शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

माझ्या ब्लाँगची कुळकथा


माझ्या ब्लाँगची कुळकथा:लेखक श्री. सुधाकर नातू माहिम, मुंबई १६
गेली अनेक वर्षे, वर्तमानपत्रांत कधी मधी माझे पत्र छापून येणे, मासिकांत माझा लेख वा राशीभविष्य प्रसिद्ध होणे हयामुळे मला आमच्या कुटुंबियात वा पंचक्रोशीत लेखक समजतात! त्यामुळेच माझा एक तरूण भाचा, मला स्वतंत्र ब्लाँक सुरू करायचा आग्रह करीत असे. तेव्हां मी त्याला ब्लाँग म्हणजे काय रे भाऊ? असा प्रश्नही विचारला होता! त्याचे उत्तर अजून आठवते: 'ब्लाँग ब्लाँक मध्ये, फरक इतकाच. ब्लाँकमध्ये सुख जसे मिळते तशीच कटकटही सहन करावी लागते, तर ब्लाँगमुळे तिथे रहाता,''ची बाधा होऊ शकते. ब्लाँक ही रहाण्याची वास्तवातील आपली जागा. तर ब्लाँग ही आपले विचार व्यक्त करण्याची काल्पनिक जागा'! 

कोणे एके काळी, स्वत:चा मोबाईल असणे ही जशी दुर्मिळ अभिमानाची गोष्ट होती, तीच आज एखाद्याचा ब्लाँग असणे ही झाली आहे! कधीही स्मार्ट फोन वापरणारा मी, काही दिवसांतच माझा स्वत:चा हा असा स्वतंत्र ब्लाँग सुरू करू शकलो, ह्याचे माझे, मलाच आश्चर्य वाटत आहे. नेहमी, माझा मुलगा मला तसा फोन भेट मी तुम्हाला म्हणून देतो, तो तुम्ही वापरायला शिका असा आग्रह करत असे. पण मला मात्र 'काचेवरून बोटे फिरवून' वापरायच्या स्मार्ट फोनची भिती वाटत असे, हे आपल्याला कधीही जमणारच नाही असे म्हणत मी माझ्या मुलाला नकार देत असे.
पण, हळू हळू मला लक्षांत येऊ लागले की फोनचा उपयोग फक्त फोन करणे, घेणे अथवा sms करणे एवढाच नसून तिथे 'सोशल मिडीया' वरून अनेकांशी विचारांची देवाण घेवाण करता येते. त्यामुळे, माझ्या साध्या नोकीया फोनवरून बघता बघता माझा 'सोमि'वर शिरकाव झाला. विचारमंथन, मनन चिंतन करून नीर क्षीर विवेकाने आपल्या मनांतील स्पंदन 'सोमि'वर व्यक्त करणे आणि आलेल्या लाईकस् मुळे हरखून जाणे सुरू झाले.

पण, काही काळानंतर, मला ध्यानात आले की, बाकीचे बहुतेक सर्वच मराठीत अगदी लिलया संदेशांची देवाण घेवाण करत आहेत आणि मला मात्र माझ्या साध्या फोनमुळे इंग्रजीचाच आधार घ्यावा लागतो आहे. अर्थात त्या मर्यादेमुळे माझे इंग्रजी थोडे फार कां होईना ते सुधारले. पण मात्रुभाषा मराठीत विचार करायचा आणि नंतर त्याला इंग्रजीत व्यक्त करायचे हा द्राविडी प्राणायाम योग्य नव्हे असे अंतर्मन म्हणू लागले. मराठीत लिहीता येण्याचे सीमोलंघन केल्याशिवाय आता तरणोपाय नाही, हे उमगले.
पण त्या काचेवरच्या कसरतीची भीती काही जाता जात नव्हती आणि माझा स्मार्ट फोनला नकार चालूच होता. अशा वेळेस माझ्या ध्यानात आले की नुसतेच माझे समवयस्क ज्येष्ठ नागरीकच नव्हे, तर मेकँनिक, सुतार, रखवालदार दुधवाला .. प्रमाणेच घरकाम करणारा गडीही सहजपणे स्मार्ट फोन वापरत आहेत! मला म्हणूनच वाटू लागले की,अशा वेळेस आपण मागे रहाता कामा नये.

ह्यामुळे, माझी जिद्द जाग्रुत झाली. निव्रुत्तीपूर्वी नेहमी, मी दरवर्षी काही ना काही नवीन आव्हानात्मक ध्येय निश्चित करून ते प्रयत्नपूर्वक पूर्ण करीत असे,त्या अनुभवाची ठिणगी मनांत पडली. मुलाकडून भेट म्हणून स्मार्ट फोन आता घ्यायचा आणि आगामी दोन वा तीन महिन्यात प्रथम मराठीत 'सोशल मिडीया' वर आपले संदेश लिहीणे शिकायचे नंतर आपला स्वतंत्र ब्लाँग निर्माण करायचाच असे मी ठरवले.

आता, मला सांगायला आनंद वाटतो की माझे हे स्वप्न मी ठरविलेल्या वेळे आधीच पूर्ण होत आहे. स्मार्ट फोन वापरणे, मराठीतून लिहीणे माझे मीच धडपड करत शिकलो. मात्र ब्लाँग कसा बनवायचा ह्याचे सा्द्यंत मार्गदर्शन मला माझ्या एका तरूण भाच्याने what's app वरून केले आणि त्या आधारे पहिल्याच प्रयत्नात माझा moonsungrandson हे अनोखे शिर्षक असलेला ब्लाँग तयार झाला.

थोडक्यात:
When there is a Will, there is a Way
And
Determination and Dedication alone takes one to the Desired Destination. 

मूनसनग्रँडसन शिर्षकाची कहाणीः

चार दशकामागची ही आठवण आहे. पदवी परिक्षा झाल्यानंतर मला एका व्यवस्थापकीय सल्लागारासमवेत काही दिवस काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या कारमधून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जायचं, तिथले मानसन्मानाचे आदरातिथ्य स्विकारत त्यांच्या समस्यांवर सल्ला देण्यासाठी, पहाणी चर्चा आणि संबधित माहिती गोळा करून योग्य तो सल्ला त्यांना द्यायचा असे कामाचे स्वरूप होते. माझा सहभाग अर्थातच बघ्याचा/Observerचा होता. तेव्हांनाहीतरी माझा सर्वांत आवडता विषय होताः 
Business Management.
तसेच मला हया विषयावरील जगविख्यात सल्लागार पीटर ड्रकरची पु्स्तके वाचण्याची खूप आवड होती.

ते /१५ 'सोनिया'चे दिवस मला इतकी स्फूर्ती देवून गेले की, मी 'अर्ध्या हळकुंडाने पिवळा' झाल्यासारखा स्वत:लाच मँनेजमेंट कन्सल्टंट समजू लागलो. त्या बहरांत मी आपली एक कन्सल्टन्सी फर्म सुरू करायचे ठरविले. स्फूर्तीदेवता तेव्हा माझ्यावर इतकी जणु प्रसन्न झाली होती की, मला माझ्या त्या स्वप्नांतील फर्मसाठी एक भन्नाट नांव सुचले, लगेच मी लेटरहेडस् देखिल छापून घेतली:
Moonsun Grandson 
Advertising and Management Consultants. 
पण हाय! तो प्रयोग फक्त लेटरहेडस् बनविण्यापुरताच टिकला आणि नंतर नोकरीचे चक्र आणि निव्रुत्ती अशी चार दशके कशी भराभरा निघून गेली, ते कळलेही नाही.
आणि आता, वयाच्या सत्तरीत पुन्हा तशीच स्फूर्तीदेवता प्रसन्न झाल्यावर माझा हा ब्लाँग रजिस्टर करताना अचानक ते भन्नाट नांवच मी शिर्षक:Title म्हणून टाकले अन् ते पहिल्या फटक्यांतच मान्य झाले:
Moon
म्हणजे चंद्र :सुधाकर
Sun
म्हणजे सूर्य: अर्थांत दिनकर
आणि Grandson म्हणजे अर्थात नातू!
तर अशी आहे मूनसनग्रँडसन ची रोमांचक कहाणी!!

ब्लाँगची रूपरेषा:

माझ्या हया ब्लाँगचे पुढील चार भाग असतील:
रंगांची दुनिया: साहित्य, रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा सांस्क्रुतिक जगताचा परामर्ष.
स्पंदने: विविध विषयांवरील विचारमंथन.
प्रगतीची क्षितीजे: व्यक्तिमत्व विकास आणि व्यवस्थापनशास्त्रविषयखक अनुभवी बोल.
पुढचे पाऊल: उद्याची चाहूल घेणारे ज्योतिषशास्त्राची उपयुक्त ओळख.
ह्या विभागांचे प्रकाशन कालबद्ध वेळापत्रकानुसार करण्याचा मी लौकरच प्रयत्न करीन.
माझ्या ब्लाँगसाठी आपणा सर्वांच्या प्रोत्साहनपर प्रतिसादाची अपेक्षा आहे.
धन्यवाद.
श्री. सुधाकर नातू माहिम, मुंबई १६
                     




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा