👍"मनांतल्या मनात !":👌
"अनुभव हाच माणसाचा सगळ्यात मोठा गुरू. बरा किंवा वाईट कसाही अनुभव असो,
त्यामधून माणूस नेहमी काही ना काहीतरी नवीन शिकत असतो. अर्थात प्रत्येक अनुभव हा कुठल्या ना कुठल्या तरी अवस्थेतील बदलाचे चिन्ह असते आणि बदल हाच निसर्गाचा स्थायीभाव असल्यामुळे, अशा तर्हेचे बदल ही आव्हाने असू शकतात. ती पेलण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे किंवा नाही हे अनुभव तुम्हाला सांगत असतो. असे अनुभव टिपत जावे, त्यामधून काय आपण शिकलो ते पहात जावे आणि त्यामधून अधिक संपन्न आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व तयार करायची प्रक्रिया चालू ठेवत रहावं.........
प्रत्येकाला कुठली ना कुठली तरी भीती वाटत असते. त्याला फोबिया म्हणतात. कुणाला विमान प्रवासाची तर कुणाला अंधाराची तर कुणाला कुत्रे मांजर अशा प्राण्यांची, तर बऱ्याच जणांना किंवा जणींना झुरळाची किंवा कुणाला पालीची भीती वाटत असते. भीती ही तुम्हाला त्या प्रकारच्या अनुभवापासून दूर राहावे असे सांगत असते. मला पाण्याची भीती आहे आणि प्रवासाचे मला वावडे आहे, या दोन गोष्टी माझ्या आयुष्यात कायम माझा पाठपुरावा करत आलेल्या आहेत.
यातील पाण्याची भीती ही मी लहानपणी दोन अडीच वर्षाचा असताना, कोकणात आजोबांनी विहिरीत दोरी धरून पाण्यात पोहणे शिकावं, म्हणून मला टाकलं, तेव्हा मी बुडत होतो नाका तोंडात पाणी जात होतं आणि आजोबा पट्टीचे पोहणारे असूनही भेदरले, हे काय होते हे बघून त्यांना काय करावे सुचेनासे झाले. पण माझे नशीब बलवत्तर, शेजारच्या मामाने ताबडतोब पाण्यात उडी घेऊन मला वाचवलं. पण ते क्षण जीवन-मरणाचे, माझ्या आयुष्यात आले त्यामुळे पाण्याची भीती मला कायमच वाटत राहिली.
जशी पाण्याची मला भीती आहे तसं एका शहरातून दुसर्या शहरात जाण्याचा प्रवास मला नकोसा वाटतो. हा प्रवासाचा फोबिया कदाचित मला पन्नाशी वा वाढत्या वयामध्ये अधिकाधिक प्रकर्षाने ध्यानात यायला लागला. कारण खरं म्हणजे मी सेल्स डिपार्टमेंटमध्ये, त्यामुळे दहा बारा तास बसप्रवास केलेला आहे. परंतु निवृत्त झाल्यानंतर घरातच बसून राहायची सवय लागल्यामुळे, मला प्रवासाबद्दल अधिकाधिक नकोसे वाटायला लागले. शहरातल्या शहरात मी आनंदात फिरतो. त्या उलट माझी बायको, तिला तर प्रवासाची एवढी आवड की, एकदा प्रवासाच ठरलं की तिची दप्तर किंवा बॅग पंधरा पंधरा दिवस आधी भरून तयार असते. माझ्या आईचं तर असं होतं की, विचारायलाच नको. कुठेही कशीही ती एकटी जात असे. आम्ही बाहेर गावी बदलीवर असताना तर पंधरा ते अठरा तासांचा ट्रेनचा प्रवास करून ती एकटी आली. स्टेशनवर मी आळसामुळे वेळेवर गेलो नाही, म्हणून आमचा पत्ता शोधत बरोबर आली होती !
प्रवासासाठी माणूसात धडाडी धीटाई आवश्यक असते. त्याचप्रमाणे बोलण्याची कला, माणसांची आवड असायला लागते. प्रवासाचा नाँशिया हा माझा अनुभव असला, तरी बायकोमुळे म्हणा किंवा इतर कुटुंबींयामुळे म्हणा, माझे भारतात आणि परदेशातही भरपूर प्रवास झाले. परंतु प्रवास सुरू करण्यापूर्वीचा माझा त्रासदायक अनुभव मात्र कायम तोच. मात्र एकदा का प्रत्यक्ष प्रवासाला प्रस्थान ठेवले की मग मात्र माझी भीती पळून जाते आणि मी प्रवासाचा आनंद इतरांबरोबर घेऊ लागतो. पण प्रवासपूर्व उमाळे उसासे वा प्रसंगी ओकार्या वा खाणे नकोसे होणे, हा अनुभव कायम राहिला. साधा मुंबई पुणा प्रवासाची आता आतापर्यंत हीच कथा असे.
