सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

"प्रेरणादायी दिशादर्शक 'आनंदी गोपाळ'



  •  "प्रेरणादायी दिशादर्शक 'आनंदी गोपाळ'":


काल "आनंदी गोपाळ" हा चित्रपट बघितला. पाल्हाळ न लावता, पहिलाच मुद्दा सांगतो की, हा चित्रपट इतका सर्वांगसुंदर आहे की, तो भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात यावा.

"त्या" वेळची माणसं, आणि "त्या" वेळचे वातावरण, तसेच कर्मठ समाजाची परंपरागत मनोधारणा, अशा माहोलात गोपाळराव जोशींसारख्या एका विक्षिप्त म्हणवल्या जाणाऱ्या माणसाने, स्त्रियांच्या परावलंबित्वातून निर्माण झालेल्या अगतिकतेवर उपाय म्हणून, आपल्या बायकोला काहीही करून सुशिक्षित करावयाचे हा घेतलेला अट्टाहास, पाहिलेले ते स्वप्न, हा खरोखर जगावेगळा वेडेपणा होता. कारणपरत्वे आपले मूल योग्य तर्हेची लक्षणांची जाणीव, व सत्वर उपाय न मिळाल्यामुळे व डॉक्टर वेळेवर न मिळाल्यामुळे मरण पावले, या विषण्ण करणार्या जाणिवांतून आनंदीबाईंच्या मनात तर, भावी समाजाच्या भल्यासाठी, डॉक्टर होण्याचे स्फुल्लिंग निर्माण होते हीच बाब अतुलनीय! त्या आदर्शवत् ध्येयाचा पाठपुरावा, हे अद्वितीय जोडपे, अनेक अडचणी संकटे येऊनही कसे पूर्ण करते, त्याचे ह्रदयंगम चित्रण हा बोलपट प्रभावीपणे करतो.

अशा जीवघेण्या कसोटी पहाणार्या धडपडीमुळेच, आनंदीबाई जोशी, ह्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आणि तेही केवळ २२ वर्षांच्या अल्पायुष्यात, एखादी ग्रीक ट्रँजेडी शोभावी अशा दुर्देवी तर्हेने. चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारा असला, तरी आजपर्यंत, ज्या ज्या स्रीयांनी विविध क्षेत्रांत, असे चाकोरीबाहेरचे 'पहिल्यात पहिले', असे योगदान दिले, त्या सार्यांची मांदियाळी रूपेरी पडद्यावर झळकते व ती पहात पहात सारे प्रेक्षक ताठ मानेने व भारावून जावून चित्रपटग्रहाबाहेर पडतात.
हा चित्रपट खरोखर उत्तम अभिनय योग्य असे संवाद आणि कार्यकारणभाव पटेल, परिणाम आणि कृती यांचा मेळ घालता येईल असे प्रसंग, त्याचबरोबर योग्य त्या पार्श्वभूमीचे चित्रण, त्या जोडीला अनुरूप असे संगीत ह्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. प्रमुख योगदान अर्थातच नायक ललित प्रभाकर आणि नायिकेच्या रूपात भाग्यश्री मिनिंग यांनी दिले आहे. प्रथम पत्नीच्या सासुबाई झालेल्या श्रीमती कुलकर्णींचेही खरोखर वैशिष्ट्यपूर्ण असे काम झाले आहे. एकूणच सर्वच पात्रे आपाआपली व्यक्तिरेखा चपखलपणे सादर करत असल्यामुळे, हा चित्रपट एक चविष्ट असा हवाहवासा मसाला बनलेला आहे. हे सारे घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून, श्री. समीर विद्वांस ह्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
उत्क्रांती हा सर्व सजीवांचा मूलभूत असा आविष्कार आहे, नव्हे त्यांची ती गरज आहे. सहाजिकच हजारो वर्षे स्त्रियांना जाणीवपूर्वक शिक्षणापासून दूर ठेवल्यामुळे, त्यांच्यावर जी परावलंबित्वाची, एक प्रकारच्या गुलामीची वेळ आली होती, ती द्रष्ट्या अशा अनेक समाजसेवकांच्या कामगिरीमुळे दूर झाली. त्यामध्ये गोपाळराव जोशी या माणसाचा सिंहाचा वाटा होता हे आपल्याला मान्य करावेच लागेल.
आज आपल्या भोवती स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर काम करताना दिसतात. त्याचे मूळ गेल्या शतका दीडशतकातील क्रांतिकारक अशा समाजसुधारणांत आहे.

