साहाचा अतिरेक झाला, की पुष्कळदा हंसेच होते! १०. To support my Hobby of Reading, I happened to collect data of some interesting books from different sources. I am sharing it here, for the like minded souls: 'Pracharya' by Milind Joshi; 'Aisi Kalavlyachi Jati' by Milind Joshi; also by na dho mahanor; 'Vastupurush' by Shradchandra Chirmule; 'antaryami sur gavasale' by Sriniwas Khale.'pannashicha bhojja' by ravi abhyankar; 'char nagaratale maze vishva' by jayant naralikar; 'Samartha Chintan' by Suresh Jakhade;'Ganaryache Por' by Raghavendra Bhimsen Joshi; 'Manatali Manase' by Narendra Chapalgaonkar; 'Muk-Sanvad' By Ramdas Phutane; 'Mandalecha Rajbandi' By Arvind V Gokhale'; 'Unhat Bandhaleli Ghare' By Sandhya Deorukhkar; please do read them. सुधाकर नातू