शारदोत्सव:
"एक अद्भूत युगांत":
डॉक्टर इरावती कर्वे यांचं "युगांत" हे पुस्तक मला वाचायला मिळालं, हे माझ्या आयुष्यातलं एक मोठं भाग्य मी समजतो. आपण, सर्वोत्कृष्ट पुस्तकांची जर यादी केली, तर त्यामध्ये ह्या पुस्तकाला निश्चितच पहिल्या पाचात स्थान मिळेल अशी माझी भावना आहे. "महाभारत" हे एक महाकाव्य तर आहेच, पण त्याला "जय" नावाचा इतिहास असंही म्हटलं जातं, ह्याची प्रचिती या पुस्तकाची मांडणी आहे त्यावरून यावरून उमजतंय.
इथे "महाभारत" कथेमधील महत्त्वाची निवडक पात्रे केंद्रीभूत मानून, प्रत्येकाचा जीवनपट हा त्याच्या ह्या कथेमधील सहभागाच्या पार्श्वभूमीवर विश्लेषणात्मक दृष्टीने मांडलेला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे जीवन उलगडताना, पुन्हा पुन्हा महाभारतातील अनेक नाट्यमय प्रसंगांचे आपल्याला सातत्याने दर्शन होते.
शोभादर्शकांत, तो जसजसा फिरवला जातो तेव्हा, आंतील रंगीत काचेच्या तुकड्यांची जशी आकर्षक नक्षी सतत बदलत जाते, त्याचप्रमाणे, युगांत मध्ये, प्रत्येक पात्राच्या जीवनप्रवाहासोबत, महाभारतातील घटनांचे विलोभनीय, चित्तथरारक चित्रे आपल्या मनावर उमटत जातात.
भीष्म गांधारी द्रौपदी कुंती कर्ण अर्जुन कृष्ण, मयसभा, पिता-पुत्रांच्या जोड्या आणि क्षत्रिय, ब्राह्मण अशा "महाभारत" जणु घडविणार्या, महत्त्वाच्या घटकांभोवती हे पुस्तक मोठ्या खुबीने गुंफले आहे. शेवटचा भाग "युगांत" हा एकंदर महाभारताच्या घटनांचा तुलनात्मक आढावा, त्यांचा सर्वांगीण परामर्ष घेतल्याप्रमाणे, उद्ब्धोधक सार आहे. "युगांत" मधून प्रकर्षाने आपल्या समोर उभी राहतात तीही माणसे आपल्यासारखी हाडामांसाची आकांक्षा गुणावगुण असणारी होती याची खात्री पटते. महाभारत युद्ध समाप्तीनंतर द्वापारयुगाचा अंत होऊन कलियुग सुरु झाले असावेे.
ह्या संग्राह्य पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की मानव जीवनातील भावभावना त्यांच्या सभोवतालची सामाजिक भौगोलिक पारंपारिक परिस्थिती यांचा ऊहापोह इथे केलेला आहे. चिकित्सक दृष्टी, योग्य ते निरीक्षण आणि ही कथा म्हणजे जणू काही घडलेला सत्य इतिहास असू शकतो, हे दाखवण्यासाठी केलेली धडपड, लेखिकेच्या असामान्य प्रतिभेचे व बुद्धिमत्तेचे दर्शन आहे. ह्या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परिशिष्टामध्ये कुरु वंशाचे आणि इतर संबंधितांची वंशावळ दिली आहे, त्याचबरोबर भारताच्या भौगोलिक नकाशा द्वारे त्यावेळची संभाव्य परिस्थिती उभी केली आहे.
