फोनचे धक्के:
फोन आल्यावर समोरून कोण बोलत आहे हयाची खात्री न करता एकदम बोलत सुटणे किती चुकीचे व धोकादायक असते, त्याचा मी नुकताच एक अनुभव घेतला. झाले असे : मला फ़ोन आला व आवाजावरून तो ओळखीचा वाटला आणि मी अघळपघळ बोलू लागलो. पण ती समोरची व्यक्ती अनोळखी निघाली. मला खजील व्हायला झाले. Sorry म्हणत मला क्षमा मागावी लागली. फ़ोन आला की, प्रथम आपण आपले नांव सांगावे, नंतर आपण कोण बोलत आहात ते विचारावे, आपले काय काम आहे, वा आपण फोन का केलात, ते कृपया सांगता कां असे विचारावे. हाच धड़ा मला मिळाला!
हयाहीपेक्षा चमत्कारिक व क्लेशकारक अनुभव, जेंंव्हा आपण एखादा फोन पुष्कळ दिवसांनंतर आपल्याच कुणा परिचीताला करतो, तेंव्हा येऊ शकतो. सुमारे २५/३० वर्षांपूर्वीचा हा अनुभव आहे. तेंव्हा घरी फोन मिळण्यासाठी खूप प्रतिक्षा करावी लागे आणि एकदा कां तो फोन आला, की कुणाकुणाला फोन करूं असे होत असे. माझ्या घरी नवीन फोन आल्याने, एकामागोमाग मी असेच फोन करत असताना, मला माझ्याबरोबर असलेल्या काॅलेजमधील एका मित्राची आठवण झाली. तिथे फोन लागल्यावर, मी मि.+++ हे आहेत कां अशी विचारणा केली मात्र, तो फोन घेणार्या महिलेच्या रडण्याचा आवाज़ ऐकू येवू लागला. हुंदके देत ती म्हणाली "ते, माझे यजमान, काही दिवसांपूर्वीच, एका आॅपरेशनचे वेळी ते मरण पावले". हे ऐकताच माझा नवीन फोन घरी आल्याचा आनंद कुठल्या कुठे उडून गेला आणि मी जवळजवळ कोसळलोच.
दुसरा असाच विचित्र अनुभव दिवाळीच्या शुभेच्छा पाठविताना आला होता. नेहमी प्रमाणे, अनेकांना मी तसे ई मेल पाठवले होते. प्रथे प्रमाणे त्यांची उलट शुभेच्छा देणारी उत्तरे येत होती. पुष्कळ दिवस झाले, तरी एका जेष्ठ परिचिताकडून काहीच उत्तर न आल्याने, मी चिंतेत होतो. थोड्या दिवसांनंतर त्यांच्या मुलाचा मला मेल आला आणि मला धक्का बसला: त्या जेष्ठाच्या पत्नीचे नुकतेच एका भीषण अपघातांत निधन झाले होते. त्यामुळे, इतके दिवस मला पोच दिली गेली नव्हती; वाटले, आपण आनंदात, तर ज्याच्याकडे आपण तो व्यक्त करू पहातो, तो अशा दु:खांत असताना, त्यांना काय यातना,आपण कळत, न कळत दिल्या!
तिसरा अनुभव तर हयाहूनही अधिक भयानक होता. असाच पुष्कळ वर्षानी मी एका शहरात कामासाठी गेलो होतो. कामे आटोपून सायंकाळी त्या शहरातील परिचित मंडळींशी बोलायचे मी ठरवले आणि अचानक मला मि@@@ हयांची आठवण झाली, हे महाशय काही वर्षांपूवीॅ आमच्याच शहरात आमच्या परिसरांत रहात होते, एक खेळकर, सर्वांना आपलेसे वाटणारे, कर्तबगार व्यक्ति होते. आमचे शहर सोडून त्यांच्या हया शहरात, येवून त्यांना पुष्कळ वर्षें झाली होती. त्यांची विचारपूस करावी, हया हेतूने मी त्यांचा फोन नंबर शोधला व फोन केला. फोनवर एका तरूणाचा आवाज़ ऐकू आला. पण मला जे ऐकायला मिलाले, ते मात्र, महाभयंकर होते. तो तरूण त्यांचाच मुलगा होता, तो सांगत होता: "sorry, मला सांगायला खूप दु:ख होते की, माझे बाबा आता ह्या जगांत नाहीत, त्यांनी काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली".
डोके बधीर करणारी, मन कुंठीत करणारी ती बातमी होती. अशा समंजस, नेहमी हसतमुख, हुशार व हरहुन्नरी माणसाने आत्महत्या कां करावी, हा धक्का सहन न करता येणारा होता. मी पुष्कळ दिवसांनी संवाद साधायला, काय गेलो होतो आणि झाले, हे असे भलतेच!
वास्तव, हे कल्पनेपेक्षाही भयंकर व चमत्कारिक असते,हेच खरे!