हा चित्रपट बघितल्यामुळे प्रत्येकच व्यक्तीला, विशेषतः स्त्रियांना वाटेल की आज माझी जी परिस्थिती आहे, ती मी काही करून अधिक उत्तम बनविण्यासाठी कष्ट घेईन; तसेच पुरुषही स्वतःची प्रगती करता करता, आपल्या कुटुंबातील समस्त स्त्रीवर्गालाही, योग्य ते प्रोत्साहन देऊन त्यांच्या गुणांना योग्य तो मार्ग दाखवत प्रगतीसाठी साधू शकतील. अशा तऱ्हेची प्रेरणा देणारा चित्रपट खरोखर दुर्मिळच! म्हणूनच सुमार चरित्रपटांच्या भाऊगर्दीत "आनंदी गोपाळ" हा चित्रपट एखाद्या कोहिनूर हीर्यासारखा मुकूटमणी म्हणून शोभतो.

धंदा कला आणि विचार अशा त्रिवेणी संगमातून निर्माण केली जाणारी करमणुकीची कलाकृती ही नेहमीच असामान्य मानली जाते. त्या तुलनेत "आनंदी गोपाळ" चित्रपटाने ह्या गुणत्रिवेणीचा यथोचित समतोल साधून, वेगळी दिशा दाखवण्याचे महत्कार्य केले आहे. म्हणूनच पुन्हा सांगतो की, हा चित्रपट ऑस्कर मिळविण्याच्या लायकीचा आहे. प्रत्येकाने तो बघावाच अशी माझी कळकळीची सुचना आहे.
सुधाकर नातू.

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

“मौज" दिवाळी अंक'१८: रसास्वाद:



“मौज" दिवाळी अंक'१८: रसास्वाद:

मराठी साहित्यात दिवाळी अंकांची खूपच कौतुकास्पद अशी परंपरा वर्षानुवर्षे चोखंदळ रसिक वाचकांची बौद्धिक भूक भागवत आलेली आहे. त्यामध्ये जे काही मोजकेच अंक विचारांना चालना देणारे आणि इतरांपेक्षा संपूर्ण वेगळी वाट चोखाळणारा आहेत, त्यांत "मौज" दिवाळी अंकाची अग्रक्रमाने नोंद केली पाहिजे

ते सहाजिकच आहे, कारण ज्या प्रकाशन संस्थेने "सत्यकथा" सारखे अभिजात नियतकालिक साहित्य रसिकांना दिले आणि त्याद्वारे एकाहून एक असे सरस सरस्वतीपूजक मराठी साहित्यविश्वात आणले, त्यांचे हे मासिक असल्यामुळे ते अपरिहार्य असणे स्वाभाविकच नव्हे कां?

ह्या वेळचा "मौज" दिवाळी अंक खरोखर विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक वेगळे काहीतरी देणारा आहे. त्यातील विविध लेख, कविता, कथा पाहिल्या, तर आपल्याला लक्षात येईल एखाद्या शोभादर्शकासारखे अनेकांगी चित्र आपल्या समोर उभी राहते. इथे खास प्राधान्याने नमूद करायला हवे, ते दोन प्रमुख गोष्टींना: पहिलं म्हणजे श्री.मधु लिमये माननीय श्री. अटल बिहारी वाजपेयी आणि श्रीनिवास कुलकर्णी यांची व्यक्तिचित्रे, दुसरं म्हणजे "विज्ञानाचे वारकरी" हा एरवी दुर्लक्षित असलेला संशोधक विश्वाचा ऊहापोह करणारा दिग्गजांचा परिसंवाद!

