गुरुवार, १९ एप्रिल, २०१८

दीए जलते है, फुल खिलते हैः


"दिये जलते है, फुल खिलते है",,,!

सोशल मिडीयावर अचानक एक प्रेरणादायी छोटीशी गोष्ट वाचनात आली. खरोखर आजच्या धावपळीच्या, जीवघेण्या धकाधकीच्या जीवनसंग्रामात एक आशेचा किरण दाखवणारी अशी ती गोष्ट:

"एका घरात पाच दिवे जळत होते. एक दिवस पहिल्या दिव्याला वाटले, मी एवढा जळून लोकांना उत्साह देतो, पण त्याची कुणाला कदर नाही. मग असे जळत रहाण्यापेक्षा, विझलेलेच बरे. आणि तो विझून गेला.

हे पाहून दुसर्या दिव्याला वाटले मीसुद्धा असेच विझले पाहिजे कारण मी शांत शीतल प्रकाश देऊनही लोक हिंसाच करताहेत. तो शांतीचा दिवा विझून गेला.

उत्साह व शांतीचे दिवे विझल्यावर, तिसरा दिवा जो हिंमतीचा, तोही निराश होऊन विझला.

उत्साह , शांति आणि आता अब हिम्मत न राहिलेली पाहून चौथा दिव्याला वाटले आपणही असेच विझून जावे. तो सम्रुद्धीचा दिवाही विझला.

असे चारही दिवे एकापाठोपाठ विझल्यावर फक्त बिचारा पाचवा दिवा निमुटपणे एकटाच त्या खोलीत जळत राहिला.

अशा वेळी अचानक एक छोटा मुलगा त्या खोलीत आला. त्याने पाहिले, चार दिवे जरी विझले असले, तरी एक दिवा मंद तेवत आहे. हे द्रुष्य पाहून तो आनंदीत झाला कारण त्याला वाटले की, ह्या एका दिव्याने तो उरलेले चारही दिवे तो प्रज्वलित करून अख्खी खोली छान प्रकाशमान करू शकेल. तो लगेच धावला व हा पाचवा दिवा हातात घेऊन त्याने चारही दिवे पेटवले अन् खोली लख्ख उजळून टाकली!

जाणता कां तो पाचवा दिवा कसला होता?

तो होता नव्या उमेदीचा, स्फूर्तीचा. जीवनात सगळे दिवे जरी विझले, तरी कधीही हा उमेदीचा प्रेरणेचा दिवा कधीही विझू देऊ नका. कारण आजची ही उमेद स्फूर्तीच आपले उद्याचे भविष्य, उज्ज्वल करणारी असते."

👌👌👌👍👌👌👌👌👌👌👌👌

"जपून ठेवा हा खजिना":

व.पु.काळेंची आयुष्य बदलून टाकणारे २५ मुद्द्यांवर अंतर्मुख करणारे विचारधनही असेच "सोमि"वर अवचितपणे वाचायला मिळाले. ते ह्या उमेदीचे लक्षलक्ष दीप प्रज्वलीत करणार्या खास लेखात अगदी अनुरुपच ठरावेत:


*१. गगनभरारीचं वेड*

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

*२. झुंज*

वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

*३. कॅलेंडर*

भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकाम टेकड्यांना कॅलेंडर वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.

*४. संघर्ष कुठपर्यंत?*

आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे...समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

*५. पडावं तर असं!*

आपत्ती पण अशी यावी कि इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा. पडायचंच असेल तर ठेच लागून पडून नये. चांगलं २००० फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहचला होता हे तरी जगाला कळेल.

*६. परिपूर्णता?*

जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही.

जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..

*७. नको असलेला भाग*

दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने निसर्गातील इतर गोष्टींकडे पहा. झाडे, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.

*८. पशू माणसांपेक्षा श्रेष्ठ*

पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात...बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?

*९. समस्या*

अनेक समस्या त्यावेळी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दुध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्यातरी क्षणी लाट अंगावर यावी त्या वेगाने वर काठापर्यंत येते. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेवून ते खाली उतरवावं. तसच काहीसं अनेक समस्यांचं असतं.