इतक्या साऱ्या नमनाच्या घड्यानंतर, मी मूळ मुद्द्यावर येतो. कालचा आमचा पुणे-मुंबई प्रवास हा एक अत्यंत सुखद असा अनुभव होता. पुण्याच्या रखरखीत उन्हाच्या जाचक अनुभवामुळे माझ्या सौभाग्यवतीना मुंबईला जावेसे वाटले. लक्षात आले की एप्रिल मे आणि जून चा काही भाग शक्यतोवर पुणेवारी टाळायलाच हवी. गेली चार-पाच वर्षे आम्ही दर दोन अडीच महिन्यानंतर बदल म्हणून पुण्याला, मुलाच्या एका चांगल्या प्रशस्त घरी, सर्व सुखसोयींनी युक्त अशा गृहसंकुलात राहायला जातो. हवापालट तर होतोच व आमच्या जीवनात काही ना काही तरी चांगला बदल होत आला आहे. मात्र आतापर्यंत एप्रिलमध्ये आम्ही कधीच पुण्याला आलो नव्हतो. रणरणत्या उन्हाळ्यात 40 डिग्री टेंपरेचरमुळे शक्यतोवर सकाळी दहा ते संध्याकाळी पाच बाहेर जाणे शक्य नसे. तसेच पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीची बिकटअवस्था पाहता, बाहेरचे प्रवासही मर्यादित होत असत.
त्यामुळे आमच्या सौला कमालीचा कंटाळा आला आणि काही करून मुंबईला आत्ताच जाऊच या, असा तिने हट्ट धरला. दुपारची वेळ होती जेवण वगैरे झाले होते. आता मुंबईला जायचे तर नेहमीप्रमाणे प्रायव्हेट टॅक्सी बुक करून जावं, तर ते सुरक्षित वाटलं नाही, कारण 'आम्ही वयस्कर दोघेच व ड्रायव्हर कसा मिळेल काय माहिती आणि प्रवासामध्ये कुठेही काही झाले तर काय?' या विचाराने टँक्सीचा विचार सोडून द्यायला लागला. परंतु अडचण अशी की, नेहमीप्रमाणे सौने भरपूर सामान परत नेण्यासाठी सुद्धा घेतले असल्यामुळे, वनाज स्टाँपवर बस पकडून जायचं म्हणजे देखील एक कठीण प्रसंग होता. पण करता काय, स्त्री हट्टापुढे ! त्यामुळे शेवटी रिक्षाने वनाजला जायचे व तिथे वातानुकूलित शिवनेरी बस मिळेल मुंबईसाठी. तिने जायचे असे आम्ही ठरवले. आमचा ठरलेला रिक्षावाला अगदी घरापर्यंत आला आणि त्यांन स्वतः नेताना व पोचल्यावर सामानाचे बोजे चढवणे उतरवणे ही मदत करून आमच्यावर उपकार केले.
एसटीच्या वनाज स्टॉपवर प्रतिक्षा करताना, वातानुकूलित बोरीवली, ठाणे, कल्याण अशाच बस आल्या, दादरवाली शिवनेरी काही केल्या येईना. सहाजिकच 'तिथे जवळपास उभ्या असलेल्या टॅक्सीतून आपण मुंबईस जाऊ या' असा स्त्रीहट्ट सौचा सुरु झाला. पण नशीब माझं, तेवढ्यात एक लालपरी अर्थात लाल डब्याची गाडी आली. आपण 'तिने जाऊया कां शिवनेरीला वेळ लागेल असं मी म्हटल्या बरोबर सौने ताबडतोब जाऊया म्हंटलं ! आमचं ते अवजड सामान बसमध्ये नीट ठेवायला तिथल्याच कुठल्यातरी तरुण अनोळखी माणसाने आणि कंडक्टरने मदत केली, हा आम्हाला हा एक सुखद धक्का होता.
एकदाचे बसमध्ये चढलो त्यामुळे सुटकेचा निश्वास टाकला. खूप खूप दिवसांनी लालपरी अर्थात लाल डब्याच्या सर्वसाधारण STमध्ये बसायची वेळ आली होती. मला आठवला एक योगायोग. गंमत अशी की, अगदी अशाच लाल डब्याच्या गाडीने, जी महाबळेश्वर ते मुंबई अशी होती, पन्नास वर्षापूर्वी विवाहानंतर हनीमून संपल्यावर, मुंबईकडे प्रस्थान ठेवले होते. 50 वर्षातही लालपरीची गंमत तशीच आहे, हा अनुभव प्रवास सुरू झाला तसा येऊ लागला. ड्रायव्हर अतिशय निष्णात होता, गाडी वेगाने चालवत होता, मात्र पूर्ण नियंत्रण त्याचे बसवर होते आणि पाहता पाहता लोणावळा गेले, घाट गेला आणि एका फुड माँलवर आमची गाडी विसावली. तिथे गरम गरम चहाचे घुटके घेऊन, बसमध्ये बसलो. आम्हाला लक्षात आले की आमची गाडी इतक्या वेगाने आली होती की, पाठीमागून कुठलीच शिवनेरी आम्हाला क्रॉस झाली नव्हती ! दोघांचे मिळून तिकीट केवळ रु ४७०/- हा आणखी एका सुखद धक्का होता, कारण शिवनेरी पुणे ते मुंबई प्रवाशाला तिकीट रु ५४०/-! .