व्यक्तिचित्रे,:
“संसदीय बंडखोर" या शीर्षका द्वारे श्री. मधु लिमये यांचे जीवन चित्र सन्माननीय निवृत्त न्यायाधीश श्री. नरेंद्र चपळगावकर यांनी त्यांच्या सहजसुंदर भाषेत उभे केले आहे. मधुजींसारखा हुशार आणि तडफदार माणूस जर विरोधी पक्षात नसता सत्ताधाऱ्यांच्या बाजूला असता, तर काय झाले असते असे वाटून जाते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या अनेक माणसांची अशीच शब्दचित्रे "हरवलेले स्नेहबंध" ह्या श्री. चपळगांवकर लिखीत पुस्तकात मी नुकतीच वाचली होती, ती आठवण मला झाली
भारत रत्न श्री. अटल बिहारी वाजपेयी ह्यांचे बरेचसे अज्ञात असे अनेक पदर उलगडून दाखवणारे हे व्यक्तिचित्र,श्री. विनय सहस्रबुद्धे यांनी फारच सहजसुंदर भाषेत मांडले आहे. एका महान नेत्याची ही साधी भोळी सुंदर कहाणी खरोखर मनाला भावून जाते. अनेक माहित असलेल्या गोष्टींमधून त्यांचे व्यक्तिमत्व आपल्यासमोर उलगडते.

"आण्णा आणि मी" हे आपल्या वडिलांचे-श्रीनिवास कुलकर्णी ह्यांचे सहजसुंदर व्यक्तिचित्र आलोक यांनी लिहिले आहे. ते एका मुलाच्या नजरेतून सरस्वतीपूजक अशा वडिलांचं खरोखर ह्रद्य चित्र आहे. ह्या माणसाने किती माणसे भोवताली गोळा केली आणि मौज प्रकाशनातर्फे साहित्याची किती सेवा केली याचे एक स्पष्ट चित्र त्यातून उभे राहते.
विज्ञानाचे वारकरी"
"विज्ञानाचे वारकरी" हा एक दुर्लक्षिलेल्या अन मोडवर बंद बुद्धिवंतांना हवाहवासा असा वाटणाऱ्या विषयाचा मागोवा त्या क्षेत्रातील दिग्गजांच्या आत्मकथनातून प्रभावीपणे मांडण्याचा डॉ. बाळ फोंडके यांनी प्रयत्न केला आहे

डॉ. जयंत नारळीकर यांनी त्यांना आवडणाऱ्या त्यांना आवडणाऱ्या गणित पदार्थविज्ञान संस्कृत अशा विषयातून अखेरीस गणिताची निवड कशी झाली ते एखादे प्रमेय लीलया सोडत जावे तसे पायरीपायरीने आपल्या लेखात मांडले आहे. सगळ्या गोष्टी जणू आपल्यासमोर घडत जातात असे वाचण्याजोगे, हे त्यांचे आत्मकथन आहे. योगायोगाने वडिलांनाही गणित विषय आवडत होता, म्हणजे सोने पे सुहागा! त्याशिवाय ऑक्सफर्ड केंब्रिज विद्यापीठाच्या रोमहर्षक इतिहासाने आपण अचंबित होतो. थाँप्मस़न पार्कीन्सन ह्यांचा परिक्षेतील अव्वल नंबराचा योगायोग तर चित्तथरारक आहे.

इस्रो आणि अंतराळ विज्ञानातील भारताची ललामभूत कहाणी आणि त्याचा एक शिल्पकार त्याचे योगदान असे श्री. सुरेश नाईक ह्यांच्या लेखाचे स्वरूप आहे

"
मी विज्ञानाचा वाटसरु" हे सोलापूर मध्ये लहानाचे मोठे झालेल्या आणि पुढे अणूशक्ती मंडळात यशस्वी कार्यकर्तृत्व करणाऱ्या संशोधक डॉक्टर बाळ फोंडके यांचे हे आत्मनिवेदन आहे. संशोधनातील सर्वसामान्यांना अनभिज्ञ असणाऱ्या विषयांमधील कौतुकास्पद वाटचाल करणाऱ्या ह्या माणसाचे सहाजिकच कौतुक वाटते.

डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे नाव सर्वश्रुत आहे त्यांचं विज्ञानाकडे आणि संशोधनाकडे वळण्याचे जे काही मर्म त्याचा येथे खुलासा करण्यात आला आहे नुसतेच संशोधन करून भागणार नाही आणि त्यामधल्या नेतृत्वाचा प्रवास हा देखील कसा महत्त्वाचा असतो हे त्यांच्या आत्मनिवेदनातून समजते गरिबीतून अंगभूत हुशारीच्या जोरावर पर्मिष कष्ट देवा यांच्या मुळे गगनभरारी मांडणाऱ्या या शास्त्रज्ञांचे योगदान खरोखर अद्भुत असेच आहे हळदी संबंधी पेटंट मिळविण्याची त्यांची धडपड तर सर्वश्रुतच आहे सारख्या अग्रगण्य संस्थेचे प्रमुख या नात्याने त्यांनी केलेले काम खरोखर अत्यंत लाभदायी उपयुक्त असेच आहे.

खरोखर अनुसरण करता येईल, प्रयत्नांना नवी दिशा देणारे, असे काम करणाऱ्या डॉक्टर अनिल काकोडकर ह्यांचे कर्तृत्व खरोखर आश्चर्यकारक आणि स्फूर्तीदायी आहे. अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की, मध्य प्रदेशातील खरगोण सारख्या एका खेड्यातून आलेल्या बुद्धिमान माणसाचे अंगभूत गुण कामगिरी ह्या जोरावर चक्क अणुशक्ती मंडळाचे अध्यक्ष होण्या इतकी गरुडभरारी पाहून खरोखर कौतुक वाटतं. त्यांनी अणुभट्टींसंबंधी केलेल्या कामगिरीचे मोल, निश्चित अमोल आहे.

"
विज्ञानाची कास" डी.बालसुब्रमण्यम ह्यांचा आपण वैज्ञानिक कसे झालो हे सांगणारा लेख आहे. मदुराई जवळच्या शोलावंदन सारख्या छोट्याशा गावात लहानाचा मोठा झालेल्या आणि पुढे कीर्तिमान संशोधक बनलेल्या बुद्धिमान माणसाचे एकंदर कार्यकर्तृत्व डोळे विस्फारीत करणारे आहे.

"रसास्वाद-"मलेना" चित्रपटाचा":
"
शापित सौंदर्याची समरसंगिनी, मलेना" हा नंदू मुलमुले यांनी "मलेना" या चित्रपटाचा एक हृदयस्पर्शी असा आढावा घेतला आहे. ही दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील विदारक वास्तव रंगविणारे अव्यक्त प्रेमाची चित्तथरारक कहाणी आहे. सुस्वरूप स्त्रीकडे पुरुषांच्या वासनांध नजरा तिचा कसा र्हास करतात, ह्याची चिरफाड या लेखात अक्षरश: हृदय पिळवटून टाकेल, अशा पद्धतीने मांडली आहे.

"मुंबई नगरी बडी बांका":
"
मुंबई नगरी बडी बांका" हा अश्विन पुंडलिक यांचा लेख मुद्दामून याकरता वाचावासा वाटला, कारण मी एक नखशिखांत मुंबईकर आहे. त्यामुळे मुंबईची काय काय माहिती मिळेल ह्या उत्सुकतेने हा लेख वाचला. ह्या भारताची आर्थिक राजधानी असलेल्या महानगराची खरोखर उभी-आडवी सद्यस्थिती तसेच पुरातन इतिहास उलगणारी संशोवनात्मक कहाणी अभ्यासपूर्ण रीतीने मांडली आहे. ह्या शहराला हजारो वर्षांचा इतिहास आहे याचे वास्तव या लेखातून उभे केले आहे. त्याकरता लेखकाने खूप अभ्यास कष्ट केल्याचे स्पष्ट जाणवते.