एकंदरच हे पुस्तक हे प्रकांड पांडित्याचे अत्युत्तम अशा चिकित्सेचे आणि ओघवत्या भाषा सामर्थ्याचे एक अवर्णनीय उदाहरण आहे. म्हणूनच आज इतकी वर्षे जाऊनही, हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे जाता जाता मला सांगावेसे वाटते. आजच्या परिस्थितीचा विचार करता महाभारत युद्ध कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे की काय अशी भीती वाटते आणि एका येऊ, होऊ घातलेल्या "युगांता" च्या कडेवर, कठड्यावर आपण उभे आहोत की काय असेही वाटून जाते. म्हणूनच ह्या रसास्वादाला शीर्षक देताना "एक अद्भुत युगांत" असे दिले आहे.
"एक उद्बोधक संदेश":
ह्याच पार्श्वभूमीवर आठवले, एक उद्बोधक संदेश मला आला होता. त्यामधील कल्पकता व तर्कशुद्ध मांडणी नोंद घेण्याजोगी. ज्याने कोणी हा मांडला, त्याला सलाम! तो येथे मांडणे संयुक्तिक होईल:
"मला वाटत 'ढ' हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी! ह्या भाषेच्या समृद्धतेचा आपल्याला गर्व असायलाच हवा!
'ढ' अक्षर नसेल तर....
"ढ" ला सांगणार कस तो / ती काय आहे
अश्रु कसे ढाळणार
ढमढेर्यांना काय म्हणणार, शिवाय
ढमढेर्याच्या ढब्ब्या ढेरीवरुन ढब्बा ढेकुण ढासळला हे कसे म्हणणार
ढाण्या वाघाला काय म्हणणार
ढापण्या कोणाला म्हणणार
ढापणार तरी कस आणि
ढवळणार तरी काय
कढीला मुकणार
ढकलाढकली नसेल तर
परिक्षा, कोर्टाची तारीख पुढे कशी ढकलणार
ढग भरुन नाही आले तर पाउस कसा पडणार
ढगळ कपड्यासाठी आल्टरवाल्याला काय सांगणार
दुसर्यांच्यात ढवाळाढवळ कशी करणार
ढळढळीत सत्य मांडणार कोण
वाळूच्या ढिगार्यात बोगदे कसे करणार
पतंगाला ढील कशी देणार
ढेरपोट्याला चिडवणार कस
एखाद्याकडे ढुंकुन न पहाणे जमेल का
ढेकर नसेल तर पोटभर जेवण होईल का
गुळाची ढेप कशी पडणार
ढोंगी बाबांच काय करणार
गुरा ढोरांच काय
ढोलकी नसेल तर तमाशाच काय
ढोबळमानानी विचार करा...
शरीराच्या एखाद्या अवयवाच वर्णन तरी कस आणि काय करणार?"
अशीच एक गोष्ट म्हणजे, सोमिवरील पहायला मिळालेली एक छान कविता:
*स्वभावाला औषध असतं,*
पण ते रोज घ्यायच असतं..॥
अधिरातला "अ" सोडून,
थोडं धिरानं घ्यायच असतं ॥
संतापातला "ताप" सोडून,
मनाला संत करायच असतं ॥
आपलं बोलणं सोडून कधी,
समोरच्याचही ऐकायच असतं ॥
एकाच दिवशी नाही तरी,
हळू हळू बदलायचं असतं ॥
स्वभावाला औषध असतं,
फक्त ते रोज घ्यायच असतं !!!
*सुंदर दिवसाच्या संदर शुभेच्छा !!!*
त्या अनामिक कविला जितकी दाद द्यावी, ती कमीच आहे.
शेवटी सोमिवरील अनोखा संदेश:
"भारतातील एकमेव मंदिर जिथे गणपतीचे पूर्ण कुटुंब विराजमान आहे
गणपती ५ पत्नी ऋद्धि, सिद्धि, पुष्टि, तुष्टि, श्री. २ मुलगे शुभ आणि लाभ २ नातू अमोद, प्रमोद
ठिकाण विद्याधाम इंदौर .....
दुर्मिळ माहिती नक्की शेअर करा."
सुधाकर नातू
१०/८/'१८