*१०. प्रोब्लेम्स कुणाला नसतात?*

प्रोब्लेम्स कुणाला नसतात? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतेच.ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसे. या तिन्ही गोष्टीं पालिकडचा प्रोब्लेम अस्थित्वात नसतो.

*११. समोरच्याच्या दुःखाचे समाधान*

समोरच्या दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं असेल, त्याला दिलासा द्यायची इच्छा असेल तर तो जे बोलतो त्यातलं सत्तर टक्के तुम्हाला ऐकू येता कामा नये. कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला पुष्कळदा त्याचा मूर्खपणाच कारणीभूत असतो. तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हाच सहानुभूती दाखवणं शक्य होतं. तो जे बोलतो ते जर सगळं ऐकू आलं त्यालाच एक झापड मारावीशी वाटते.

*१२. आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन'*

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा. यालाच आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन' असे म्हणतात.

*13 पळू नका*

प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी न कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहचत नाहीत. मुक्कामाला पोहचतात ते सरळ रस्तेच.

*१४. पाठीची खाज*

पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी , आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बऱ्याचदा होते..

*१५. माफी*

माफी मागितल्याने तुम्ही चुकीचे होता आणि समोरची व्यक्ती बरोबर, हे कधीही सिद्ध होत नाही. माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यातच जास्त आहे.

*१५. खर्च-हिशोब*

खर्च झाल्याचं दुःख नसतं. हिशोब लागला नाही कि त्रास होतो.

*१६. गैरसमज*

गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकार करतो.

१७. शस्त्रक्रिया. भीती-अभिमान*

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी प्रत्येक रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

*१८. अपेक्षा-ऐपत*

घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी पडते.

*१९. अपयशाची भीती*

माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच नाही मिळालं तर? याची त्याला भीती वाटते.

*२०. खरी शोकांकिका:*

बोलायला कोणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहचणं हि शोकांकिका जास्त भयाण.

*२१. कौतुकाची खुमारी*

कौतुकाला थोडी हेव्याची किनार असल्याशिवाय त्याला खरी खुमारी येत नाही.

*२२. झरा आणि डबकं*

वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!

*२२. कागद-सर्टिफिकेट*

सगळे कागद सारखेच! त्याला अहंकार चिकटला कि त्याचं सर्टिफिकेट होतं.

*२३. रातकिड्याचा आवाज*

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्यापेक्षाही जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही त्याचा होतो.

*२४.फुगा किती फुगवायचा?*

एखादा फुगा फुगवता फुगवता एका क्षणी फुटतो. तो फुटल्यावर समजतं, तो किती फुगवायला नको होता.

*२५ हरवण्यासारखं घडवा*

आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस 'माणूस' राहत नाही. परतून येतं ते चैतन्य!

अंतर्मुख करणारे हे सारे विचारधन.
वाचा व उपयोगात आणा.
धन्यवाद.

सुधाकर नातू माहीम, मुंबई16 

गुरुवार, १२ एप्रिल, २०१८

"नियतीचा संकेत': ग्रहाच्या महादशा:


"नियतीचा संकेत: ग्रहांच्या महादशा":                                                   सुधाकर नातू


"तुम्हीच, तुमच्या जीवनाचे शिल्पकार, हे खरे आहे कां?":

विशिष्ट काळात विशिष्ट निर्णय व क्रुती होते आणि त्यातून तुमचे भवितव्य घडते. ह्या सगळ्यामागे तुमच्या मनाची त्या त्या वेळी असलेली स्थिती जबाबदार असते. सातत्याने गतीमान असलेल्या सूर्यमालेतील ग्रहस्थितीनुसार ती तशी स्थिती प्रभवित होते कां, ह्यावर सुरवातीच्या प्रश्नाच्या उत्तराची सत्यासत्यता अवलंबून आहे.

एकाच दिवशी, एकाच वेळी , एकाच ठिकाणी जन्मलेल्या बाळाचे भागदेय सारखेच असते का? बहुतेक, हेच सत्य असावे:
मानसिक स्थितीनेच आपले भवितव्य अधिक घडते. दैवी शक्ती ही मनाला फक्त तथास्तु म्हणत असावी.

सर्वांना जीवनात सुख व दु:खाचे उन्हाळे वा पावसाळे अनुभवावेच लागतात. सदा सर्वकाळ कधीही कोणीही कायम सुखी वा दु:खी नसतो. आयुष्य हे खरोखर एक कोडे आहे, त्यातील चढ उतार प्रत्येकासाठी वेगवेगळ्या वेळचे आणि पूर्णतः भिन्न असतात. ज्योतिष ह्या कोड्याचा उलगडा प्रत्येकाच्या आयुष्यात जन्मवेळेनुसार असणार्या चंद्राच्या विशिष्ट राशीतील अंशात्मक स्थितीवरुन काढल्या जाणार्या ग्रह-महादशांच्या साखळीच्या सहाय्याने करते. हा आपला महादशांचा प्रवास आपली यशापयशाची अवस्था दाखवतो.                                   

महादशा:


जन्मवेळच्या चंद्र ज्या राशीत ज्या नक्षत्रात, जसा अंशात्मक स्थितीत असतो, त्यावरुन कोणत्या ग्रहाची महादशा कशी सुरू होणार ते पंचांगातील कोष्टकावरून गणित करून काढता येते. प्रथम राशी तसेच नक्षत्रसमुहावरून जीवनात प्रथम कोणत्या ग्रहांची महादशा येते त्याचे कोष्टक पाहू. प्रत्येक ग्रहाची विशिष्ट कालखंडाइतकीच महादशा असते.

#मेष-सिंह-धनु: सुरवातीची केतु महादशा
#व्रुषभ-कन्या-मकर: सुरवातीची रवि महादशा
#मिथून-तूळ-कुंभ: सुरवातीची मंगळ महादशा
#कर्क-व्रुश्चिक-मीन:सुरवातीची गुरू महादशा.
ह्या प्रत्येक राशीसमुहाला सारख्याच क्रमाने ग्रहांच्या महादशा येतात.

ग्रहांच्या महादशांचा क्रम व कालखंड असे:
१ केतु:७वर्षे २ शुक्र: २० वर्षे ३रवि: ६ वर्षे
४चंद्र:१० वर्षे ५मंगळ: ७ वर्षे ८राहू:२०वर्षे
९ गुरु:१६वर्षै १० शनी:१९वर्षे
११बुध: १७वर्षे

आता नक्षत्रसमुहावरुन कोणत्या ग्रहाची महादशा येते ते पाहू:
१ क्रुत्तिका-उत्तरा-उत्तराषाढा: रवि ६ वर्षे
२ रोहिणी-हस्त-श्रवण: चंद्र १० वर्षे
३ म्रुग-चित्रा-धनिष्ठा: मंगळ ७ वर्षे
४ आर्द्रा-स्वाती-शततारका: राहू १८ वर्षे
५ पुनर्वसु-विशाखा-पूर्वाभाद्रपदा: गुरु १६ वर्षे
६ पुष्य-अनुराधा-उत्तराभाद्रपदा: शनी १९ वर्षे
७ आश्लेषा-ज्येष्ठा-रेवती: १७ वर्षे बुध
८ मघा-मूळ-अश्विनी: केतु ७ वर्षे
९ पूर्वा-पूर्वाषाढा-भरणी: शुक्र २० वर्षे

आपण कोणत्या ग्रहाच्या महादशेपासून आपला जीवनारंभ करतो, ते आपल्या जन्मनक्षत्राप्रमाणे वरील माहितीनुसार समजेल. प्रत्येक नक्षत्र १३अंश व २० कला इतके असते. आपल्या जन्म चंद्राच्या अंशात्मक स्थितीवरुन आपल्या नक्षत्रात किती अंश व कला जन्मचंद्र आहे ते प्रथम काढावयाचे. त्याप्रमाणे जर, १३अंश २० कलांसाठी नक्षत्रासाठी जितकी वर्षे त्या ग्रहाची महादशा, तर ह्या जन्मचंद्राच्या अंश नक्षत्रांंसाठी अगोदरच किती वर्षे महादशेची संपली ते उमजू शकते. उरलेली वर्षे, महिने दिवस त्या ग्रहाची महादशा आपणास असेल. शिवाय काही पंचांगात चंद्राच्या अंशात्मक स्थितीनुसार कोणती महादशा किती असेल त्याचे सुलभ कोष्टकही पाहता येईल. वरील क्रमवारीप्रमाणे, त्या ग्रहाच्या पुढच्या ग्रहाची पूर्ण महादशा त्यानंतर येईल. त्यापुढे त्यापुढच्या ग्रहाची.. अशा पद्धतीनुसार आपली महादशांची साखळी काढता येते.

जीवनरेखा व महादशांची साखळी:                                                                                         जीवन हा जणु रेल्वेचा प्रवास आहे मुंबई ते दिल्ली आणि पूर्ण अंतर आहे वरील सर्व महादशांच्या कालखंडाच्या बेरजेचे, अर्थात १२० वर्षे. तुम्ही जन्मता कुठल्या महादशेत त्यावरून तुमचे ह्या प्रवासातील सुरवातीचे स्थानक कोणते, ते लक्षात येईल. कोण नाशिकला चंद्रमहादशेपासून, तर कोण जळगावला मंगळ महादशेपासून सुरवात करेल. म्हणूनच प्रत्येकाची महादशेची साखळी वेगळी व त्याप्रमाणे जीवनातील चढ उतार वेगळे. त्यांची तीव्रता तुमच्या पत्रिकेतील ग्रहमानाप्रमाणे बरी मध्यम वा चांगली असेल.


शुक्र बुध व गुरु ह्या ग्रहाच्या महादशा सर्वसाधारणपणे चांगली फळे देतात. तर रवि  चंद्र महादशा पत्रिकेतील शुभाशुभ स्थितीनुसार बरी वा वाईट फळे देतील. शनीची महादशा संमिश्र तर राहू केतुच्या महादशा कसोटी पहाणार्या असे ढोबळ अनुमान मांडता येईल. कुणाचे बालपण तर कुणाची प्रौढावस्था खडतर असेल, तर दुसर्या कुणाचे तारूण्य वा वार्धक्य सुखसमाधानाचे असू शकते ते त्या वयात येणार्या ग्रहाच्या महादशेनुसार. असे हे जीवनातील सुख वा दु:खाचे कोडे ग्रह महादशांच्या साखळीशी निगडीत आहे.

अंतर्दशा :

ग्रहाची महादशा जितक्या वर्षांची असते, तिचे परत सर्व ग्रहांच्या अंतर्दशा, त्याच प्रमाणात त्याच क्रमाने येतात. म्हणजे शुक्राची 20 वर्षे महादशा एकूण 120 वर्षांपैकी, म्हणून शुक्राच्या महादशेत प्रथम शुक्राची अंतर्दशा एकूण विस वर्षाच्या एक षष्ठांश म्हणजे 3वर्षे 4महिने, त्यापुढे रविची अंतर्दशा अशा प्रमाणे पुढे चंद्र, मंगळ... अंतर्दशा येतील. ह्या सर्वांची बेरीज विस वर्षै असेल. पुढे शुक्राच्या विस वर्षांच्या महादशेत सर्व ग्रहांच्या अंतर्दशा किती असतात, ते पंचांगातील कोष्टकावरून दिल्या आहेत:

शुक्राच्या 20 वर्षे महादशेत ग्रहांच्या अंतर्दशा-
ग्रह         अंतर्दशा
शुक्र   3वर्षे 4महिने
रवि     1वर्ष
चंद्र     1वर्ष 8महिने
मंगळ   1वर्ष 2महिने
राहू      3वर्षे
गुरू      2वर्षे 8महिने
शनी     3वर्षे 2महिने
बुध       2वर्षे 10महिने
केतु       1वर्ष 2महिने
एकुण   20 वर्षे.

सुक्ष्मदशा: व्यावहारिक उपयोग:

आता प्रत्येक ग्रहाची अंतर्दशा प्रत्येक ग्रहाच्या सुक्ष्मदशेत तशीच त्याच प्रमाणात, त्याच क्रमाने विभागली जाते. सुरुवात अर्थातच ज्याची अंतर्दशा असेल त्याच्या सुक्ष्मदशेपासून होईल. हल्ली कंम्पुटराईज्ड पत्रिका करून मिळतात. त्यात तुमच्या जीवनातील सुरवातीपासून अखेरपर्यंत येणाऱ्या महादशा अंतर्दशा सुक्ष्मदशा तारीखवार दिलेल्या असतात. त्यावरुन तुम्हाला वर्तमानात ह्या दशांची स्थिती कळेल. चालू व जवळच्या आगामी काळातील परिस्थितीचा बरा मध्यम चांगला असा अंदाज तुम्ही घेऊ शकता. त्याप्रमाणे आपल्या अपेक्षा व प्रयत्न ह्यांच्यात सुयोग्य समतोल साधणारे बदल नेहमी करू शकता.

ज्योतिष व महादशा ह्यांचा असा व्यावहारीक जीवन अधिक काबूत ठेवण्यासाठी उपयोग करू शकता. तसेच आपल्या कुटूंबियांच्या महादशा आदि समजून घेऊन त्यांनाही मार्गदर्शंन करू शकता. कठीण व उत्तम असे चक्र सातत्याने जीवनात कां चालू असते, त्याचा उलगडा ह्या महादशांवरील विवेचनावरून ध्यानात येईल अशी आशा आहे.

शुभम् भवतु
सुधाकर नातू माहीम मुंबई16
Mb 9820632655

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

डायरी'तील शायरी' १: गीता बोध:


  'डायरी'तील शायरी' १: गीता बोध:

प्रास्ताविक:


नुकतीच मला, कपाटाची आवरा आवर करताना, माझी ७ वर्षापूर्वीची डायरी सापडली. ती चाळली आणि मला वैविध्यपूर्ण माहिती, अनुभव, विचार आणि व्यक्तीविशेष उलगडणारा अनमोल खजिनाच गवसला. जवळ जवळ प्रत्येक दिवसाच्या प्रूष्ठावर न चुकता मी त्या विविध प्रकारच्या नोंदी केल्या होत्या. 'डायरीतील ह्या शायरी' चा प्रारंभ विनोबांनी गीतेवरील केलेल्या प्रवचनांवर आधारित 'गीताई' पुस्तकांतील गीतेच्या अठरा अध्यायांच्या संक्षिप्त सारांशाने मी करत आहे. हा ऐवज तुम्हाला उद्बोधक वाटेल, अशी आशा आहे.

गीता बोध:

अध्याय पहिला:
प्रत्येक माणूस वेगळा आहे, ज्याचा त्याचा पिंड भिन्न आहे. कुणी ना मोठा, ना छोटा, कुणी चांगला किंवा वाईट नसतो. ज्याचा त्याचा स्वभाव असेल, तो स्विकारुन, त्याबरहुकूम आप आपले कर्तव्य करत रहाणे हाच जीवनाचा हेतु होय. गीतेचा प्रमुख उद्देश स्वकर्तव्य विरोधी मोहाचा त्याग करणे हा आहे.

अध्याय दुसरा:
आत्मा अमर आहे, देह नाशवंत आहे. म्हणून त्याच्यात मर्यादेबाहेर गुंतुन जाऊ नका.निज स्वकीयांचा मोह टाळा. आपले कर्तव्य कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता, सातत्याने करत रहा. पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा करण्याचे व्रत, समोर साक्षात श्री विठ्ठल आलेला असूनही सोडले नाही. म्हणूनच तो पंढरीचा राया युगानुयुगे तेथेच विटेवर उभा आहे. स्थितप्रज्ञ बनण्याचा प्रयत्न करा. निर्विकार राहून आपली कर्तव्ये करत रहा.