"करीसा ना कित्साव":
"करीसा ना कित्साव" असे काहीसे धेडगुजरी नांव असलेली श्री.श्रीरंग भागवत यांची कथा, त्या नांवामुळे वाचवी कां, असा प्रश्न मनात येतो. एका अभागी स्त्रीच्या दुर्दैवाची ही कहाणी इतक्या विस्ताराने मांडायची काय गरज होती, हा प्रश्न निर्माण होतो. कारण जे काही सांगायच आहे, त्याचा आवाका बघता, ही कथा खूपच लांबण लावलेली आहे. स्रीकडे एक भोग्य वस्तू म्हणून फक्त बघितले जाते तिचा जीवन प्रवास त्यामुळे कसा क्लेशकारक होऊ शकतो, त्याचे भेसूर वास्तव येथे आहे

"फ्लेमिंगो"     
"फ्लेमिंगो" ही मोनिका गजेंद्रगडकर ह्यांची कथा आहे. "ब्रेन ड्रेन"ची शिकार झालेले एक वृद्ध दांपत्य आणि त्यांची अपरिहार्य एकटेपणांतील अगतिकता ह्या कथेतून समोर येते. एकुलता एक परदेशस्थ मुलगा अकाली दगावलेला नातू असूनही तो दूर आणि जेव्हा केव्हा तो इकडे भेटायला येतो, तेव्हा जे काही भावनांचे वादळ उठते, मनामध्ये जे काही भावनांचे कल्लोळ निर्माण होतात कुमारवयीन नातवाचे भावविश्व उलगडत, डोळ्यात पाणी आणणारी अशी ही कहाणी आहे. अशा तऱ्हेचे वास्तव खरोखर घरोघरी किंवा दारोदारी आता पाहायला मिळते आहे, हे चांगले की वाईट असा प्रश्न मनात येऊन जातो.

"सदेह वैकुंठाला ":
सदेह वैकुंठाला विलास केळकर या शीर्षकावरून गैरसमज होतो आणि आपल्याला वाटतं ते तसं नसतं गोष्टीमध्ये आणि गोष्टी पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे त्याचे मर्म कथेद्वारे सांगण्यात आलेले आहे आणि तो जो काही अनुभव मार्मिकपणे मांडला आहे तो मन विषण्ण करणारा आहे प्रगती विकास हा कसा होतो आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय होते आहे याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे.

"एक दीर्घकथा":
"एक अनाथ एक डिटेक्टिव आणि काही प्रेमभंग": ही दीर्घकथा ऋषिकेश गुप्ते यांची आहे. पौगंडावस्थेतील नर-मादीच्या परस्पर आकर्षणाचे वास्तववादी उत्तेजित करणारे वर्णन वाचून, आपण गोष्ट वाचायला घेतो, परंतु ती कथा कशीही वहावत जाते आणि अखेरीस उत्कंठावर्धक रहस्य निर्माण करत संपूनही जाते. मात्र एवढे सगळे भारुड लिहिण्यापेक्षा संक्षिप्त अशा रूपात हे सगळं जर सांगितलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतं.

“माणसांनी हरवलेली माया":
श्री. मिलिंद बोकील ह्यांच्या "माणसांनी हरवलेली माया" ह्या लेखाच्या शीर्षकावरून आपला वेगळाच समज होतो, तो दूर करणार्या मायावी संस्कृतीचे ह्या लेखामध्ये अंतर्बाह्य चित्र तर्कनिष्ठ विश्लेषण केलेले आहे कदाचित सिंधुसंस्कृती पेक्षा खूप जुन्या असणाऱ्या या संस्कृतीची वैशिष्ट्ये खरोखर विचार करायला लावणारी आहेत एक अभ्यासपूर्ण लेख असे या सामुग्रीचे वर्णन करता येईल.

श्री. प्रभाकर बरवे यांचे चित्रमय व्यक्तिचित्र श्री. प्रभाकर कोलते यांनी मांडले आहे. हा कर्तृत्ववान चित्रकार अनेक कलावंतांचे स्फूर्तिस्थान कसा होता आणि त्यांची चित्रे देखील माणसांना वेगळी अनुभूती कशी देतात, त्याचे मर्म ह्या. लेखातून चांगल्या प्रकारे प्रकटते.
मनीषा टिकेकर ह्यांनी तर आपल्याला संपूर्ण अज्ञात असलेला, कधीही ऐकलेल्या वा पाहिलेल्या, अशा एका देशाची-'लुआंग प्रवांग'ची चित्तरकथा मांडली आहे. खरोखर पृथ्वी गोल आहे आणि तिथे कुठेतर आपल्याला परिचित असणारे, असे आपल्यासारखेच आपली परंपरा बाळगणारे असे जनप्रवाह दडलेले असतात, हे जाणून खरोखर मन स्तंभित होते.
कुणाच्या मनांतही कधी येणार नाही, असं आगळं वेगळच "हातगाडीचं आख्यान", वीणा मगदूम ह्यांनी आपल्यापुढे मांडले आहे. तळागाळातल्या आणि हातापायावर पोट असणाऱ्या वर्गाची आणि त्यांचे खरोखर अत्यंत महत्त्वाचे साधन असलेल्या हात गाडीची ही 'नाही रे' वाल्यांची ही कहाणी अंतर्मुख करणारी आणि वास्तवाचे भान आणणारी आहे.
गोरिलामधले माणूसपण शोधण्याचा ध्यास घेतलेल्या एका अमेरिकन स्त्रीच्या झपाटलेपणाचे शब्दचित्र विनया जंगले ह्यांनी उभे केले आहे.
झाबुआ” या प्राचीन भारताचा विभाग असणाऱ्या प्रांताचे वर्तमान आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जाते आणि येथील आदिमानवाचे जीवनचित्र गिरीश प्रभुणे यांनी येथे रेखाटले आहे.

ह्या व्यतिरिक्त अभ्यासपूर्ण चिकीत्सक तसेच परखड भाष्य आपल्या कलाक्रुतींमधून सादर करणार्या "वाडा चिरेबंदी" "युगान्त" आदिंमधून "मौनराग" आळविणार्या श्री. महेश एलकुंचवार ह्यांच्या ललित लेखनाचा त्रिमिती परामर्श एखाद्या डॉक्टरेटसाठी शोभावा असा परामर्श येथे श्री. संजय आर्विकरांनी मांडलेला आहे. ह्या अंकातील, अगदी आपआपल्या मनोविश्वात दंग असणार्या कवींच्या अनेकानेक कविता आमच्यासारखे पामरांना समजण्यास जशा कठीण आहेत, तसाच हा परामर्श दुर्बोध आहे, हे मात्र जाता जाता नमूद करणे भाग आहे.

सारांश, विचारवंतांना किंवा बुद्धिवंतांना आपलासा वाटावा असाच हा सारा ऐवज आहे त्यामुळे "चिमुटभरांसाठी" "मूठभरां"नी जमवलेला खजिना, असे ह्या अंकाचे स्वरूप आहे. सर्वसामान्य वाचकाला हा संपूर्ण अंक, त्यातील मान्ववरांची व्यक्ती चित्रे संशोधकांची आत्मनिवेदने वगळता, तसा डोक्यावरून जाणाराच भासू शकेल आणि तसे असणे हे सत्यकथेच्या परंपरेची बूज राखणारेच असायला हवे नाही कां?

सुधाकर नातू माहीम, मुंबई १६
Mb 9820632655