शनिवार, ७ जानेवारी, २०१७

बिंब प्रतिबिंब

An Article by Mr. Sudhakar Natu:

बिंब:   
नोटाबंदीचे फलित--व्यथाँची कथा:

नोटाबंदीचे फलित काय, ह्या प्रश्नाचे उत्तर, हा निर्णय कोणत्या उद्देशाने घेतला गेला आणि ते उद्देश खरोखर किती यशस्वी झाले त्याँची शहानिशा केली तरच मिळू शकेल. काळा पैसा नष्ट करण्याचे प्रमुख उद्दिष्ट, ठरविलेल्या मुदतीपर्यंत बँकांमध्ये जमा झालेल्या एकूण जुन्या 500 1000 रूपयाँच्या नोटांचा विचार करता फसलेले दिसत आहे. दहशतवादी कारवायांवर नोटाबंदीमुळे चाप बसेल हे दुसरे ध्येयही आतंकवाद्यांचे चालूच असलेले कारनामे विचारांत घेता अयशस्वीच म्हणावे लागेल. बनावट नोटाँचे एकूण चलनामधील नगण्य प्रमाण होते, ते नाहीसे झाले असे ग्रुहीत धरले तरी, नंतर पडलेल्या छाप्यांमध्ये सापडलेल्या बनावट नव्या करोडो रूपयांच्या जप्त केलेल्या नोटांचा विचार करता मूळ उद्देशाची आणि नोटाबंदीच्या अंमल बजावणीचीही वाताहात झालेली दिसते. त्यामुळे, नोटाबंदी, हा कारण नसताना, लहर आली म्हणून खेळलेला जुगार होता, असे कोणी म्हटले तर ते चूक ठरेल कां?

परंतु सुशेगात 'कंफर्ट झोन' मधून समस्त १२५कोटी देशवासीयांना, अनिश्चिततेच्या अंध:कारांत केवळ  भुलभुलैय्या करणार्या वाणीच्या जोरावर अलगतपणे, ढकलण्याची किमया जितकी अगाध, तेवढेच जनतेने, नाहक बुद्धि खुंटीवर टांगून भुलणे केवळ अतर्क्यच!

'
एक वेळ अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये.' हे कायद्याचे मूलतत्व आपण सारेच जाणतो, ऐकतो. पण दुर्दैवाने, अथवा दुरद्रुष्टिच्या अभावी 'गोंधळी' नोटाबंदीनंतर तर, उघड उघड ह्याची पायमल्ली होत, लाखो निरपरा़ध नागरीक भरडले जाणे, सुमारे शंभरापर्यंत नागरिकांचे प्राण जाणे, कायद्याच्या राज्यात भूषणावह आहे कां? गुप्ततेच्या नावाखाली, अंमलबजावणीतील भीषण त्रुटी मोकळेपणाने मान्य करणे योग्य होते कां, अनिश्चित अशा ऊज्वल भविष्याची स्वप्ने दाखवत गरीब अन् भोळ्या जनतेची अशी क्रूर फसवणूक करणे भूषणावह होते कां?

ह्या सार्या नाहक खटाटोपामुळे, शेतकर्यांचे सहजा सहजी भरून येणारे प्रचंड नुकसान झाले आहे, विविध वस्तू आणि सेवांचे मार्केट कमालीचे आक्रसलेले आहे आणि  ते पुन:श्च पूर्ववत होणे, कसे, केव्हां होईल ते वर्तवणे जिथे भल्या भल्या (तथाकथीत) अर्थतद्न्यांना जमत नाहीये, तिथे त्याहून अधिक स्तरावर मार्केट जाणे, सध्यातरी अशक्यप्राय वाटत आहे. दुर्दैवाने, अच्छे  दिन येणे हे एक म्रुगजळ झालेले दिसत आहे. आगीतून, फुफाट्यांत अशी तरी स्थिती नववर्षांत होवो, एवढीच प्रार्थना करणे, आपल्या हातात उरले आहे! नोटाबंदीच्या फलिताची ही सारी व्यथीत करणारी बाजू आहे.