अध्याय तिसरा:
येथे कर्मयोगाचे महत्व सांगितले आहे. "असेल हरी, तर देईल खाटल्यावरी" ही व्रुत्ती सोडून, कर्म हाच धर्म , हीच उपासना, हीच पूजा होय. नेहमी कार्यरत रहा, त्यायोगे शरीर व मन नेहमी शुद्ध राहील. आपण हाती घेतलेल्या काम सर्वोत्तम कसे होईल हाच ध्यास धरा.

चौथा अध्याय:
हाती घेतलेले काम मन लावून आवडीने अधिकाधिक चांगले करत रहाण्याची साधना म्हणजे विकर्म होय. कर्म आणि विकर्म एकरूप झाले की अकर्मरुपी आविष्कार घडतो. कितीही काम केले तरी ते न केल्यासारखे वाटते, अशी स्थिती, म्हणजे अकर्म होय. निष्काम कर्मयोगासाठी कर्म विकर्म आणि अकर्म अशी साखळी आवश्यक आहे. गुणवंत गायक वा खेळाडू आपल्या आत्मानंदात उत्तम गात वा खेळत रहातात. त्यांचे अनुकरण आपल्या कामात करत रहा.

पाचवा अध्याय:
साधन म्हणून बाह्यकर्म व आतून मनाचे विकर्म, ह्या दोघांचीही गरज आहे. मनाची निर्विकार अलिप्तता साधणे म्हणजे संन्यास तर क्रुती म्हणजे योग. कर्माचे अकर्म होणे हे ह्या साधनेचे अंतिम ध्येय होय.
जे जे सर्वोत्तम असेल, ते ते करत रहाण्याचा  हा संकल्प सिद्धीस जावो हा निदिध्यास ठेवा.

सहावा अध्याय:
जीवनाचा व्यवहार अधिकाधिक शुद्ध कसा करावा, हेच सांगण्यासाठी गीता आहे. चित्तव्रुत्तीवर काबू मिळवण्यास ती प्रव्रुत्त करते. चित्ताची एकाग्रता, जीवनाची परिमितता आणि समद्रुष्टी अशा तीन गोष्टींमुळे ध्यानयोग साधतो. जसजसे वय वाढेल, तसतसे मन अधिक परिपक्व सम्यक द्रुष्टि दाखविणारे व्हायला हवे.

अध्याय सात:
ईश्वराला शरण जा, असं हा अध्याय सांगतो. स्वकर्तव्य करून फळाची अपेक्षा न ठेवता, ते परमेश्वराला अर्पण करा. मनापासून ईश्वरभक्ती करा. कर्ममार्ग ध्यानमार्ग आणि भक्तिमार्ग असे त्रिविध मार्ग गीता दर्शविते.

आठवा अध्याय:
चांगल्या संस्कारांचे महत्व येथे मांडले आहे. जसजसा काळ जातो, तसतशा आपण अनेक गोष्टी विसरतो, निवडकच लक्षात ठेवतो. त्या चांगल्या सन्मार्गी असाव्यात, म्हणजे 'शेवटचा दिवस' गोड होईल. म्रुत्यु अटळ आहे, त्याचे भान ठेवून जीवन सत्कारणी लावा.

अध्याय नववा व बारावा : शेवटी दिलेली टीप पहा.

दहावा अध्याय:
विभूती चिंतनाकडे येथे मार्गदर्शन केलेले आहे. परमेश्वर, आई बाप आणि गुरू ह्यांच्या बरोबर सर्व प्राणीमात्रांत व सर्वत्र आहे, ह्याची जाण ठेवावी. त्या विश्वकर्म्याच्या ह्या जगड्व्याळ यंत्रणेपुढे नतमस्तक व्हावे. एवढेच काय पण दुर्जनातही ईश्वराचा अंश असतो.

अकरावा अध्याय:
ईथे विश्वरूप दर्शन घडविले आहे. आपली प्रुथ्वी म्हणजे अवकाशातील सूर्यमाला आकाशगंगा आदिंच्या महाप्रचंड आकारापुढे, वाळूच्या कणाएवढीही नाही. आपण तर म्हणूनच ह्या विश्वरूप अस्तित्वासमोर अणुमात्रही नाही. काळ हा अव्याहत कदापिही न थांबणारा आहे. हे असे विश्वाचे अन् काळाचे विराट रूप पचणारे नाही. पूर्वस्मरणाने विकार वाढतो. जग जसे आहे, तसेच ते मंगल आहे, हे माना. अध्याय सहा ते अकरापर्यंत, गीता आपणास एकाग्रतेकडून समग्रतेकडे नेते. हा अध्याय सगुण व निर्गुणाचे वैशिष्ट्य उभे करतो. सगुण हे सुलभ व सुरक्षित आहे, परंतु सगुणाला निर्गुणाचीही आवश्यकता आहे. भक्तिचा झरा जरी प्रथम सगुणातून निघाला, तरी तो शेवटी निर्गुणाकडे पोहोचतो. सहाजिकच 'सगुण,निर्गुण दोन्ही विलक्षण'! हेच खरे.

अध्याय तेरावा:
 देहासक्ती ठेवू नका, आत्मचिंतन करा, हे येथे ठसविले आहे. देहासक्तीमुळे जीवन अडगळीचे होते. देहापलिकडे, शाश्वत निरंतर व नश्वर असा आत्मा आपल्यात आहे, तो म्हणजेच मी असे जाणा. त्या अविनाशी आत्मतत्वासाठी हा देह मिळाला आहे, तो साध्य नसून एक साधन आहे. परमात्मशक्ती हीच अंतिम शक्ती आहे. नम्रता, निर्भरता व ज्ञानसाधना आत्मोन्नतीकरिता हव्यात.

अध्यात चौदावा:
आत्मा अविनाशी असून, त्याला बरोबर काहीही घेऊन जावयाचे नाही. देहाच्या सुखदु:खाशी आत्म्याचा काही संबंध नाही. तमोगुणाचा परिणाम म्हणजे आळस, त्यातून झोप वा प्रमाद. ह्या तिघांवरही विजय मिळवायला हवा. त्याकरिता अथक परिश्रम करायला हवेत. म्हातारपणीही कार्यरत रहा, तरूण रहाल. Use it, or lose it वा थांबला, तो संपला, हे ध्यानात ठेवा. रजोगुण उत्साहाचा, कामाचा अतिरेक करतो. उताविळपणे न झेपणार्या जबाबदार्या अंगावर घेतो. तमोगुण व रजोगुण परस्पर सहाय्यक होवून आयुष्याचा नाश करतात. सत्वगुण त्यातले त्यात उत्तम, पण त्याचाही अतिरेक अहंकार निर्माण करतो. व्रुथा अभिमान निर्माण करतो. अशा सत्वगुणाला निरंहकारी करावयाचे. कुठलाही अतिरेक नको, हेच ह्या अध्यायाचे सांगणे आहे. आत्मज्ञान व भक्तीचा आश्रय घ्यावा.

अध्याय पंधरावा:
भक्तीमार्ग म्हणजे प्रयत्नमार्गाहून निराळा नाही. भक्ती व आत्मज्ञान मिसळले की पूर्णता येते. गीता जीवनाचा अर्थ, ते कसे, कां आणि कुणासाठी जगावे हे सांगणारे तत्त्वज्ञान आहे. स्रुष्टितील विविधता अव्याहतता आणि नियमितता अवर्णनीय आहेत. प्रभाते करदर्शनम् सेवा कर असेच सांगत़ो.

अध्याय सोळावा:
येथे मनाच्या आतला व बाहेरचा ह्यामधील झगड्याचा उहापोह केला आहे. अहिंसा हिंसा, अपप्रवृत्ती व सद्प्रव्रुत्ती ह्यामध्ये नेहमी संघर्ष चालू असतो. एकीकडे दैवी तर दुसरीकडे आसुरी संपत्ती ह्या दोहोत आसुरी टाळून, दैवी संपत्ती घ्यावी. हिंसेवर विजय मिळवण्याचा मानवाचा प्रयत्न अजूनही अपयशी ठरला आहे. सत्ता, संस्कृती व संपत्ती, ह्या तीन महत्वाकांक्षा, आसुरी संपत्तीच्या असतात. सर्वांनी माझेच ऐकावे माझ्या प्रमाणे व्हावे माझे अंकित व्हावे असे वाटणे, आसुरी होय. थोडक्यात हम करे सो कायदा अशी मनोवृत्ती! काम, क्रोध व लोभ ह्यापासून मुक्ती हवी असेल, तर केवळ सत्य व संयमाची कास धरा. बेताने, धीराने वागा, असे हा अध्याय सांगतो.

अध्याय सतरावा:
साधकाने कसा कुठला जीवनक्रम अंगिकारावा, ह्याचे येथे मार्गदर्शन आहे. प्रथम निश्चित असे ध्येय हवे, योग्य ते कर्तव्य कष्टपूर्वक उत्तमपणे पार पाडावे. आपले कुटुंब आपला समाज, देश व विश्व ह्या सार्यांसाठी आपण काही देणे लागतो, त्याची जाण ठेवून त्या प्रमाणे ते देणे द्यायला हवे. दररोज एखादे तरी चांगले क्रुत्य आपल्याकडून व्हायला हवे. आहार व आचारशुद्धी, अविरोधी जीवनसाधना हवी. पोटाला पाहिजे ते, योग्य ते व तितकेच अन्न प्राशन करा. आपली सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करा.

अध्याय अठरावा:
येथे सर्व अध्यायांचा उपसंहार केलेला दिसतो. गीतेचा जणु सारांशच येथे मांडला आहे. कर्म करत रहा, मात्र कर्मफळाची अपेक्षा ठेवू नका. त्याग करणे, हीच सार्वभौम कसोटी आहे. ज्ञान, भक्ती व सेवा अहिंसा ह्यांचा अंगिकार करा. साधकाने आपला स्वधर्म कोणता, ह्याचा शोध घेवून निरपेक्षपणे स्वधर्माचरण करावे हाच जीवनमंत्र आहे. विठ्ठलाला युगानुयुगे, विटेवर उभा ठेवणार्या भक्त पुंडलिकाचा आदर्श कायम नजरेसमोर ठेवा.

उपसंहार:


आचार्य विनोबा भावे ह्यांनी अत्यंत सुलभ भाषेत ७ आँक्टोबर १९३० ते ६ फेब्रुवारी १९३१ ह्या कालखंडात गीतेवर प्रवचने दिली. त्यावर आधारित त्यांचे 'गीताई' हे गीता-बोध सर्वसामान्य जनतेला समजेल अशा भाषेतील पुस्तक योगायोगाने माझ्या वाचनात काही वर्षापूर्वी आले. ते मला जसे उमजले तशी मी माझ्या डायरीत नोंद केली. आज पुष्कळ वर्षांनी ती डायरी मला गवसली. माझ्या ब्लॉगवर हा गीता-बो़ध लिहीताना मला खूप आंतरिक समाधान मिळाले. एक नवल मात्र हे सारे इथे मांडताना अवचितपणे ध्यानात आले: कसा कोण जाणे अध्याय ९ व १२ ह्यांचा सारांश मला डायरीत कुठेच सापडला नाही. त्यामुळे तो येथे मला मांडता आलेला नाही. क्षमस्व. पण जे काही गीता-,बोधाम्रुत मला गवसले ते गोड मानून, आपण सारे आपली जीवनद्रुष्टि व जीवनशैली बदलून समाधानाने जगण्याचा प्रयत्न करू या. धन्यवाद

शुभम् भवतु
सुधाकर नातू माहीम मुंबई१६
Mb 9820632655