"किमयागार कल्पना":
उपलब्ध साधनसामुग्रीचाच वापर करुन, एखाद्या किमयागार कल्पनेच्या सहाय्याने अधिक काम अथवा योगदान, कमी श्रमात वा वेळात तसेच, कमी खर्चांत देता येते. माणसाला तरफेचा, चाकाचा, अग्नीचा आणि शेतीचा लागलेले शोध क्रांतीकारक व जीवनशैलींत आमुलाग्र बदल, संक्रमण करणारे होते. गतीमान विकासाचा मार्ग व दिशा अशा किमयागार कल्पनांतूनच जन्म घेतात. "काल"च्या गरजांमुळे जे घडले, त्यांचा "उद्या" वर काय काय परिणाम होऊ शकतो, ह्यांचा विचार करुन, नविन मार्ग, दिशांचा शोध घेत, उपयुक्त कल्पना निर्माण करत, त्या प्रत्यक्षांत आणण्याची क्रीया सातत्याने घडत असते. त्यामुळेच मानवी जीवन अधिक सुलभ, सुकर होत राहिलेले आहे.
लहानपणी, मला शाळेंत पोहोचवायला, गोपाळ नावाचा गडी होता. तेव्हां राधाबाई नांवाची एक प्रौढ विधवा, एक एका फेरीत ८/१० मुलांच्या हातांची साखळी करून त्याना शाळेत नेत व आणत असे. तिचे ते उपजीविकेचे साधन होते व ते तिनेच समाजांतील गरज ओळखून शोधले होते. काळाच्या ओघांत ह्याच संकल्पनेचे स्कूल बस सर्विस सारख्या आज जगन्मान्य व्यवसायात झालेले दिसेल.
त्याच काळाचे आसपास, एक हरहुन्नरी माणूस दररोज पुण्याहून मुंबईस डेक्कन क्वीनने येई व सायंकाळी त्याच गाडीने परत तो पुण्यास जाई. हया दोनही शहरातील नागरिकांची टपाल वा इतर महत्वाच्या गोष्टींची तो प्रवासी ने आण करी. अत्यल्प खर्चांत वेगाने हे काम तो विश्वासाने करे. त्या काळी, हा कोण वेडा असा प्रवासाचा रोज खटाटोप करतोय, असे त्याला हिणवलेही गेले. पण आज जगभर अत्यंत गरजेच्या बनलेल्या कुरीयर सर्विसची ती येथली, मुहूर्तमेढ होती.
कौटुंबिक संकट ओढल्यावर हातात पोळपाट लाटणे घेऊन स्वयंपाकाची कामे करणे अथवा घरी पापड लोणची, मसाले वा फराळाचे जिन्नस बनवून किंवा भोजनाचे डबे पुरविणे, ह्या सार्या क्रियांमधूनच आता लोकप्रिय झालेले ग्रुहोद्योग ही सारी गरज-कल्पना-उपयुक्त योजना ते व्यवसायिक उद्योग अशा साखळीचीच उदाहरणे आहेत.
हाताने लिहायच्या ऐवजी छपाई किंवा प्रती काढण्यासाठी फोटो काँपी यंत्र, कार्बंन पेपर, सायक्लोस्टाईलिंग यंत्र, टाईप रायटर त्या नंतर pc ते lap top ते mobile ते smart phone हे बदल असेच घडत आले आहेत. प्रवासाच्या सुविधांचा विचार केला तर, बैल गाडी वा घोडा गाडी, सायकल सायकल रिक्षा, टू विल्हर,ते थ्री विल्हर पुढे चार चाकी कार, ट्रेन विमान जहाज, पाणबुडी हे शोध चित्तथरारकच नव्हेत कां? करममणुकीच्या क्षेत्रांतील रेडिओ,ट्रान्झीस्टर टेप रेकाँर्डर, कँमेरा, चित्रपट, दूरदर्शन, व्हिडीओ, डीव्हिडी
अशी रोमहर्षक संक्रमणे जवळ प्रत्येक क्षेत्रांत झालेली दिसतील. मूल्यवर्धन हा ह्या सर्व बदलांचा गाभा आहे.