प्रतिबिंब: 
नोटाबंदीचे फलित--आशांचे किरण:

नोटाबंदीपायी झालेले हाल, कष्ट समस्त जनतेने ज्या धैर्याने ज्या संयमाने सोसले, त्याला जगांत तोड नाही. जे धोरण इतर काही देशांत तडीला जाऊ शकले नाही, ते 125 करोडोंच्या भारताला जमले ही बाब दुर्लक्षून चालणार नाही.

चलन तुडवड्यामुळे नाऊमेद होता, सामान्य जनतेने काटकसरीचा मार्ग निवडत, अंथरूण पाहून, पाय पसरावयाचा शहाणपणा दाखवला. त्यामुळेच मुक्त अर्थ व्यवस्थेचे धोरण स्विकारल्यापासून फोफावत चाललेला चंगळवाद आटोक्यांत येईल, अशी आशा वाटू लागली आहे.

बँकांमध्ये जमलेल्या महाप्रचंड धनराशींमुळे व्याजदर कमी होऊन व्यापार, उद्योग आणि घरगुती क्षेत्रांना नवसंजीवनी मिळून विकासाला योग्य दिशा मिळू शकेल. मंदीच्या मरगळीतून, चंगी-सुगीच्या ऊत्साहवर्धक उभारीकडे देशाची अर्थ व्यवस्था वाटचाल करू शकेल. सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सरकारचे हात अधिकाधिक बळकट होणार आहेत.

निर्णय लकवा झालेल्या शासनाचे तुलनेत सांप्रत शासन झटपट परिस्थितीनुरूप प्रसंगी कठोर निर्णय घेणारे आहे, हा विश्वास जनतेला वाटू लागला आहे आणि त्याचे चांगले परीणाम होऊ शकतील. हे कायद्याने प्रामाणिकपणे चालणारे सरकार आहे, येथे गुन्हेगारांना क्षमा नाही, असे चित्र उभे रहात आहे. विशेषतः अर्थ विषयक कायद्यांची शिस्तबद्ध रितीने अंमलबजावणी वेगाने होताना दिसत असल्याने कर बुडविणार्या प्रव्रुत्तींवर चाप बसेल. तसेच स्थिर, कार्यक्षम शासनाबद्दलच्या खात्रीमुळे परदेशी गुंतवणुकीचा ओघ वेगाने वाढण्यासाठी वातावरण निर्माण होणार आहे.

नोटाबंदीचा सर्वांत क्रांतीकारी बदल म्हणजे डिजीटल माध्यमांतून, आर्थिक देवाण घेवाणीचे व्यवहारांना दिले जाणारे प्राधान्य प्रोत्साहन होय. त्यामुळे रोख रकमेवर अवलंबून रहाता, आपले अर्थ व्यवहार तर होतीलच पण त्या बरोबरच कर चुकवेगीरीला आळा घालणे शक्य होऊन, काळ्या पैशाची निर्मितीवर मोठाच घाव घातला जाईल. सरकारच्या महसूलांत त्यामुळे लक्षणीय चालना मिळू शकेल. गतीमान विकासाचे स्वप्न आवाक्यांत येण्यास मदत होईल. हे ही मान्य करावेच लागेल की ग्रामीण भागात डिजीटल माध्यमांचे कार्यक्षम जाळे उभारणे जनतेलख अर्थ तंत्रसाक्षर बनविणे हे मोठे खडतर आव्हान आहे. काही दशकांपूर्वी देशात कम्पुटर जेव्हा आला, तेव्हाचा माहोल आता डिजीटल क्रांतीच्या रूपाने जणु उभा आहे. Out of Box जाणार्या प्रगतीपथावरच्या विस्मयकारी वळणावर ह्या नोटाबंदी नंतरच्या संकटाने आपणा सार्यांना आणून ठेवले आहे.

नोटाबंदीचे असे काही निवडक आशादायी किरण हे ही फलित असू शकेल, नाही कां...????