टॅक्सीमध्ये बंदिस्त अशा जागेत दोनच माणसांनी बसून जाण्यापेक्षा, बसमधला अनुभव किती जीवंत आणि चांगला असतो हे आम्हाला कळू लागले. कारण कित्येक वर्षांत आम्ही अशा साध्या लाल डब्याच्या गाडीत बसलोच नव्हतो. नेहमी टॅक्सी किंवा वातानुकूलित बस व विमान प्रवास असाच अनुभव आतापर्यंत गेल्या दोन दशकांत घेतला होता. ट्रेनमध्ये कधीमधी 2 वा 3 वर्षानंतर बसायची वेळ निवृत्तीनंतर आली. बाकी प्रवास हा खानदानी first grade वाला ! याउलट हा निम्नस्तरातील प्रवासी वर्गाबरोबरचा 'लालपरी'मधला प्रवास हा एक आगळावेगळा अनुभव होता. आम्हाला लक्षात आलं की ही माणसं एकमेकांना खूप मदत करणारी असतात, आम्हाला प्रवासात त्याप्रमाणे खूप मदत झाली. सायन मच्छीमार्केट जवळ बस आवर्जून कंडक्टरने थांबवली, आमचे सारे सामान स्वतः खाली उतरण्यासाठी त्याने मदत केली. आम्हाला लक्षात आले की माणुसकी अजून खरच जीवंत आहे. आम्ही त्यानंतर काळ्यापिवळ्या टॅक्सीने माहीमला सुखरूप पोचलो. त्या अनोळखी तरूणाचे व कंडक्टरचे मी मनापासून आभार मानतो.
खरोखर न विसरण्याजोगा असा हा अनुभव होता. माणसं माणसाला किती मदत करतात आणि कदाचित परमेश्वरच आम्हाला आमच्या इच्छेनुसार मुंबईला सुखरूप पोचवायला उद्युक्त असावा म्हणून त्या रणरणत्या उन्हातून आमचा हा लालपरीचा प्रवास म्हणजे जणू विमानाचा वेगवान प्रवास असेच वाटले. कारण अक्षरशः तीन सव्वातीन तासात आम्ही पुण्याहून सायनला आलो होतो. ज्या कोणी एसटी बसला 'लालपरी' असे नाव दिले आहे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. जी आम्ही टाळून वातानुकूलित बस आपलीशी करायचो, लाल डब्याच्या गाडीला नाके मुरडायचो, तिने आमचे काल डोळे उघडले.
गंमत अशी की, ह्याच पुणे दौर्यात सौचा
श्रीअंबाबाईदेवीचा नवस फेडण्यासाठी, आम्ही पुण्याहून कोल्हापूरला टॅक्सीने गेलो आणि येताना मात्र कर्मधर्मसंयोगाने एशियाड मधून- टू बाय टू बसने परत आलो, तो प्रवासही असाच आल्हाददायक आणि माणसं माणसाला कशी चांगली वागवतात, कंडक्टर कसे प्रवाशांबद्दल आपुलकी बाळगणारे असतात, त्याचा अनुभव देणारा होता. त्या प्रवासातही फक्त एकच थांबा आणि तिथे आम्हाला गरम-गरम डाळखिचडी चे भोजनही मिळाले. हे दोन बसप्रवास आम्ही खरोखर कधीच विसरणार नाही.
जाता जाता आठवलेली एक जुनी गोष्ट सांगायला हवी. बेस्ट बसचा प्रवास हा मला नेहमी जाणवून द्यायचा की, तुमचे पाय जमिनीवर ठेवायला हवेत. कारण कारमध्ये तुम्ही बसला की, इतर माणसांचा संपर्क नाही, जगाची खरीखुरी जाण नाही. त्याउलट बसमध्ये आपल्याहून कदाचित निम्नस्तराची माणसं सहवासात येतात. आपल्या सुखासीन जीवनाचा काही काळ का होईना विसर पडतो आणि आपण भानावर येतो. आपले पाय जमिनीवरच राहू शकतात.
शेवटी तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे, कुठल्या नजरेने बघता, त्यावर तुमचे सुखदुःख ठरत असते !
धन्यवाद
सुधाकर नातू