ठेकेदारीचे पुढचे रूप म्हणजे आऊट सोर्सिंग होय. आपली जबाबदारीची कामे दुसर्यांकडून करून घेणे ठिक ठिकाणी दिसते. माहिती व तंत्रद्यानामुळे एका देशातील कामे लांबच्या देशातील आस्थापनांकडून करवून घेतली जातात. प्रवासी संस्था, ईव्हेंट मँनेजमेंट कंपन्या विवाहाचे बाबतीत, अगदी निमंत्रण व्यवस्था, भोजन, सजावट, धार्मिक विधी, स्वागत, पाठवणी अशा सर्व कामांची जबाबदारी यशस्वीपणे पाळतात. एव्हढेच काय विवाह जुळणीचे काम नियतकालिकांनी जाहिरातीद्वारे करण्यापासून आता तर लोकप्रिय वेब साईटस् करताना दिसतात. समाजाची जीवनशैलीत हया सर्व संक्रमणांमुळे आमुलाग्र बदल सतत होत आहे.
माझ्या बाबतीत सांगायचे तर मी काँलेजमध्ये असताना माझ्या पांढर्या शर्टची काँलर खराब झाल्यावर ती कापून तिथे लाल रंगाच्या कापडाची पट्टी मी शिंप्याकडून शिवून घेतली होती. तसेच वापरून खराब झालेल्या फूल पँटची मी प्रथम थ्री फोर्थ, नंतर चक्क हाफ पँट केली होती. एका दशकापूर्वी मी बागेत बसलो असताना मोबाईल ऊलटा धरून माझे मीच फोटो काढत असे. आजची सेल्फी तेव्हा अस्तित्वातही नव्हती! ज्योतिषाचा अभ्यासक म्हणून राशीभविष्य लिहिताना प्रत्येक राशीला त्या कालखंडातील ग्रहबदलानुसार अनुकूल गुण देवून ते मी अधिक वस्तुनिष्ठ केले आहे. हे देखिल मूल्यवर्धनाचे उदाहरण मानता येईल.
किमयागार विचारधारेचा आगामी काळांतील मार्ग कसा असेल? थोडक्यात काही संकल्पना मांडतो:
१ कुरीयर सर्विस देणारे घरी येऊन आपले टपाल घेऊन जातात. तशीच सेवा पोस्टाने देणे सुरू करणे गरजेचे आहे. पोस्टमन टपाल वाटतात तेव्हा, जे टपाल पाठवू इचछीतात, तयाचेकडून ते घेऊ शकतात. मनुषयबळ न वाढवता हे काम होऊ शकेल व पोस्टाचे ऊत्पन्न वाढेल. नागरिकांची सोय होईल.
२ मला आठवते काही दशकांपूर्वी ठराविक वेळी रात्री ठराविक ठिकाणी पोस्टाची फिरती गाडी येत असे व तेथे पोस्टाच्या सर्व सेवा मिळत असत. कार्यालयीन वेळेनंतर ही सेवा उपयुक्त होती. ती पुन्हा चालू करावी.
3 काँलेजच्या एका ब्रेन स्टाँर्मिंग कार्यक्रमात, मी एक अभिनव कल्पना मांडली होती. प्रत्येक अणु ही एखादी सूर्यमाला असावी. केंद्रातील प्रोटाँन म्हणजे एक 'सूर्य व सभोवती गोलगोल फिरणारे ईलेक्ट्राँन हे जणु विविध ग्रह. अंतर हे सापेक्ष असते, ह्या द्रुष्टिकोनाचा मुलभूत विचार करून ही संकल्पना मी मांडली होती.
४ गुणात्मक गोष्टी ह्या व्यक्तिसापेक्ष असतात, त्यामुळे, त्यांचे आकलन वस्तुनिष्ठपणे होण्यासाठी त्याना योग्य ते संख्यात्मक रूप देणे, आवश्यक असते. विकास व प्रगतीची दिशा अशा तर्हेच्या रूपावरून मिळते. मी त्या द्रुष्टिने विविध विषयांचे अनुषंगाने अशी गुणात्मक ते संख्यात्मक रुपांतर करण्याच्या पद्धती निर्माण केल्या आहेत.
५ माझ्याकडून अजून एक किमयागार संकल्पना मी मांडली. ती म्हणजे, जीवनांत समाधान मिळवायचे असेल तर ही सप्तपदी अंगिकारा:
५.१ द्रुष्टि बदला,
५.२ "जीभे"वर ताबा ठेवा.
५.३ "हाता"ने सतत "देत" रहा.
५.४ "ह्यदया" पासून इतरांवर प्रेम करा.
५.५ सतत "चालत" रहा,अर्थात नेहमी "पुढे" बघा.
५.६ "काना"नी ऐका, पण काय "पोटां"त ठेवायचे आणि काय "ओठा"वर आणावयाचे, हयाचे तारतम्य बाळगा.
५.७ आणि सर्वांत महत्वाचे: नेहमी भावना व बुद्धिचा समतोल राखत निर्णय व क्रुती करा.
सुधाकर नातू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा