👍"रद्दी'चे महाभारत ! ": 😊
हल्ली वर्तमानपत्रांमध्ये वाचायला काही विशेष नसतं. ज्या बातम्या असतात त्यापैकी बऱ्याचशा विविध प्रकारचीगुन्हेगारी किती वाढत चालली आहे, त्याचेच भयानक दर्शन घडविणाऱ्या किंवा व्यवस्थेमध्ये किती, कुठे कशात त्रुटी आहेत ते दाखवणाऱ्या अथवा राजकीय सुंदोपसुंदी आणि त्यातून निर्माण होणारा गदारोळ, इ.इ. अशा मन उद्विग्न करणाऱ्या बातम्या अधिक असतात.
त्यापेक्षा वासरात लंगडी गाय शहाणी असल्याप्रमाणे,
'पुरवणी' बऱ्यापैकी वाचनीय असते. विशेषत: त्यामधील शब्दकोडे सोडविल्याशिवाय दिवस जात नाही आणि तेच वर्तमानपत्रातले एकमेव (बहुतेकांसाठी) विशेष आकर्षण असते ! पुरवणीमध्ये काही वेधक व्यक्तिमत्वे किंवा समाज उपयोगी काही कार्य होत असल्याचे पुरावे देणारेही वाचनीय असते. तसेच माहितीपर ज्ञानात भर घालणारे वाचन करावयाला तेथे थोडाफार वाव मिळतो. सारांश रोजचा पेपर हा अगदी टाकाऊ म्हटला नाही, तरी पूर्वीसारखा वाचावासा वाटतोच असं नाही. कारण अग्रलेखांचाही दर्जाही तसा
सुमारच असतो. बहुदा मीडियावर हा विशिष्ट अशा समूहाचे नियंत्रण असल्यामुळे, असे होत असावे.
पण रोज रतीब वर्तमानपत्रांचा होणे अपरिहार्य असल्यामुळे, रद्दी मात्र खूप साठते. शहराप्रमाणे रद्दीचे भाव वेगळे वेगळे असतात. पुण्यामध्ये रद्दीला वीस रुपये भाव आहे हे आम्हाला समजले. त्या उलट मुंबईमध्ये दहा रुपये मिळाले तरी खूप अशी तफावत आहे ! वाचनापेक्षा या रद्दीचेच अधिक महत्त्व त्यामुळे वाढत चालले आहे की काय असे वाटते ! एकंदरच सामाजिक बाजारू वृत्ती वाढत जाण्यामुळे
सार्वत्रिक ह्रास अटळ असल्यामुळे मीडिया बाबतीत सुद्धा आपल्याला तसे चित्र दिसणे साहजिक आहे. अर्थात हे माझे वैयक्तिक निरीक्षण आहे. ते बरोबर किंवा चूक हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. मला केवळ आज वर्तमानपत्र हा विषय चिंतनासाठी घ्यावासा वाटला, कारण कालच आम्ही तुडुंब अशी रद्दी विकली आणि तीच माझ्या घर मनात घर करून राहिली आणि काळ्यावर पांढरे हे असे उमटले !
धन्यवाद
सुधाकर नातू
ताजा कलम
😊 "खरं म्हणजे, नुकताच 'अक्षर' दिवाळी अंक'22, मी थोडाफार चाळण्यासारखा वाचला आणि "दिवाळी अंकांची मांदियाळी"सदरामध्षे लेखन करावं असं वाटलं खरं, पण अंक बाजूला राहिला आणि हे "रद्दीचे महाभारत" माझ्याकडून लिहून गेले.
'अक्षर' वांग्मयाची चिरफाड पुढच्या लेखात करता येईल !