शुक्रवार, १४ मार्च, २०२५

"रंगोत्सव-आठवणीतील मोती !":

"रंगोत्सव-आठवणीतील मोती !": 'आठवणीतील मोती' हे नटवर्य प्रभाकर पणशीकर यांनी लिहिलेले पुस्तक सध्या मी वाचत आहेप्रत्येक शब्दाशब्दाबरोबर वाचकाला आपल्याबरोबर कसं घेऊन जायचं, हे कसब त्यांना साधलेल आहे. ते मला प्रत्येक पानंपान वाचताना ध्यानात आलं. साहजिकच एक रकमी, एका बैठकीत या उत्कृष्ट पुस्तकाची जवळजवळ 70 पाने मी त्यामुळेच वाचू शकलो. तो मी नव्हेच या नाटकातील लखोबा लोखंडेच्या रूपाने प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर स्वतंत्र ठसा उमटवला आहे. ते साठ वर्षाहून अधिक रंगभूमीची सेवा करत आलेले आपण जाणतो. उत्तम दिग्दर्शक निर्माता आणि अभिनेता तर ते होतेच, पण ह्या पुस्तकामुळे मला ध्यानात आले की ते एक श्रेष्ठ दर्जाचे लेखकही सहज होऊ शकले असते ! कितीतरी जुन्या आठवणींना यामध्ये उजाळा मिळाला आहे आणि त्यांच्या रंगभूमीवरील आयुष्याबरोबरच त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये कसे कसे चढ उतार आणि आव्हाने येत गेली त्यांनी त्या साऱ्याला तोंड देत न भूतो न भविष्यती असे यश कसे मिळवले याची ही हृदयस्पर्शी, मनाला भिडणारी आणि तितकीच मनोरंजक अशी कहाणी आहे. प्रस्तुत पुस्तकाची उरलेली जवळजवळ दीडशेहून अधिक पाने माझं वाचन चालूच राहील या शंका नाही. साहजिकच एक अतिशय उत्तम पुस्तक वाचण्याचा मला आनंद लाभत आहे. वाचनासारखा आनंद नाही आणि वाचन हे माणसाच्या मनाचं भावनांच पोट कसं भरू शकतो, याचा अनुभव वसंत वाचनालय मी सुरू केल्यापासून मला गेली दोन वर्ष ठाई ठाई घेत आहे. आतापर्यंत मासिके आणि पुस्तके मिळून जवळजवळ दीडशे साहित्यकृतींचा ऐवज माझ्या मनाच्या गाभाऱ्यात तुडुंब भरलेला आहे आणि मी अक्षरश: त्यामध्ये चिंब चिंब होत आहे. आपणही ह्या आणि अशाच पुस्तकांचा वाचनाचा आनंद जरूर घ्या, एका वेगळ्याच विश्वात गेल्याची अनुभूती तुम्हाला येईल. हे पुस्तक वाचता वाचता, माझ्या लक्षात आलं-एक जुनी आठवण ताजी झाली. खूप वर्षांपूर्वी श्री सदाशिव सावंत संपादित 'सुगंध सरिता' या दिवाळी अंकामध्ये मी मराठी नाट्यनिर्मात्यांवरती एक लेखमाला दरवर्षी लिहित असे. त्यामध्ये जवळजवळ मराठी मधील सर्वच प्रमुख नाटक निर्माणसंस्थांचे प्रमुखांच्या मुलाखती आणि त्यांच्या कार्याची ओळख मी करून देत असे. अर्थातच 'नाट्यसंपदा' ही अग्रगण्य संस्था असल्यामुळे मी स्वतः शिवाजी मंदिर मधील नाट्यसंपदेच्या कार्यालयात पंंतांना जाऊन भेटलो आणि त्यांच्याशी गप्पाटप्पा व त्यांनी दिलेल्या माहितीवरून एक लेख त्यावर्षीच्या सुगंध सरिता दिवाळी अंकात माझा प्रसिद्ध झाला होता. अशा थोर कलावंताची आणि माझी देखील प्रत्यक्ष भेट व्हावी आणि तीने मला एक लेख लिहायला प्रवृत्त करावे, ह्या आठवणीने माझे मन मोहरून गेले. जाता जाता एक विनंती मला या लेखाच्या वाचकांना करावीशी वाटते. दुर्दैवाने मी गेली चार दशके जरी विविध नियतकालिकात करमणूक क्षेत्रावर लिहीत असलो तरी मी माझ्या लेखनाचे काहीही ऐवज जवळ ठेवले नाहीत. त्याचे महत्व मला आता लक्षात येत आहे. त्यामुळे ज्या कुणाजवळ त्या कालखंडातील 'सुगंध सरिता'चे दिवाळी अंक कुणाकडे असतील, तर त्यामधील नाट्यनिर्मात्यांच्या संबंधीच्या माझ्या लेखांची फोटोकॉपी त्यांनी मला जर प्रतिसादात किंवा व्हाट्सअप वर पाठवली तर मी आभारी राहीन. धन्यवाद श्री सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा