मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

'दोष हा, कुणाचा'?: 'EAR' एक सोपा 'मंत्र':



'दोष हा, कुणाचा'?: 'EAR' एक सोपा 'मंत्र':

जेव्हा, एखादा माणूस आपल्याला अपेक्षित असलेले निर्णय घेत नाही व क्रुती करत नाही, तेव्हा मनस्ताप होऊन ताणतणाव वाढतो. त्यामुळे आपल्या विचारांचे केंद्र, ती व्यक्ती आणि तिचे आपल्या द्रुष्टीने विपरीत असलेले वागणे हेच होऊन, आपण त्याच त्या विचारांच्या भोवर्यांत सापडतो. आपले ताणतणाव सहाजिकच असह्य होतील इतके वाढत जातात. परस्पर संबंधांतही कटूता येते. भांडण तंटे, वितुष्ट शत्रुत्व ह्या त्या नंतरच्या अनिष्ट गोष्टी असतात. अपेक्षा भिन्नता, स्वभावां प्रव्रुत्तींमधले फरक ह्या सार्याच्या मुळाशी असतात. व्यक्तिगत, व्यावसायिक जीवनांत हे असेच घडत असते, घडत रहाते आणि राहील. सामंजस्य, परस्पर सहकार ह्यांची नितांत गरज आहे, हेच खरे.

नुकतीच, मला घरातील टाँयलेटमधल्या सिलींगवरून होणाऱ्या पाण्याच्या गळतीची समस्या दूर करताना आणि फ्लॅटला दुसरे संरक्षक दाराचे काम करताना जे त्रासदायक अनुभव आले, त्याचा परिपाक म्हणजे वरील विचार होत. इथे  दुसर्याबद्दलची  बेपर्वाई ह्याला कारणीभूत होती.

इथे कामाचा दर्जा हे कारण तसे दुय्यम होते, वेळ न पाळणे, उपकरणांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणे ही त्रासदायक समस्या होती. वरच्या मजल्यावर रहाणारे सोसायटीचे सभासद, मुळांत त्यांच्या घरांतील बाथरूममध्ये दुरूस्ती करून द्यायलाच काही केल्या तयार नव्हते, कारण आमच्या पाणी गळतीशी त्यांना बहुधा, काही केल्या देणे घेणे नव्हते. अखेरीस मोठ्या मीनतवारीने ते तयार झाले, तर प्लंबर व त्याचा मदतनीस वर रहाणार्या कुटुंबाच्या सोयीच्या वेळी, अनेक वेळा, न आल्याने परत पाठवले जात होते. संरक्षक दरवाजा बनवतानाही असेच ठराविक वेळ न पाळण्याचे, बेपर्वाईचे अनुभव आले. अशा वेळी आपले काम नीट व्हावे म्हणून, आपल्याला मुग गिळून गप्प रहावेच लागते. अशाच तर्हेचे अनेक अनुभव आपला मनस्ताप वाढवत असतात, मतभेद व वाद भांडणांना निमंत्रण देत असतात.

कोणत्याही शिंप्याने, शिवायला दिलेले, कपडे कधी वेळेवर दिले आहेत का? तक्रार केल्यावर कोणताही मेकँनिक वेळ पाळतो कां? आपले आपल्या ग्राहकासंबंधीचे कर्तव्य काय ह्याची कसलीही जाणीव नसणे हे प्रमुख कारण होय. अशा व्यावसायिक बाबींबरोबरच संसारातही माणसे बरोबर वागतातच असे नाही. द्रुष्टिकोन  व स्वभाव अपेक्षा भीन्न हे कारण मात्र योग्य आहे.

ह्या संदर्भातले, माझ्या एका मित्राचे अनुभव त्याच्याच शब्दात असे आहेत-

'आमच्याकडे बेडचे सुताराचे काम होते. मी सोसायटीत येणाऱ्या सुताराला मला ते कसे करून पाहीजे ते समजावले. त्याने माझ्याशी वाद घातला व मोठ्या कामाची योजना मांडली. मी सहज त्याला म्हटले की माझ्याकडे अवजारे असती तर ते मीच केले असते. तो एकदम चिडला व मला जवळजवळ वेड्यातच काढले. मग मी पण आव्हान स्विकारले व ते काम त्याच्या समोर त्याच्याच अवजारांनी मला पाहीजे तसे १०/१५ मिनीटांत पुरे केले. तो मी देऊ केलेले पैसे न घेता काहीही न बोलता निघून गेला. याला काय म्हणावे? प्रव्रुत्तींमधला फरक हेच वादाचे मूळ होते, दुसरे काय?

घरातील सिलींग फॅन बंद पडल्यास मोटरचे वाईंडींग जळल्याचे निदान करून पैसे काढण्याचा प्रकार सर्रास घडतो. खरेतर बहुतेक वेळेला कॅपॅसिटर गेलेला असतो पण तो आपल्यासमोर बदलायला, बहुदा वायरमन तयार होत नाही. माझे तर यामुळे अशा कारागिरांशी वाद होतात.

गेल्या आठवड्यात आमच्या जागुआरचा  नळ वहायला लागला. पूर्वी अशाच कामासाठी आलेलाच प्लंबर आला. त्याने हा संपूर्ण नळ बदलण्याची घोषणा केली. मी त्याची गरज नाही म्हटल्यावर, त्याने अधिकार वाणीने सांगून टाकले की या कंपनीच्या नळाचे सुटे भाग मिळत नाहीत व ते त्या कंपनी कडूनच भारी किंमतीत मिळू शकतात व त्याला वेळ लागतो. त्याने आधीच्या अशाच प्रसंगी पण, संपूर्ण नळ बदलला होता. नळाची किंमत ₹१५००/- च्या आसपास. माझ्याकडे असलेल्या पान्याने तो नळ ऊघडत नव्हता. त्याच्याकडे असलेल्या पान्याने मी तो उघडून घेतला व आतले स्पिंडल काढले व एकटाच कोपऱ्यावरच्या दुकानातून ₹१००/- ला नविन स्पिंडल घेऊन आलो. नळ चालू झाला!'

ह्या उलट जेव्हा, एखादा माणूस आपल्याला अपेक्षित असलेले निर्णय घेतो  व क्रृती देखिल त्या अनुरूप करतो , तेव्हा मन:शांती मिळते,  ताणतणाव दूर होतो. त्यामुळे आपल्या विचारांचे केंद्र, ती व्यक्ती आणि तिचे आपल्या द्रुष्टीने योग्य असलेले वागणे हेच होऊन, आपण त्या विचारांच्या वलयात समाधानी होतो. शेवटी परस्पर संबंध, हे  दृष्टीकोनांशी एकमेकांकडून असलेल्या अपेक्षापूर्तींशी निगडीत असतात. हे समजण्यासाठी, माझा
'EAR'  हा एक सोपा मंत्र आहे:
'E  म्हणजे Expectations अर्थात अपेक्षा
 'A' म्हणजे Actions अर्थात क्रुती
'R'= Results अर्थात फलनिष्पत्ती
जर 'E'='R' तर समाधान मिळणार
जेव्हा  'E' is less than 'R' तर असमाधान
जर  'R' is much more than 'E' तर अत्युत्कृष्ट समाधान अर्थात Delight!

सुधाकर नातू, माहीम, मुंबई 16

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा